Goa Tiger Death: निसर्गाचा रक्षणकर्ताच धोक्यात! मानवाच्या क्रूरतेमुळे वाघांचा जीव टांगणीला; पूर्वजांनी पुजलेला 'व्याघ्रदेव' रक्ताळला

Goa Tiger Killing: आम्ही गोमंतकीय वाघ मारत सुटलो आहोत. त्याचा फायदा कर्नाटक सरकार उठवून आपली म्हादई नदी कर्नाटकात नेल्याशिवाय राहणार नाही.
Goa Tiger Killing
Goa Tiger DeathDainik Gomantak
Published on
Updated on

मधू य. ना. गावकर

आम्ही गोमंतकीय वाघ मारत सुटलो आहोत. त्याचा फायदा कर्नाटक सरकार उठवून आपली म्हादई नदी कर्नाटकात नेल्याशिवाय राहणार नाही.

निसर्गाने पृथ्वीवरील जंगलाची परिसंस्था निर्माण करून ती टिकवण्यास प्रत्येक जिवाला काम वाटून दिले आहे. इवलीशी वाळवी जमिनीवर पिरॅमिड उभारून पृथ्वीच्या गर्भात पाणी साठवते. चण्याच्या आकाराची मधमाशी हजारो फुलांतील मध गोळा करून झाडावर पोळे करून त्यात साठवून ठेवते. हाताच्या मुठीत मावणारा पक्षी गवताची एक एक काडी गोळा करून आपले घर बनवून राहतो व वसुंधरेवरील पर्यावरणाला मारक गोष्टी नष्ट करतो. आपल्या गोव्याला पश्चिम घाटाने सत्तरी, धारबांदोडा, सांगे, केपे आणि काणकोण तालुक्यात मोठ्या प्रमाणात वनसंपत्ती देऊन ती राखण्याचे काम, रक्षण करण्याचे काम मेंदू, कान, डोळे आणि तोंड असलेल्या मानवावर सोपवले आहे. पण स्वार्थी, कपटी माणसाने भूमीचे रक्षण करण्याचे सोडून निसर्गावर क्रूरपणाचे हत्यार चालवत पृथ्वीला संकटात टाकत आहे.

Goa Tiger Killing
Goa Tiger Death: गोव्याच्या जंगलात सांडतेय वाघांचे रक्त! प्रशासनाची मात्र डोळेझाक; केरी, गोळावली नंतर आता साकोर्डा,वाघांच्या हत्यांची मालिका थांबेना

माणूस जंगलाकडून मैदानी भागात आला, वसुंधरेने आपल्या अंगावर खेळणाऱ्या जीवांपैकी काही प्राण्यांना हिंस्र बनवून त्यांच्या हाती जंगल रक्षणाची जबाबदारी सोपवली, त्यात मुख्य वाघ होता. शिवाय अस्वल, गवे, भुजंग, बिबटा, हत्ती यांच्यावरही वनरक्षणाची जबाबदारी सोपवून माणसाला जंगलात येण्यापासून बंद करण्याचे काम सोपवले. पण क्रूर माणसाच्या हातातील हत्याराला बिचारे मुके हिंस्र प्राणी बळी पडले. हळूहळू त्याने जंगलावर परत ताबा मिळवण्याचा अटोकाट प्रयत्न चालवलेला, आज पाहावयास मिळतो.

Goa Tiger Killing
Goa Tiger Death: पट्टेरी वाघाच्या अवयवांची तस्करी? दात आणि नखे गायब, शिकारीच्या संशयानं तपास तीव्र; शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा

आमच्या गोव्यातील जंगलात वाघ नाहीत, हा जावईशोध काही लोक लावतात. काही जण म्हणतात गोव्यातील अभयारण्यात राधानगरी, तिळारी, भीमगड, काळी जंगल, दांडेली अभयारण्यातून ते येतात आणि जातात. पर्यावरणीय अभ्यासक शास्त्रज्ञांच्या मते गोव्यातील जंगले वाघांची वसतीस्थाने आहेत. आणि त्याची पुष्टी करणारे दाखलेही मिळतात. म्हादई, वाळवंटी, कुशावती, तळपण, तेरेखोल शापुरा नद्यांच्या उगमाकडील काठावर आमच्या पूर्वजांनी वाघांची देवळे, घुमट्या, देवराया निर्माण केल्या. त्या स्थानावर वाघांच्या नावे पूजा केली.

व्याघ्रदेवाला प्रसन्न करून घेत डुक्कर, उंदीर, चितळ, गवे, साळिंदर, हत्ती, मेरू या जनावरांपासून आपल्या कुमेरी शेतीचे रक्षण करण्यास गार्‍हाणे घातले. आर्त हाक मारून वाघावर विश्‍वास ठेवला होता, हे जंगलात फिरताना पाहावयास मिळते. मात्र आजच्या युवा पिढीतील शिकून सुशिक्षित समजणारे काही अतिशहाणे नवीन जावईशोध लावीत म्हणतात की अभयारण्यात लोकवस्त्या आहेत. हे जरी खरे असले तरी त्यांच्या वाडवडिलांनी वाघांना मारले नव्हते. काही उत्साही ज्ञानवंत उत्सवाच्या रात्री दिव्यांच्या लखाखाने हिंस्र जनावरांच्या जागी देवपूजा करतात. पूर्वी आमच्या पूर्वजांनी अशी निसर्गविरोधी कामे केली नव्हती हे आज आपण समजून घेत नाही.

