Goa Tiger Death: गोव्याच्या जंगलात सांडतेय वाघांचे रक्त! प्रशासनाची मात्र डोळेझाक; केरी, गोळावली नंतर आता साकोर्डा,वाघांच्या हत्यांची मालिका थांबेना

Tiger Death Sakorda Goa: या पूर्वीच्या दोन प्रकरणात गुन्हेगारांना शिक्षा झालेली नाही आणि त्या संदर्भातला पाठपुरावाही केलेला नाही त्यामुळे हे तिसरे प्रकरण त्या दिशेने जाणार आहे का?
Tiger Death Sakorda Goa
Goa Tiger DeathDainiak Gomantak
Published on
Updated on

राजेंद्र पां. केरकर

या पूर्वीच्या दोन प्रकरणात गुन्हेगारांना शिक्षा झालेली नाही आणि त्या संदर्भातला पाठपुरावाही केलेला नाही त्यामुळे हे तिसरे प्रकरण त्या दिशेने जाणार आहे का? एकंदर ६ वाघांचा मृत्यू १७ वर्षांच्या कालखंडात होणे हे साक्षरतेचे प्रमाण लक्षणीय असणाऱ्या राज्याला लज्जास्पद आहे.

प ट्टेरी वाघ ही खरे तर गोव्याची पूर्वापार शान असून, इथल्या शेतांत, बागायतींत राब राबणाऱ्या कष्टकरी जाती जमातींनी वाघांचे अस्तित्व मानत, त्याला आपल्या संरक्षक लोकदैवतांत स्थान प्रदान केले. वाघांचे संवर्धन आणि संरक्षण झाले तरच निसर्गातली अन्नसाखळी सुरळीत राहील, यासाठी त्यांनी त्यांच्या अस्तित्वाचा सातत्याने मानसन्मान राखला. पौष महिन्यातील वाघ्रे अमासच्या दिवशी त्याच्या प्रतिमेसमोर पारंपरिक विधींना स्थान दिले. पेडणे ते काणकोणपर्यंत गोव्यातल्या जंगलनिवासी जातीजमातींनी वाघाला लोकदैवत मानले आणि त्याच्या नावाने दगडाच्या मूर्ती स्थापित करून, त्याच्या पूजनाला महत्त्व दिले.

Tiger Death Sakorda Goa
Goa Tiger Death: पट्टेरी वाघाच्या अवयवांची तस्करी? दात आणि नखे गायब, शिकारीच्या संशयानं तपास तीव्र; शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा

काणकोणातल्या श्रीस्थळसारख्या गावातील डोंगरातील वागऱ्या हन्न असो अथवा सांगे भाटीतील सिद्धनाथ पर्वतावरची वाघाची होवरी, अशा नैसर्गिक गुंफांत त्यांनी पट्टेरी वाघाचा अधिवास मानला. सत्तरीतील पिसुर्ले पंचायत क्षेत्रातील वाघुरे येथे तर वाघाला व्याघ्रेश्वर मानून, त्याची चुकूनसुद्धा शिकार झाली तर निर्वंश होण्याचा शाप लागेल म्हणून, त्याची शिकार करण्याचे कधी कोणी धाडस केले नाही. परंतु पोर्तुगीज अमदानीत युरोपातून आलेल्या त्यांच्या अधिकाऱ्यांनी आणि इथल्या राजेसरदारांना वाघाची शिकार करण्याचा शौक जडला आणि त्यात कित्येक पट्टेरी वाघांची निर्घृणपणे शिकार करण्याच्या दुर्घटना बिनदिक्कतपणे घडल्या.

