Ashadhi Ekadashi Wari 2026: 'विठू माऊलीचा जयघोष अन् भक्तीचा महापूर!' गोव्यातील गावोगावी हरिनामाचा गजर; टाळ-मृदंगाच्या तालावर रंगला आषाढीचा सोहळा

Pandharpur Vitthal Wari: भारतीय संस्कृतीत प्रत्येक सण-उत्सवामागे अध्यात्म, संस्कार आणि सामाजिक मूल्ये दडलेली आहेत.
Pandharpur Vitthal Wari
Ashadhi Ekadashi Wari 2026Dainik Gomantak
Published on
Updated on

संजय घुग्रेटकर

भारतीय संस्कृतीत प्रत्येक सण-उत्सवामागे अध्यात्म, संस्कार आणि सामाजिक मूल्ये दडलेली आहेत. या परंपरेतील सर्वांत भावस्पर्शी आणि जनमानसाच्या हृदयात घर करून राहिलेला उत्सव म्हणजे आषाढी एकादशी. आषाढ शुद्ध एकादशीला लाखो वारकरी "ज्ञानोबा-तुकोबा"चा जयघोष करत पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी निघतात. आज सगळीकडे आषाढी एकादशी साजरी करण्यात येत आहे.

आषाढी एकादशीला महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तेलंगणा तसेच देशाच्या विविध भागांतून लाखो भाविक पंढरपूरमध्ये एकत्र येतात. टाळ, मृदंग, वीणा, भगव्या पताका, तुळशीची माळ आणि मुखी विठ्ठलनाम... अशा भक्तिमय वातावरणात संपूर्ण पंढरपूर जणू भक्तिरसात न्हाऊन निघते. चंद्रभागेच्या तीरावर उभा असलेला विठ्ठल हा केवळ मंदिरातील देव नसून प्रत्येक भक्ताच्या मनातील आशा, श्रद्धा आणि विश्वासाचे प्रतीक आहे.

Pandharpur Vitthal Wari
Ashadhi Ekadashi Wari: गुढी घेऊन निघाली वारी, चैतन्यभूमी पंढरपुरी

वारकरी संप्रदाय हा भारतातील सर्वात मोठ्या लोकआध्यात्मिक चळवळींपैकी एक मानला जातो. संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम महाराज, संत जनाबाई, संत सावता माळी, संत गोरा कुंभार, संत नरहरी सोनार, संत चोखामेळा, संत मुक्ताबाई अशा अनेक संतांनी भक्तीचा मार्ग सर्वांसाठी खुला केला. त्यांनी कर्मकांडापेक्षा नामस्मरण, सेवा, सदाचार आणि समतेचा मार्ग समाजासमोर ठेवला.

"विठ्ठल सर्वांचा आहे" हा वारकरी संप्रदायाचा मूलमंत्र आहे. त्यामुळे येथे जात, धर्म, भाषा, श्रीमंती-गरिबी किंवा उच्च-नीच असा कोणताही भेद मानला जात नाही. प्रत्येक वारकरी एकमेकांना "माऊली" म्हणून संबोधतो. या एका शब्दात प्रेम, आपुलकी, समानता आणि बंधुभाव दडलेला आहे. आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि देहूहून संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करते. शेकडो किलोमीटरचा हा प्रवास लाखो वारकरी पायी पूर्ण करतात.

Pandharpur Vitthal Wari
Pandharpur: दर्शन, चंद्रभागेपासून विठ्ठल चरणांपर्यंत!

ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता भक्त विठ्ठलनामाचा अखंड गजर करत वाटचाल करतात. दिंड्यांमधील शिस्त, सामूहिक प्रार्थना, अभंगगायन, रिंगण सोहळा, भारूड, कीर्तन आणि हरिपाठ यामुळे वारी हा केवळ धार्मिक कार्यक्रम राहत नाही, तर तो संस्कृती, लोकजीवन आणि सामाजिक ऐक्याचा जिवंत उत्सव बनतो. पंढरपूरच्या विठ्ठलाशी जोडलेली पुंडलिकाची कथा प्रत्येक भक्ताला प्रेरणा देते.

