Goa Culture: गोव्यातील मूर्ती अर्पण करण्याची दुर्मिळ परंपरा आणि कृषी संस्कृतीचे महत्व; निसर्ग संस्कृतीतील टेराकोटा

Sattari ancient sculptures: गोव्यातील भुईपाल, खोडीये आणि साकोर्डा या तिन्ही ठिकाणी मूर्ती अर्पण करण्याच्या परंपरेशी जोडलेल्या गोष्टी, आपल्याला कृषी संस्कृतीशी जोडतात.
Sattari ancient sculptures
Sattari ancient sculpturesDainik Gomantak
Published on
Updated on

अ‍ॅड. सूरज मळीक

मातीला हवा तसा आकार देऊन आगीत भाजल्याने ती कडक आणि टिकाऊ बनते, हे जेव्हा माणसाच्या लक्षात आले तेव्हापासून आजतागायत मानव मातीपासून नाना तर्‍हेच्या कलाकृती बनवून सर्जनशीलतेचा आविष्कार घडवत आलेला आहे. लॅटिन भाषेतील ‘टेरा’ म्हणजे माती आणि ‘कोटा’ म्हणजे भाजलेली, या दोन शब्दांपासून ‘टेराकोटा’ हा शब्द बनलेला आहे.

जागतिक स्तरावर ही परंपरा उच्च पुरापाषाण युगात आढळलेली असली तरी भारतीय उपखंडात त्याचे पुरावे नवाश्म युगात आढळलेले आहे. मेहेरगड येथे आढळलेल्या आकृती इसवी सन पूर्व ७००० मधील आहेत.

सिंधू संस्कृतीपासून ते मौर्य, शुंग, सातवाहन, कुशाण आणि गुप्त काळापर्यंतच्या भारतीय इतिहासात टेराकोटाचा वापर खेळणी, सजावटीच्या वस्तू आणि धार्मिक विधींसाठी केला जात होता. मातीला आकार देऊन ती आगीत भाजली तर ती दगडाइतकी कडक आणि टिकाऊ बनते हे त्यांच्या लक्षात आले.

सिंधू संस्कृतीतील मोहेंजोदडो आणि हडप्पा येथील उत्खननात सापडलेल्या मुद्रा, खेळणी, भांडी, माणसांच्या मूर्ती या कलेच्या प्राचीनतेची साक्ष देतात.

आजही अनेक सण उत्सव आणि विधींमध्ये टेराकोटाच्या मूर्तींना विशेष महत्त्व लाभलेले पाहायला मिळते. गोव्याबरोबर केरळ, झारखंड आणि गुजरात या राज्यांमध्ये ही कला आजही जोपासली जाते. यामध्ये प्रामुख्याने वाघ, गेंडा, हत्ती, घोडे आणि बैल यांसारख्या प्राण्यांच्या मूर्ती तसेच मानवी आकृती आणि देवांना अर्पण करायच्या वस्तू बनवल्या जातात.

या परंपरेचे उत्तम उदाहरण गोव्यातील सत्तरी तालुक्यातील भुईपाल आणि खोडीये व धारबांदोड्यातील उधळशे या गावांत पाहायला मिळते.

भुईपाल हा गाव पश्चिम घाटाच्या पायथ्याशी वसलेला आहे. पुरातत्त्वीयदृष्ट्या एकेकाळी हा प्रदेश मौर्य साम्राज्याचा भाग होता आणि नंतर येथे भोज, बदामी चालुक्य आणि कदंब यांसारख्या प्रमुख राजवंशांनी राज्य केले. या गावातील सूर्यकांत गावकर आणि पर्यावरण इतिहास अभ्यासक राजेंद्र केरकर यांनी भुईपाल येथील या मूर्तीसंदर्भात पुरातत्त्व संशोधक ऋत्विज आपटे यांना माहिती दिली.

गावातील ‘पिशेबाय’ या देवराईजवळ जपून ठेवलेल्या या एकूण १८२ वैशिष्ट्यपूर्ण मूर्तींचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला. या छोटेखानी मूर्तींची एकंदर लांबी २५.३ सेमी इतकी असून रुंदी ६.५ सेमी इतकी आहे. पुरातत्त्व शास्त्रज्ञ डॉ. शंकर साळी यांनी भुईपालला गोव्यातील इतिहासपूर्व कालखंडाच्या यादीत समाविष्ट केले आहे.

खोडीये या गावातदेखील पुरातत्वीय संचिते आढळलेली आहेत. ग्रामस्थांनुसार कधीकाळी आपल्या शेतात भरपूर पिकाची पैदास व्हावी या भावनेने दसऱ्याच्या दरम्यान महिला या मूर्ती तयार करून ओढ्याच्या काठी अर्पण करत असत.

काळाच्या ओघात स्त्रिया आज टेराकोटाच्या मूर्तींऐवजी लहान दगडांची पूजा करतात. तरी पूर्वजांनी अर्पण केलेल्या मूर्ती आज महाकाय पाषाणाच्या कुशीत सुरक्षित ठेवलेल्या पाहायला मिळतात.

संशोधकांना आढळलेल्या या मूर्तींपैकी ३०% मूर्ती प्राण्यांच्या आहेत. जमिनीवर सरपटणारे साप असो किंवा पाण्यात पोहणारे मासे, त्या काळातील मानवाने या जिवाचा बारकाईने अभ्यास केला होता. यामध्ये कासवांच्या सर्वाधिक (१६) मूर्ती आढळलेल्या आहेत. त्याच्या पाठीवरचे कवच आणि पाय कलाकाराने अतिशय जिवंतपणे साकारले आहेत.

