

वास्को: सडा चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याच्या प्रस्तावाला विरोध दर्शवत स्थानिक शिवप्रेमींनी सह्यांच्या मोहिमेचा प्रारंभ गुरुवारी केला. मुरगाव बंदर प्राधिकरणाने मोठ्या मनाने निर्णय घेऊन पुतळा तेथून हलवू नये, अशी भावनिक मागणी नागरिकांकडून होत आहे.
हा पुतळा १९ फेब्रुवारी रोजी सडा येथील चौकाजवळील विनावापर जागेवर उभारण्यात आला होता. मात्र, या उभारणीवर हरकत घेत मुरगाव बंदर प्राधिकरणाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सुनावणीनंतर न्यायालयाने पुतळा हटवण्याचा आदेश दिला होता.
त्या अनुषंगाने १६ एप्रिल रोजी पुतळा हटवण्याची कार्यवाही करण्यात येणार होती. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पोलिस अधीक्षक, उपजिल्हाधिकारी, मामलेदार, पोलिस निरीक्षक तसेच मुरगाव बंदर प्राधिकरणाचे अधिकारी यांची १५ एप्रिल रोजी संयुक्त बैठक पार पडली.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सशस्त्र पोलिस दल तैनात ठेवण्यासह आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. मात्र, परिस्थितीचा विचार करून पुतळा हटवण्याची प्रस्तावित कारवाई पुढे ढकलण्याचा निर्णय बैठकीत घेतला.
पुतळा हटवला जाणार असल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोठ्या संख्येने शिवप्रेमींनी जमण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, निर्णय पुढे ढकलल्याची माहिती मिळाल्यानंतर गर्दी कमी झाली. तरीही काही शिवप्रेमी १६ एप्रिल रोजी पुतळ्यासमोर एकत्र येत सह्यांच्या मोहिमेला सुरवात केली. ही मोहीम पुढील काही दिवस सुरू राहणार असून, जमा झालेल्या सह्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन सादर करण्यात येणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.