माता-पित्याची अखंड सेवा करणाऱ्या पुंडलिकाच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान श्रीकृष्ण स्वतः त्याला भेटण्यासाठी आले. त्या वेळी सेवेत व्यत्यय येऊ नये म्हणून पुंडलिकाने विट पुढे सरकवली आणि भगवान त्या विटेवर उभे राहिले. भक्ताची सेवा आणि कर्तव्यनिष्ठा पाहून ते तेथेच स्थिरावले. म्हणूनच विठ्ठलाला "विटेवरी उभा राहिलेला देव" म्हणून ओळखले जाते. या कथेतून सेवा हीच सर्वोच्च भक्ती असल्याचा संदेश मिळतो.

Pandharpur Vitthal Wari
Wari: विठ्ठलनामाचा गजर, पंढरीकडे वारकऱ्यांची वाटचाल; पिळगाव येथून प्रथमच निघाली पायीवारी, महिलांसह एकूण 160 जणांचा सहभाग

देवापेक्षा आई-वडिलांची सेवा आणि कर्तव्यपूर्ती यांनाही भारतीय संस्कृतीत सर्वोच्च स्थान दिले गेले आहे.वारकरी परंपरेचा आत्मा म्हणजे अभंग. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव आणि इतर संतांनी रचलेले अभंग आजही लाखो भक्तांच्या ओठांवर आहेत. या अभंगांतून ईश्वरभक्ती, नैतिकता, समाजप्रबोधन, समता आणि जीवनाचे तत्त्वज्ञान सहज भाषेत मांडले गेले आहे.अभंग हे केवळ साहित्य नसून जीवन जगण्याची दिशा देणारे विचार आहेत. म्हणूनच वारकरी चालतो तेव्हा त्याच्या पावलांत ताल असतो आणि मुखी अभंग असतो.

आषाढी एकादशी हा केवळ कॅलेंडरवरील सण नाही; ती भक्ती, सेवा, समता, त्याग, संस्कार आणि माणुसकीचा उत्सव आहे. लाखो वारकऱ्यांच्या पावलांतून वाहणारी ही परंपरा भारतीय संस्कृतीचे चिरंतन वैभव आहे. विठ्ठलनामाचा गजर माणसाला स्वतःशी जोडतो, समाजाशी जोडतो आणि परमेश्वराशी जोडतो. आज प्रत्येकाने संतांच्या शिकवणीचा स्वीकार करून सत्य, प्रेम, करुणा, सेवा आणि समतेच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करणे हीच आषाढी एकादशीची खरी पूजा ठरेल. "विठ्ठल नामाचा अखंड गजर प्रत्येकाच्या जीवनात आशा, श्रद्धा, समाधान आणि माणुसकीची ज्योत प्रज्वलित करो. सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!"

Pandharpur Vitthal Wari
Goa Culture: गोव्यातील मूर्ती अर्पण करण्याची दुर्मिळ परंपरा आणि कृषी संस्कृतीचे महत्व; निसर्ग संस्कृतीतील टेराकोटा

गोव्यातील वारकरी परंपरा

गोव्यातही वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा आहे. फोंडा, माशेल, प्रियोळ, डिचोली, आमोणा, मुळगाव, साखळी आणि इतर अनेक भागांतील वारकरी मंडळे दरवर्षी पंढरपूर वारीत सहभागी होतात. गावागावांत हरिनाम सप्ताह, भजन, कीर्तन, दिंडी, प्रवचने आणि सामुदायिक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

गोव्यातील अनेक देवस्थानांत आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटेपासून हरिनामाचा गजर सुरू होतो. युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. ही परंपरा नवीन पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य अनेक वारकरी मंडळे सातत्याने करत आहेत. माशेलसारख्या ठिकाणी देवकीकृष्ण संस्थानतर्फे एकादशीनिमित्त अखंड भजन सप्ताह साजरा केला जातो, त्यानंतर दुसऱ्या दिवशी चिखलकाला उत्साहात पाडतो. यंदा हा चिखलकाला रविवार, २६ रोजी पार पडणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com