नऊ खेकड्यांच्या मूर्तींचे चपटे शरीर आणि ६ ते ८ पाय स्पष्ट दाखवलेले आहेत. विविध आकाराचे मासेदेखील विशेष दृष्टीस पडतात. त्याचबरोबर सरडे, पक्षी आणि कुत्र्यांच्या मूर्ती अतिशय कल्पकतेने बनवलेल्या आहेत. १५ सापांच्या मूर्तींमध्ये त्यांचे डोके आणि अंगावरील नक्षी दाखवण्यात आली आहे.

या संग्रहातील सर्वात लक्षवेधी म्हणजे माणसांच्या आकृत्या. त्यातही विशेषतः वेगवेगळी वाद्ये वाजवणारे संगीतकार. १८ वादक ढोलकीसारखे वाद्य वाजवताना दिसतात, तर ६ माणसे टाळ वाजवत आहेत तर एक माणसाच्या डोक्यावर टोपी असून तो हातात काठ्या घेऊन ताशा वाजवत असल्याचे दिसते. त्याचबरोबर १८ वादक पवनवाद्ये वाजवत आहेत. ही सर्व वादक मंडळी आपल्याला पूर्वीच्या काळातील लोकसंगीताची आठवण करून देतात.

मानवी जीवनातील विविध अवस्थांचे दर्शनही येथे घडते. येथे असलेल्या ३६ मूर्ती उभ्या असून त्यांचा एक हात कंबरेवर आहे. यातील एक स्त्री गर्भवती असल्याचेदेखील दाखविण्यात आले आहे. यातून कलाकारांची निरीक्षणशक्ती आणि कलात्मकतेचा प्रत्यय येतो.

संशोधकाने आपल्या अभ्यासात ‘संयुक्त’ मूर्तींचे विशेष वर्गीकरण केलेले आहे. घोड्यावर स्वार झालेले योद्धा किंवा नौकांमध्ये बसलेले खलाशी आणि त्यांच्या हातातील वल्हे, पूर्वीच्या काळातील व्यवहाराची जणू साक्ष देतात.

Sattari ancient sculptures
Bicholim Village Art Project : '..सुंदर आमुचे गाव'! डिचोली होणार कलरफुल; कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतली जबाबदारी

होडीला बांधलेल्या मृतदेहाची आकृती गोव्यातील एका प्राचीन आणि आगळ्यावेगळ्या अंत्यविधीवर प्रकाश टाकते. या मूर्तीमध्ये एका मृत व्यक्तीचा देह होडीला दोन दोरीसारख्या वस्तूंनी बांधल्यासारखे दृष्टीस पडते. यासारखी प्रथा कधीकाळी तिसवाडी तालुक्यातील आखाडा बेटावर (सांत इस्तेव्ह) प्रचलित असल्याचे त्यांच्या लक्षात आले. अखाडा बेटाची जमीन अत्यंत पवित्र मानल्याने येथील मृतदेहाला होडीला बांधून शेजारच्या गावात अंत्यविधीसाठी नेले जायचे.

पिसुर्ले ग्रामपंचायत क्षेत्रात येणाऱ्या खोडीये या गावात कोरडीच्या आजोबांचे (राखणदार) लग्न लावण्यासाठी मृण्मय मूर्ती बनवल्या जातात. राखणदाराचे स्थान डोंगरवरील एका घोटींग वृक्षाच्या सांनिध्यात आहे.

Sattari ancient sculptures
Serendipity Arts Festival Goa: कला आणि संस्कृतीचा गोव्यात महासंगम! 12 ते 21 डिसेंबरदरम्यान सेरेन्डिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल

दर वर्षी कुंभारवाडा येथील कुंभार लग्न विधीसाठी लागणाऱ्या नानाविध मूर्ती बनवतात. मगर, मासा, मोर, कुत्रा त्याचबरोबर विविध वाद्ये व काही महिला व पुरुषांच्या मूर्ती बनवतात. विशेषतः नवरा व नवरीची मूर्ती मोठ्या आकाराची बनवली जाते. गावातील तेंडुलकर कुटुंबीय या मूर्ती विकत घेऊन गावकऱ्यांकडे नेऊन देतात. त्यानंतर देवचाराचे लग्न लावण्याचे कार्य गावकरी पार पाडतात. अडवईच्या दिशेने वाहणाऱ्या नदीच्या काठावरील एका ठिकाणी या मूर्तींची मांडणी करून विवाह सोहळा होतो. अशाप्रकारे तीन वेगवेगळ्या समाजातील लोकमानसाचे अनुबंध सुदृढ करण्याचे कार्य या मृण्मय मूर्तींमधून घडत असते. या गावातील ग्रामस्थांनी आजही देवाला मूर्ती अर्पण करण्याची ही समृद्ध परंपरा सुरू ठेवलेली आहे.

साकोर्डा येथे असलेल्या मूर्तीतील बासुरीसारखे वाद्य वाजवणाऱ्या मूर्तीला गोपाळ देव म्हणून त्याला देवाच्या रूपात पाहिले जाते. गोव्यातील भुईपाल, खोडीये आणि साकोर्डा या तिन्ही ठिकाणी मूर्ती अर्पण करण्याच्या परंपरेशी जोडलेल्या गोष्टी, आपल्याला कृषी संस्कृतीशी जोडतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com