Uttar Pradesh Assembly Election 2027: उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजप विरुद्ध भाजप, राममंदिर, राष्ट्रवाद आणि हिंदुत्वाचे मुद्दे झाले जुने; योगी आदित्यनाथ यांची अग्निपरिक्षा

Uttar Pradesh BJP Internal Conflict: नेतृत्वगुण आणि वक्तृत्वामुळे योगी आदित्यनाथ उत्तरप्रदेशातील सर्वांत लोकप्रिय नेते ठरले असले तरी भाजपतील सुप्त संघर्षाचा फटका त्यांना बसू शकतो.
Uttar Pradesh BJP Internal Conflict
yogi adityanathDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

सुनील चावके

नेतृत्वगुण आणि वक्तृत्वामुळे योगी आदित्यनाथ उत्तरप्रदेशातील सर्वांत लोकप्रिय नेते ठरले असले तरी भाजपतील सुप्त संघर्षाचा फटका त्यांना बसू शकतो. त्या संघर्षाचा किती परिणाम निवडणुकीत होतो, हे पाहावे लागेल. दिल्ली-लखनौच्या संघर्षाचा मुद्दा समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव सातत्याने मांडत आहेत. मात्र योगी आदित्यनाथ यांच्या तुलनेत त्यांची लोकप्रियता वधारलेली नाही.

उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक नव्या वर्षातील सर्वांत मोठे गूढ ठरू पाहात आहे. ‘भाजपविरुद्ध भाजप’ हेच या कोड्याचे एक प्रमुख कारण ठरणार आहे. लोकसभेत गुजरातपेक्षा तिप्पट संख्याबळ असलेल्या उत्तर प्रदेशचे सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याचा मान पटकावून योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणे २०२९मध्ये पंतप्रधानपदाचे दावेदार होतील काय, हा या निवडणुकीतील सर्वात कळीचा प्रश्न ठरणार आहे. पण उत्तर प्रदेशात ज्या प्रकारे भाजपअंतर्गत रस्सीखेच सुरु आहे, त्यावरुन योगी आदित्यनाथ तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होतीलच, असे निःशंकपणे म्हणता येत नाही. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या संभाव्य आघाडीचा विजय होईल काय, या प्रश्नापेक्षा योगी आदित्यनाथ आणि भाजपचे काय होणार याचेच कुतुहूल निर्माण झाले आहे.

Uttar Pradesh BJP Internal Conflict
Government Job: हिंसक आंदोलनात सहभागी होणाऱ्यांना 'या' सरकारचा मोठा दणका; सरकारी नोकरीसाठी चारित्र्य पडताळणीचा नवा नियम लागू

वाराणशी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असलेले पंतप्रधान मोदी यांचा काहीसा कमी झालेला करिष्मा, राम मंदिराला मिळालेल्या देणग्यांच्या चोरीची घटना, जेन झीच्या वाढत्या महत्त्वाकांक्षा, मतचोरीचे आरोप, आणि नोकरशाहीतील ठाकूरवादामुळे निर्माण झालेली नाराजी, मंत्री, आमदार आणि कार्यकर्त्यांपेक्षा नोकरशाहीवर ठेवलेली भिस्त इत्यादी मुद्दे भाजपच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे.

राममंदिर, राष्ट्रवाद, पंतप्रधान मोदी यांची लोकप्रियता, हिंदुत्व हे मुद्दे उत्तर प्रदेशात गुळगुळीत झाल्यासारखे चित्र आहे. जनता आणि विरोधी पक्ष जे मुद्दे उपस्थित करीत आहे, त्यालाच उत्तर देण्याची वेळ भाजपवर आली असून विरोधकांच्या मुद्यांवरून लक्ष उडविण्याची क्षमता भाजपमध्ये राहिली नसल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. मंत्री, आमदार, पक्षसंघटनेपेक्षा नोकरशाहीला महत्त्व लाभल्यामुळे भाजपच्या संघटनेत शैथिल्य आल्याची कारणे दिली जातात. उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक, प्रदेशाध्यक्ष पंकज चौधरी, प्रभारी सरचिटणीस विनोद तावडे हे मोदी-अमित शहांचे प्रतिनिधित्व करीत असल्यामुळे योगी आदित्यनाथ यांची कोंडी झाल्याचे म्हटले जाते. ही निवडणूक योगींच्या नावावरच लढणार अशी कोणतीही औपचारिक घोषणा आतापर्यंत भाजपने केलेली नाही. तरीही योगींच्याच चेहऱ्यावर निवडणूक लढण्याची अपरिहार्यता भाजपला टाळता येणार नाही, हेही तेवढेच खरे.

Uttar Pradesh BJP Internal Conflict
Yogi Adityanath Death Threat Case: योगी आदित्यनाथांना जीवे मारण्याची धमकी; एका मॅसेजने उडाली युपी पोलिसांची झोप

शांतता आणि विकास

कायदा आणि सुव्यवस्थेची जरब आणि विकासाची कामे ही योगींसाठी जमेची बाजू ठरली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत कुप्रसिद्ध असलेल्या उत्तर प्रदेशात कठोर पावले उचलत गुन्हेगारीला वेसण घालण्यात योगी आदित्यनाथ यांना आलेल्या यशामुळे सर्वसामान्य जनता सर्वाधिक समाधानी आहे. शिवाय राज्यातील पायाभूत सुविधांमध्ये झालेली दृश्य आणि लक्षणीय सुधारणा हीदेखील योगींची जमेची बाजू आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक महामार्ग बनला असून बहुतांश जिल्हे एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. नेतृत्वगुण आणि वक्तृत्वकौशल्यामुळे योगी राज्यातील सर्वांत लोकप्रिय नेते ठरले आहेत. दिल्ली-लखनौचा संघर्ष चिघळल्याने भाजप विभाजित झाला असल्याचे दहा वर्षांपूर्वी मुख्यमंत्री राहिलेले अखिलेश यादव सातत्याने निदर्शनास आणून देत आहेत. तरीही योगी आदित्यनाथ यांच्या तुलनेत त्यांची लोकप्रियता वधारलेली नाही.