पोर्तुगीज सरकारने वाघाची शिकार करणाऱ्यांचा गौरवही केला. गोव्यातील ‘वाघ’, ‘वाघ नाईक’ ही आडनावे वाघांची कधीकाळी शिकार करून , समाजाला निर्धोक करणाऱ्या कुटुंबातल्या पुरुषोत्तमाला जी बिरुद म्हणून लागली ती कालांतराने आडनावांत परिवर्तित झाली. गोव्यात वाघाचे अस्तित्व आणि त्यांचा नैसर्गिक अधिवास टिकला पाहिजे अशी धारणा गोव्यातल्या लोकमानसात पूर्वापार होती आणि त्यासाठी सांग्यातल्या कालेसारख्या गावात वागऱ्या गाळ, सत्तरीत वाघेरी आणि काणकोण सांगेच्या सीमेवरती वाघडोंगर आदी संकल्पना निर्माण झाल्या आणि आज बदलत्या कालखंडात प्रतीकात्मकरीत्या या संकल्पना अस्तित्वात असलेल्या पाहायला मिळतात.

Tiger Death Sakorda Goa
Goa Tiger Death: पट्टेरी वाघाच्या अवयवांची तस्करी? दात आणि नखे गायब, शिकारीच्या संशयानं तपास तीव्र; शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा

परंतु गोवा मुक्तीनंतर सागरी पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि त्यानंतर लोह खनिज उत्खनन, वाहतूक आणि निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी वाघांच्या अस्तित्वाची दखल न घेण्याची मानसिकता बळावत गेली. त्यामुळे भारतीय वनसेवेतल्या वरिष्ठांनी गोव्यात वाघ नाही आणि गोव्यात अधूनमधून दृष्टीस पडणारे वाघ महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या जंगलांतून तात्पुरते स्थलांतर करतात अशाप्रकारच्या युक्तिवादाला खतपाणी घालण्याचे षड्यंत्र यशस्वी केले. परंतु त्यानंतर वारंवार गोव्यातल्या जंगलांत वाघांचे अस्तित्व असल्याचे रीतसर पुरावे वारंवार मिळत असताना, गोव्यात वाघ नाही, याचेच समर्थन गोवा सरकारने करण्यात धन्यता मानली.

त्यामुळे एप्रिल २००९साली सत्तरीच्या केरी गावातल्या वाडयेर येथे जंगली श्वापदांची शिकार करण्यासाठी लावलेल्या सापळ्यात चक्क पट्टेरी वाघ अडकला आणि सापळा घेऊन फिरताना, त्याला गोळी घालून निर्घृणरीत्या ठार करण्यात आले. वाघाच्या हत्येत अडकलेल्या गुन्हेगारांसंदर्भात ठोस पुरावे गोळा करण्यास वन खाते अपयशी ठरल्याने, या हत्येतील गुन्हेगारांची निर्दोष मुक्तता झाली. त्यामुळे म्हादई अभयारण्याशी संलग्न असणाऱ्या सत्तरीतल्या गोळावलीच्या जंगलात एक वाघीण, एक निम्न प्रौढ आणि दोन बछडे यांची जहाल विष घालून चार वाघांची हत्या करण्यापर्यंत मजल गेली.

Tiger Death Sakorda Goa
Drowning Death: काळाचा घाला! फिट आली अन् तोल गेला; गुडघाभर पाण्यात बुडून 23 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

वन खात्याने चार वाघांची हत्या उघडकीस येऊन, त्यात गुंतलेल्या संशियतांना अटक केलेली असताना, या प्रकरणाची रीतसर चौकशी केली नाही. वाघाची हत्या करून, त्यांची नखं आणि दात गायब करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात राजकीय ओंजळीने पाणी पिणाऱ्या यंत्रणेनं हेतुपुरस्सर चालढकल केली. त्यामुळे चार वाघांच्या हत्येचे प्रकरण २०१९-२०२०साली उघडकीस आलेले असताना, आजतागायत ना गुन्हेगारांवर खटला दाखल केला, ना या दुर्घटनेची रीतसर चौकशी करून, या प्रकरणात शहरी भागातून गावाकडे येणारे उच्चभ्रू शिकारी कारणीभूत आहेत, त्यांना गजाआड करण्यात कोणतेच प्रयत्न दृष्टीस पडले नाहीत.

