Pandharpur: दर्शन, चंद्रभागेपासून विठ्ठल चरणांपर्यंत!

Pandharpur Pilgrimage Experience: गाडी जशी पंढरपूरापासून दूर जाऊ लागली, तसं मन गलबलू लागलं.
Pandharpur Pilgrimage Experience
PandharpurDainik Gomantak
Published on
Updated on

डॉ. रुपेश पाटकर

गाडी जशी पंढरपूरापासून दूर जाऊ लागली, तसं मन गलबलू लागलं. संध्याकाळपर्यंत घरी पोचलो खरा, पण पुढचे दोन दिवस मनाने पंढरपुरातच होतो. पंढरपूरला भक्त माहेर का म्हणतात, ते कळायला लागलं.

जगाच्या पाठीवर कदाचित असा एकही धर्म वा संप्रदाय असणार नाही, ज्याचा देव विठ्ठलासारखा भक्तासाठी तिष्ठत उभा असेल! तुम्हीच विचार करा. म्हणजे त्यातील मौज लक्षात येईल. विठ्ठल पुंडलिकासाठी पंढरपुरात आला. पुंडलिकाला आपण भक्त म्हणतो, पण हा भक्त कसा होता? भक्त म्हटल्यावर आपल्या मनात जे येतं, त्या व्याख्येत बसणारा हा नव्हताच मुळी! तो विठ्ठलाची पूजा करत नव्हता, तो विठ्ठलाचे स्तोत्र गात नव्हता, तो विठ्ठलाला आळवतही नव्हता. मग तो काय करत होता? तो केवळ आपल्या आईवडिलांची अनन्यभावे सेवा करत होता.

Pandharpur Pilgrimage Experience
Pandharpur Wari: पावलो पंढरी वैकुंठ भुवनी! वैष्णवांचा मेळा डेरेदाखल, 15 लाख भाविकांची मांदियाळी

त्या सेवेत तो इतका तन्मय झाला होता की, दारी आपणहून आलेल्या देवासाठीही त्याच्याकडे सवड नव्हती! त्याच्या आईवडिलांच्या सेवेवर प्रसन्न होऊन साक्षात परब्रह्म साकार रुप घेऊन त्याला भेटायला आलं. अशी गोष्ट जगाच्या धार्मिक इतिहासात कुठे कोणी ऐकली असेल का? एकूणएक भक्तांच्या कथा ह्या ते त्यांच्या इष्टदेवतेची भक्ती करण्याच्या, इष्टदेवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी तप करण्याच्या आहेत.

पण पुंडलिक आणि विठ्ठल यातील हे नातं काही औरच आहे. आणि तो पुंडलिकही कसा? देव प्रसन्न होऊन दारी आला तर त्याच्याकडून काही ऐहिक मागायचं बाजूलाच राहो, त्याने अध्यात्मिक मुक्तीचीही अभिलाषा केली नाही. तो देवाला वाट बघायला सांगून निघून गेला, परत न येण्यासाठी. का? तर देव तिष्ठत रहावा, जेणेकरून जगभरच्या भक्तांना तो भेटावा म्हणून! भक्तानं निस्पृह तरी किती असावं, याची पराकाष्ठा म्हणजे भक्त पुंडलिक!

Pandharpur Pilgrimage Experience
Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

दिगंबर भाऊंनी मला पुंडलिकाच्या देवळात नेलं. मला विठ्ठलाचं दर्शन करवून द्यायची जबाबदारी दिगंबरभाऊंनी घेतली होती. दिगंबर पोद्दार हे माझे पंढरपूरातले स्नेही. मला आपल्या बाईकवर बसवून देवळाच्या परिसरात आले. ‘अधिक मास’ असल्याने देवळाच्या परिसरात भरपूर गर्दी होती. त्या गर्दीतून वाट काढताना ‘माऊली- माऊली’ असा मोठ्याने आवाज देत लोकांना वाट द्यायला सांगत होते. त्यांचे सहज निघत असलेले ‘माऊली माऊली’ शब्द मला अद्वैताची आठवण देत होते.

देवळात विग्रहाच्या रुपात माऊली आहेच, पण अवतीभोवती दाटीवाटीने असलेल्या माणसांत जी चिन्मयता आहे, ती काय आहे? जे तत्त्व मंदिरात मूर्त रुपाने विराजमान आहे, तेच तत्त्व प्रत्येक जीवमात्राच्या रुपाने नांदतं आहे. हेच प्रत्येक अनोळखी माणसाला ‘माऊली’ म्हणण्यामागचं रहस्य आहे! आम्ही चंद्रभागेच्या वाळवंटात आलो.

Pandharpur Pilgrimage Experience
Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

भीमेला पंढरपूरात चंद्रभागा म्हणतात. तिचं पात्र पाहताना ‘जेव्हा नव्हती गोदा गंगा, तेव्हा होती चंद्रभागा’ हे शब्द मनात आठवून डोळे पाणावले. चंद्रभागेचं पाणी मी ओल्या डोळ्यांना लावलं. तिच्या अगदी काठावरंच पुंडलिकाचं देऊळ आहे. पुंडलिकाचं दर्शन घेताना मन मात्र कल्पनेने आईवडिलांचे पाय दाबणारा पुंडलिक आणि त्याला भेटायला आलेलं सावळं परब्रह्म बघायला लागलं.