Uttar Pradesh BJP Internal Conflict
Chief Minister Yogi Adityanath: योगींना जीवे मारण्याची धमकी देणारा गजाआड

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या केंद्रीय निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशातून १ कोटी २७ लाख मतदार गायब केले आणि त्याचवेळी मुस्लीम मतदारांची संख्या १.६३ टक्क्यांनी वाढली, असा आरोप करुन योगींनी पंतप्रधान मोदी- अमित शहा यांच्यावर शरसंधान केल्याचे मानले जात आहे. उत्तर प्रदेशात ढोबळमानाने २० ते २१ टक्के उच्चवर्णीय, यादव आणि गैरयादव मिळून ४० ते ४२ टक्के ओबीसी, २१ टक्के दलित आणि १९ टक्के मुस्लीम मतदारांचा समावेश आहे. हे मतदार जातीपातीच्या राजकारणात विभागले गेले तर त्यात भाजपचे नुकसान होणार आहे. त्यामुळे हिंदू मते वगळली गेल्याचा मुद्दा आक्रमकपणे उपस्थित करीत योगी हिंदू मतांच्या ध्रुवीकरणाचा प्रयत्न करीत आहेत.

Uttar Pradesh BJP Internal Conflict
Rahul Death Case VIDEO: सॉरी नको, माझा मुलगा परत द्या! राहुलच्या आईची 'दीपविहार'च्या प्राचार्यांना आर्त विनवणी, शाळेनं जबरदस्तीनं मुलांना धबधब्यावर नेल्याचा आरोप

पण त्याचबरोबर ज्ञानेशकुमार हे केवळ विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांसाठी नव्हे तर भाजपशासित राज्यांसाठीही संकट निर्माण करणारे ठरले आहे. व्होटचोरीचे संकट विरोधी पक्षांवर नव्हे तर योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर ओढवणार असल्याचे चित्र नकळत जनमानसात ठसविले जात असून ते मोदी सरकारसोबतच भाजपच्याही पथ्य्यावर पडणारे आहे.

Uttar Pradesh BJP Internal Conflict
Yogi Adityanath: सीएम योगींची मोठी घोषणा, जिल्ह्यांमध्ये मिळणार मोफत डायलिसिस सुविधा

मोदी-शहांचा हस्तक्षेप नसेल तर उत्तर प्रदेशात योगींच्या चेहऱ्यावर भाजप विजय मिळवू शकतो, असे योगींच्या समर्थकांचे म्हणणे आहे. योगींना अमित शहांच्या मोहऱ्यांशिवाय त्यांना निवडणूक लढवायची आहे आणि त्यासाठी योगींना भाजप आणि संघातून समर्थन मिळत असल्याचीही चर्चा आहे. दिल्लीने अडथळे निर्माण केले नाहीत, तर योगींची लोकप्रियता आणि भाजपची ताकद यांच्या जोरावर सत्तेत परतणे अवघड नाही. विनोद तावडे यांनी बिहारच्या मुश्कील वाटणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपच्या यशाचा मार्ग काढला. आताही प्रदेश प्रभारी म्हणून त्यांच्यापुढे पक्षांतर्गत गुंता सोडविण्याचे आव्हान उभे राहिले आहे. मुख्य प्रश्न आहे तो निवडणुकीच्या निकालानंतर काय होणार हा.

Uttar Pradesh BJP Internal Conflict
Rahul Gandhi Election Plan: 'केवळ रस्त्यावर उतरुन सत्तापालट होत नाही', 'अच्छे दिन'च्या धर्तीवर 2029 साठी राहुल गांधींचा प्लॅन काय? 12 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचे आव्हान

सुप्त संघर्ष उघड

या निवडणुकीच्या निमित्ताने योगी-शहा यांच्यातील सुप्त संघर्ष आता उघड झाला आहे. कारण सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होऊन योगी पंतप्रधानपदाचे दावेदार ठरले तर अमित शहा यांची पंतप्रधानपदाची दावेदारी संपुष्टात येईल. योगी आदित्यनाथ यांच्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे संख्याबळ ६४ वरुन ३३ वर आले असा संशय आहे. आता त्याचा हिशेब २०२७च्या विधानसभा निवडणुकीत होईल आणि योगींना दंडित केले जाईल, अशी चर्चा आहे. ‘भावी’ पंतप्रधान म्हणून भरपूर गाजावाजा झालेल्या योगी आदित्यनाथ यांच्यासाठी ही आरपारची लढाई ठरू पाहात आहे. लखनौ शाबूत राखले तर त्यांच्यासाठी दिल्ली दूर नसेल. अर्थात, २०२९ची लोकसभा निवडणूक अजून अडीच वर्षे दूर असली तरी अडीच-तीन महिन्यांनंतर होणारी उत्तर प्रदेशची निवडणूक ही यावेळी खऱ्या अर्थाने लोकसभेची उपांत्यफेरी ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.