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने गोवा सरकारला राष्ट्रीय नीतीला अनुसरून, पट्टेरी वाघांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी ज्या शिफारशी केल्या होत्या, त्याची ना विधानसभा अधिवेशनात चर्चा झाली, ना सरकारने त्यांच्या अंमलबजावणीसाठी ठोस पावले उचलली गेली. त्यामुळेच एप्रिल २०२६च्या पहिल्या आठवड्यात घडलेली दुर्घटना उघडकीस यायला २ मे रोजीपर्यंत वाट पाहावी लागली. मुंबई उच्च न्यायालयाने गोवा सरकारला राज्यातील यापूर्वी अधिसूचित करण्यात आलेल्या सरकारी मालकीच्या अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यानाच्या जंगल क्षेत्राचे रूपांतर व्याघ्र राखीव क्षेत्रात करण्याचा निर्णय दिलेला असताना गोवा सरकारने या निर्णयाविरुद्ध आपली याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली आहे.

Tiger Death Sakorda Goa
Cotigao: मध्यरात्री भक्ष्याच्या शोधात बाहेर पडला बिबट्या, अंधारामुळे पडला विहिरीत; वनखात्याचे अथक प्रयत्न यशस्वी

त्यामुळे हा विषय न्यायप्रविष्ट असल्याने, व्याघ्र राखीव क्षेत्र आणि येथील वाघांच्या नैसर्गिक अधिवास आणि अस्तित्वाच्या विषयाकडे गोव्याच्या वन खात्याने काणाडोळा केलेला आहे. सध्या ना जंगली श्वापदे शिकार प्रतिबंधक दल कार्यरत आहे, ना व्याघ्र संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी ठोस आणि प्रामाणिक प्रयत्न दृष्टीस पडतात. त्यामुळे धारबांदोड्यातल्या साकोर्डा ग्राम पंचायत क्षेत्रात आगलोट येथे पुन्हा वाघाच्या मृत्यूची दुर्घटना उद्भवलेली आहे. तीन ठिकाणी, वाघाच्या मृतदेहाचे अवशेष आढळलेले असून, आगलोट -मुर्गे येथील खाजगी मालकीच्या वनक्षेत्रात ही दुर्घटना उघडकीस आलेली आहे.

यापूर्वी दीड दशकापूर्वी धारबांदोडा परिसरातल्या रगाडो नदीच्या परिघातल्या अननसाच्या बागेत आलेल्या आठ गव्यांची निर्घृण हत्या करून त्यांच्या मृत्यूचे प्रकरण दडपण्यात आले आणि त्यामुळे या प्रकरणातल्या संशयित गुन्हेगारांची निर्दोष मुक्तता झाली. शहरी भागातील काही श्रीमंत मंडळी जंगली श्वापदांची शिकार करण्याचा शौक पुरवून घेण्यासाठी धारबांदोडा तालुक्यातल्या जंगलात शिकारीला येत असतात. आगलोट - मुर्गे येथे मृत आणि अत्यंत कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या वाघाचे शरीर येथील जंगलात तीन ठिकाणी विखुरलेले होते.

Tiger Death Sakorda Goa
Goa Tiger Deaths: सावध व्हा! म्हादईच्या जंगलात वाघांच्या रक्ताचा सडा, गोळावलीतील 'ते' हत्याकांड पुन्हा चर्चेत; एकाच वेळी नर, वाघीण आणि दोन बछड्यांचा क्रूर बळी

त्यावरून त्याची शिकार तर झाली नाही ना? असा संशय व्यक्त केला जात आहे. सहा वाघांच्या मृत्यूने गोवा सरकारच्या वन खात्याची बेपर्वा कार्यप्रणाली चर्चेत आलेली आहे. या पूर्वीच्या दोन प्रकरणात गुन्हेगारांना शिक्षा झालेली नाही आणि त्या संदर्भातला पाठपुरावाही केलेला नाही त्यामुळे हे तिसरे प्रकरण त्या दिशेने जाणार आहे का? एकंदर ६ वाघांचा मृत्यू १७ वर्षांच्या कालखंडात होणे हे साक्षरतेचे प्रमाण लक्षणीय असणाऱ्या राज्याला लज्जास्पद आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com