Goa Tiger Killing
CM Pramod Swant: सभापती अन् मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचण्याचे कारण 'आयुर्वेद'

पर्यावरण तज्ज्ञ, शास्त्रज्ञांच्या मते एक वाघ आपल्या मादीच्या शोधात अगर भक्ष्य मिळवण्यास रात्रीचा चाळीस किमी प्रवास करतो. अभयारण्यातील वाघ मादी गरोदर होण्यापूर्वी आपल्या भावी पिढीसाठी भक्ष्य, प्राणी, पाणी असलेली जागा हेरून ठेवतो. व्यवस्थित एकांत असलेली जागा निवडून त्या ठिकाणी नर आणि मादी प्रणय क्रीडा करतात. नंतर नरवाघ मादीच्या आज्ञेवरून दुसऱ्या ठिकाणी निघून जातो. त्याला घालवण्याचे कारण म्हणजे तिच्या पोटी जन्म घेणाऱ्या बछड्यांच्या सुरक्षेची काळजी. तिच्या पोटी जन्म घेतलेले बछडे मोठे होईपर्यंत ती त्याच जागी राहून भक्ष्य मिळवते. माणसाला रस्ता पाहिजे म्हणून आपण बागायती कापतो, शेती बुजवतो, डोंगर, घाट तोडफोड करतो व अभयारण्यांतील वनराई कापतो. त्यावेळी बाकी मुक्या प्राण्यांचा विचार करीत नाही.

Goa Tiger Killing
CM Pramod Swant: मुरगाव बंदरात कोळशाची क्षमता वाढवणार नाही

आज आपल्या गोव्यात चोर्ला, मोले, दिघी वेर्ले कृष्णपूर सांद्रे, जांभळीकडे, सुर्ल, कॅसलरॉक, पारवाड हे घाटरस्ते अरण्यांतून महाराष्ट्र आणि कर्नाटकात नेले आहेत. त्यातील चोर्ला, मोले आणि दिघी घाटातून मोठ्या प्रमाणात गाड्यांची रहदारी चालल्याने त्या मुक्या जनावरांचा जाण्यायेण्याचा रस्ता मानवी कृतीने बंद झाला आहे. वाघ हा खरा अरण्यांचा रक्षणकर्ता आहे. माणूस स्वतःला जरी ताकदवान समजत असला, तरी वाघाला थेट सामोरे जात नाही. दुरून तो त्याच्यावर बंदुकीने गोळी झाडून त्याचा खून करतो अगर मांसाहारी खाद्यात विष घालून कपटाने वाघाचा जीव घेतो. आपले पूर्वज म्हादई जुवारी नद्यांच्या उगमाकडील भागात हिंस्र प्राण्यांच्या संगतीत राहून जगले होते. प्रा. राजेंद्र केरकरांंबरोबर कैकवेळा मी भीमगड, म्हादई, मोले, नेत्रावळी, खोतीगाव, काळी अभयारण्यातील अनेक ठिकाणी प्रवास करून वाघांची वस्तीस्थाने पाहून वाघांची माहिती जाणून घेतली आहे.

डॉ. माधव गाडगीळांबरोबरही जंगलाची सफर करून हिंस्र प्राण्याबद्दल माहिती जाणून घेतली आहे. जंगलाच्या वाघाला मानव बंदिस्त करून ठेवू शकत नाही. त्यालाही निसर्गाने स्वातंत्र्य दिले आहे. राधानगरीतला वाघ तिळारी अगर म्हादई अभयारण्यात, भीमगडातील वाघ म्हादई, मोले आणि काळी जंगलात, खोती गावचा वाघ नेत्रावळी, काळी जंगलात जाणेयेणे केले तर माणूस त्याला अडवू शकत नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी वाघाला ठार मारून त्याच्या शरीराची कातडी, पायाची नखे, आणि तोंडातील सुळे- दात पळवून लाखो रुपये कमवतो. अशा खुनी मारेकऱ्यांना निसर्गदेवता माफ करणार नाही. जीम कार्बेट या ब्रिटिश अधिकाऱ्याने शेकडो वाघांची हत्या केली होती, नंतर त्याला प्रायश्‍चित्त घ्यावे लागले. हल्लीच्या काळात म्हादई अभयारण्यात पाच वाघ मारून म्हादई जंगलाचा खजिना लुटला गेला आहे.

Goa Tiger Killing
Panaji Protest: 'देवांची विटंबना करणाऱ्यांना तात्काळ अटक करा', हिंदुत्ववादी संघटना आक्रमक; पणजी पोलिस मुख्यालयावर धडक मोर्चा

आज म्हादई आणि मोले अभयारण्याच्या सीमाभागात एक वाघ मारून तिथल्या महादेवाचा कोप मारेकऱ्याने ओढवून घेतला आहे. आपल्या राज्याचे भलेमोठे वनखाते आहे, त्या खात्यात वनांच्या रक्षणासाठी हजारो कर्मचारी सरकारने नेमले आहेत. त्यांच्यावर जनतेच्या खजिन्यातून कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. पण गोव्याच्या जैविक संपत्तीचे रक्षण होत नाही. आम्ही गोमंतकीय वाघ मारत सुटलो आहोत. त्याचा फायदा कर्नाटक सरकार उठवून आपली म्हादई नदी कर्नाटकात नेल्याशिवाय राहणार नाही. एका बाजूने वाघ नाही म्हणायचे, दुसऱ्या बाजूने सहा वाघ मारायचे. कोणते तरी एकच खरे असू शकते. वाघ आहेत, म्हणूनच ते मारले जातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Tiger Deaths Goa
Tiger Death Sakorda Goa
Tiger Poaching Suspected Goa
Decomposed tiger found Sakorda Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com