1970 चा शांत गोवा अन् 2026 चा हा 'अशांत' अवतार; नक्की काय बदललं गोमंतकात?

Goa Culture Change: १९७० च्या दशकातील गोवा आणि २०२६ साली दिसणारा गोवा यात जमीन अस्मानाचा फरक पडलेला प्रकर्षाने जाणवू लागला आहे.
Goa Culture Change
Goa Culture ChangeDainik Gomantak
Published on
Updated on

जयराम अनंत रेडकर

१९७० च्या दशकातील गोवा आणि २०२६ साली दिसणारा गोवा यात जमीन अस्मानाचा फरक पडलेला प्रकर्षाने जाणवू लागला आहे. राजकीय आणि सामाजिक स्थित्यंतरे इतकी घडली की, त्याची मोजदाद करणे कठीण होऊन बसले आहे. शांत, सालस, प्रेमळ, आपुलकीने वागणारा नीज गोंयकार आता दुर्मिळ झाला आहे.

आता उठसूठ किरकोळ कारणाने भांडणे उकरून काढणारा, पैसा, मालमत्ता यासाठी खून पाडणारा, कमीतकमी वेळेत आणि बिनकष्टात भरपूर पैसा मिळवण्याची वृत्ती बळावलेला, थोडीशी श्रीमंती आली की उन्मत्त होणारा, वडीलधाऱ्या मंडळीशी फटकून वागणारा, राजकीय हेतू सिद्धीस नेण्यासाठी आसुसलेला अशी प्रतिमा नीज गोंयकाराची झालेली आज दिसून येते. हे एक कटू सत्य आहे.

Goa Culture Change
Goa Politics: भाजप-मगो युती, कितने दूर कितने पास?

अशी वृत्ती बळावण्याची काय कारणे असतील याचा विचार केल्यावर लक्षात येते की, मुक्तीपूर्वी गोवा हा पोर्तुगीज अमलाखाली जणू काही बंदिस्त होता. बाह्य जगताशी त्याचा संबंध अगदीच किरकोळ होता. मुक्तीनंतर त्याला सगळे आकाश मोकळे झाले. बाहेरच्या जगात काय घडामोडी होताहेत, कोणत्या सुधारणा होताहेत याचे दर्शन त्याला झाले. या सुधारणा आणि सुखसोयी आपल्यालाही मिळाव्यात, अशी लालसा निर्माण झाली.

कौटुंबिक जीवनाला स्थैर्य आले. सन २००० पर्यंत इथले वातावरण निर्भेळ राहिले. त्यानंतर मात्र परिस्थिती बदलत गेली. कोंकण रेल्वे आल्याने परप्रांतीयांचे लोंढेच्या लोंढे इथे लोटले. त्यांनी स्थानिकांचे छोटे मोठे व्यवसाय बळकावले. त्यांनी इथल्या जमिनी खरेदी केल्या, आपले इमले उभारले. दिल्लीच्या धनवंतांनी इथे आपली हॉटेल लॉबी तयार केली. फार्म हाऊसेस तयार केली. मागाल तेवढी किंमत मिळत गेल्याने गोवेकरांनी आपल्या जमिनी त्यांना विकल्या.

Goa Culture Change
Goa Politics: रिक्त मंत्रिपदाबाबत निर्णय मुख्यमंत्रीच घेतील! पक्षाचा दबाव नाही- दामू नाईक

यासाठी स्थानिक राजकीय नेत्यांना त्यांनी हाताशी धरले, त्यांच्या मार्फत सगळे सरकारी लाभ उठवले. आतातर यातील काहींनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राजकारणात चंचूप्रवेश केला आहे. उद्या यातून कुणी आमदार आणि नामदार झाला तर आश्चर्य वाटून घ्यायची गरज उरणार नाही. ७०-८० च्या दशकात समुद्र किनाऱ्याच्या ओढीने, स्वस्त दारू मिळते यासाठी किंवा सहजपणे वेश्या मिळतात, हे जाणून पर्यटक येत होते.

इथली सुंदर मंदिरे, चर्चेस, ऐतिहासिक स्थळे या गोष्टी तशा दुय्यम आकर्षणाच्या होत्या. श्रद्धाळू लोकच त्याचा आस्वाद घ्यायला येत. बहुतांशी पर्यटक सुखोपभोग आणि चंगळ करण्याच्या हेतूने येत असत आणि येतात. आतातर कॅसिनो संस्कृती रुजत चालली आहे. त्याच्या आकर्षणाने पर्यटक येऊ लागले आहेत. या सगळ्या गोष्टींनी गोमंतकाची सुसंस्कृत, शांत, प्रेमळ, पापभिरु, भक्तीभाव जपणारा, सर्व धर्मांशी सलोखा जपणारा गोवा अशी असणारी मूळ ओळख हळूहळू पुसली जात आहे. सुशिक्षितांची संख्या वाढली, पण नोकऱ्या दुर्मिळ झाल्या.

