

डिचोली: टाळ-मृदुंगाचा गजर आणि ‘ज्ञानबा तुकाराम, माऊली तुकाराम’ आदी श्री विठ्ठलनामाचा जयघोष करीत पिळगाव येथून प्रथमच पायीवारी पंढरपूरला मार्गस्थ झाली आहे. श्री सातेरी शांतादुर्गा माऊली वारकरी संस्थेच्या बॅनरखाली वारकऱ्यांनी शनिवारी (ता.११) पंढरीची वाट धरली आहे.
महिलांसह युवक मिळून जवळपास १६० वारकरी पिळगावहून पायीवारी करीत पंढरपूरला जाण्यासाठी मार्गस्थ झाले आहेत. यात वयस्क वारकऱ्यांचाही समावेश आहे. संस्थेच्या अध्यक्ष सुनंदा प्रभुगावकर आदी पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली हे वारकरी आषाढी एकादशीनिमित्त चंद्रभागातीरी भरणाऱ्या विठ्ठलभक्तांच्या मेळ्यात सहभागी होण्यासाठी पंढरपुरात जाण्यासाठी निघाले आहेत.
सकाळी पिळगाव येथील श्री शांतादुर्गा देवी आणि अन्य देवदेवतांचे आशीर्वाद घेतल्यानंतर पंढरीच्या विठूमाऊलीच्या दर्शनाची ओढ लागलेल्या विठ्ठलभक्त वारकऱ्यांनी पायीवारीला प्रारंभ केला. पिळगावहून डिचोली, नानोडा-कासारपालहून दोडामार्गमार्गे वारकरी पायी प्रवासासाठी निघाले आहेत. पायीवारीला सुरवात करताना पावसाने उघडीप केल्याने वारकऱ्यांमध्ये चैतन्यदायी वातावरण पसरले होते.
मान्यवरांकडून वारकऱ्यांना शुभेच्छा
पिळगावचे एक ज्येष्ठ नागरिक अर्जुन प्रभुगावकर यांनी बावटा दाखवून पायीवारीला सुरवात केली. यावेळी संस्थेच्या अध्यक्ष सुनंदा प्रभुगावकर, सचिव ॲड. अजय प्रभुगावकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. तेरा दिवस पायी चालत हे वारकरी पंढरपूर गाठणार आहेत. दुपारी आणि रात्री ठरावीक ठिकाणी आश्रय घेत वारकरी मार्गक्रमण करणार आहेत. या वारकऱ्यांना निरोप देण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह शुभचिंतकांनी गर्दी केली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.