घाट चढून वर आल्यावर विठ्ठलाच्या मंदिराच्या बाहेर चोखोबांची समाधी आहे. ज्यांच्या हाडाहाडांतून ‘विठ्ठल विठ्ठल’ चा गजर चालू होता, त्या चोखोबांची समाधी. ‘अबीर गुलाल उधळीत रंग, नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग’ म्हणणारे चोखोबा! तिच्यासमोरच आहे विठ्ठल मंदिराची पायरी, नामदेव पायरी! ज्यांची ६० हून अधिक पदं शिखांच्या ग्रंथसाहीबमध्ये आहेत, अशा अखिल भारतीय संत नामदेव महाराजांची पायरी! काय या महान संताची इच्छा होती?

Pandharpur Pilgrimage Experience
Pandharpur Wari: पावलो पंढरी वैकुंठ भुवनी! वैष्णवांचा मेळा डेरेदाखल, 15 लाख भाविकांची मांदियाळी

आपल्या समाधीची पायरी व्हावी हीच इच्छा! होय, ज्याला आमच्यासारख्या तुच्छ भक्तांचे पाय लागावेत, अशी पायरी बनवे अशी इच्छा! यापेक्षा नम्रतेचा महामेरू जगात कोण असेल बरे! मंदिरात विठ्ठलाचं दर्शन घ्यायला भलीमोठी रांग होती. एके ठिकाणी एका सुकलेल्या झाडाची फांदी होती. दिगंबर भाऊ म्हणाले, ‘संत कान्होपात्रेचा वृक्ष’. मंगळवेढ्याच्या शामा वेश्येची ही मुलगी, चक्क संतत्वाला पोचलेली.

विठ्ठलाचं दर्शन घेता घेता मर्त्य शरीर सोडून विठ्ठलमय होऊन गेली. ‘नको देवराया अंत असा पाहू, प्राण हा सर्वथा फुटो पाहे’ हे तिचे आर्ततेने विठ्ठलाला आळवणारे शब्द मनात घुमून डोळे ओलावून गेले. संत कोन्होपात्रेपासून थोडं पुढं गेल्यावर दिसलं ते अठ्ठावीस युगं विटेवर उभं असलेलं सावळं परब्रह्म! ज्याला पाहून तुकोबारायांच्या तोंडून शब्द निघाले, ‘सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, कर कटेवरी ठेऊनिया!’ ज्ञानोबा माऊली म्हणाले, ‘रुप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी!’

Pandharpur Pilgrimage Experience
Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

रांग पुढे सरकत होती. मन भावविभोर होत होतं. हिच ती मूर्ती जिच्या पायावर ज्ञानोबा माऊलींपासून तुकोबारायांपर्यंत संतांनी डोकं ठेवलं. त्या चरणांवर डोकं ठेवण्याचं भाग्य मला लाभतंय या भावनेने झालेलं समाधान अपूर्व होतं. तो क्षण आता आठवतानाही डोळे भरून येत आहेत. विठ्ठलाच्या मंदिराच्या मागे रुक्मिणीमाऊलीचं मंदिर आहे. तिच्या देवळात जाताना मनानं ‘रखुमाई रुसली’ ची धून लावली. वेगवेगळ्या संतांच्या सेवेला धावतो म्हणून तक्रार करणारी रुक्मिणी माऊली.

संत दामाजीपंतांसाठी लंगोटी नेसून विठू महार झाला म्हणून तक्रार, संत सेनांसाठी राजाची हजामत करायला गेला म्हणून तक्रार. त्या लटक्या तक्रारींनी विठ्ठलाचं भक्तवल्लभरुप सांगणारी रुक्मिणी माऊली. रखुमाईच्या देवळाला लागूनच सत्यभामामाऊलीचं आणि राईमाऊलीचं पण देऊळ आहे. पण अलिकडे कदाचित गर्दीमुळे त्यांच्याजवळ जाता येत नाही. दर्शन घेऊन बाहेर आलो, आणि जनाबाईची आठवण झाली.

Pandharpur Pilgrimage Experience
Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

‘जनी जाय पाणीयासी, मागे धावे ऋषिकेशी’ हे शब्द कानात घुमू लागले आणि डोळे डोईवर घागर घेऊन जाणारी जनाबाई आणि तिच्यामागे धावणारा पाचसहा वर्षांचा गोपाळकृष्ण कल्पू लागले. तो दिवस पंढरपूरात राहिलो. दिगंबर भाऊ, महेश भाऊ, सीताराम भाऊ, समाधान भाऊ या पंढरपूरात रहाणाऱ्या चौघा स्नेह्यांच्या सहवासात उरलेला दिवस गेला. दिगंबर भाऊंच्या बाईकवरून फिरताना, महेश भाऊंच्या घरी चहापाणी पिताना, सीताराम भाऊंच्या हॉटेलात जेवताना मला त्यांच्या भाग्याचा हेवा वाटत होता.

त्यादिवशी पंढरपुरातच थांबलो होतो. रात्री उशिरापर्यंत झोप आली नाही. दिवसभर डोळ्यांनी आणि कल्पनेनं पाहिलंलं सर्व खूप वेळ आठवत राहिलं. दुसऱ्या दिवशी सातची गाडी पकडण्यासाठी लवकर आवरून निघालो. रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. गाडी वेळेत मिळाली. पण गाडी जशी पंढरपुरापासून दूर जाऊ लागली, तसं मन गलबलू लागलं. संध्याकाळपर्यंत घरी पोचलो खरा, पण पुढचे दोन दिवस मनाने पंढरपुरातच होतो. पंढरपूरला भक्त माहेर का म्हणतात, ते कळायला लागलं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com