Goa Culture Change
Goa Politics: 'आप' आणि 'आरजी' समोर काँग्रेस लोटांगण घालणार? अस्तित्वासाठी विरोधकांशी जुळवून घेण्याशिवाय पर्याय नाही!

नोकऱ्यांसाठी पैसे मोजावे लागू लागले. यासाठी दलाल निर्माण झाले. दलाल आणि राजकीय नेते याचे नाजूक संबंध जुळले. अलिकडेच याची दोन तीन प्रकरणे समोर आली, पण यातून अजून कुणाला कठोर शिक्षा झाल्याचे ऐकीवात नाही. म्हणजे पाणी कुठेतरी मुरते आहे हे निश्चित. गेल्या दोन दशकांत स्वयंचलित दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या बेसुमार वाढली. यातून अपघातांची संख्या वाढली.

सत्तरच्या दशकात साधी सायकल असणे हे गर्वाचे लक्षण मानले जायचे. आता सायकलीने प्रवास करणारा क्वचित कुणी दिसतो. प्रत्येकाच्या घरात आता स्कूटर, मोटारसायकल किंवा चारचाकी वाहन हमखास दिसते. घरात कमावते जितके सदस्य तेवढी वाहने सर्रासपणे आढळतात. पणजी, म्हापसा, मडगाव, फोंडा या प्रमुख शहरात बाजारहाट करण्यासाठी किंवा सरकारी कामकाजासाठी गेल्यावर वाहन ठेवायला जागा मिळत नाही, अशी अवस्था झाली आहे.

Goa Culture Change
Goa Politics: गद्दारांना काँग्रेसचे दरवाजे कायमचे बंद! गिरीश चोडणकरांचा पक्षांतरी नेत्यांवर थेट हल्ला; 2022 मधील निर्णय कायम

अनेक वाहने रस्त्यावरच दिवसरात्र पार्क केलेली आढळतात. सार्वजनिक बसचा वापर करणे आता सामान्यपणे आता कमीपणाचे वाटू लागले आहे. मुंबई, दिल्ली, पुणे, बंगळुरू, हैद्राबाद अशा देशांतर्गत ठिकाणी जाण्यासाठी हवाई मार्गाची निवड प्राथमिकतेने केली जाते. आर्थिक संपन्नता आली आणि सांस्कृतिक संपन्नता रोडावत गेली. कर्तव्यापेक्षा अधिकार आणि हक्क यासाठी लढाई सुरू झाली. ‘एकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ’ हा विचार केव्हांच मागे पडला आणि मलाच कसे अधिक मिळेल याकडे लक्ष वेधले जाऊ लागले.

त्यागमय असणारी ही भूमी भोगमय कधी झाली हेच समजले नाही. यातूनच खून-खराबे, भांडण-तंटे, चोऱ्यामाऱ्या, लूटपाट आणि अनैतिक धंदे निर्माण झाले. मालमत्तेच्या वादातून मुलगा आपल्या जन्मदात्यांचा खून करायला तयार होतो हे केवढे मोठे दुर्दैव ! पक्षीय राजकारणाने अगदी शेवटचे टोक गाठले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. परस्परांचे चारित्र्य हनन हा राजकारणाचा स्थायीभाव झाला आहे.

Goa Culture Change
Goa Politics: राजकीय पारा वाढला! भाजपचे वरिष्‍ठ नेते दिल्लीत; चर्चांना उधाण; सस्‍पेन्‍स कायम

कामगिरीच्या बळावर मते मिळवण्याऐवजी धार्मिक, भाषिक तेढ निर्माण करून हवा तापवली जाते. आमदारांची पळवापळवी केली जाते वा थेट खरेदी विक्री केली जाते. सुसंस्कृत राजकारणाचा जमाना आता संपला आहे. अशा प्रकारे शांत असणारा गोवा अशांततेच्या दिशेने वाटचाल करू लागला आहे, याचे खूप वाईट वाटते. या सगळ्या अपप्रवृत्तींना थोपवणे आता शक्य नाहीसे वाटते, पण अपप्रवृत्ती थोपवता येईल, अशा दृष्टीने प्रयत्नशील राहणे, वा जागरूक राहाणे, हेच आपल्या हाती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com