Global: अमेरिकेने २५० वर्षांत जगाला काय दिले?

America 250 Years Of Independence: नुकताच, ४ जुलैला अमेरिकेचा २५०वा स्वातंत्र्यदिन साजरा झाला.
America 250 Years Of Independence
GlobalDainik Gomantak
Published on
Updated on

डॉ. नंदकुमार मुकुंद कामत

नुकताच, ४ जुलैला अमेरिकेचा २५०वा स्वातंत्र्यदिन साजरा झाला. ‘अटलांटिक’ किनाऱ्यावरील १३ वसाहतींपासून सुरू झालेला अमेरिकेचा प्रवास लोकशाही, विज्ञान, संशोधन आणि नवकल्पनांच्या बळावर जगाच्या इतिहासावर प्रभाव टाकणारा ठरला. या वाटचालीतून भारतासह अनेक देशांना प्रेरणा, संधी आणि सहकार्याचे नवे मार्ग मिळाले. या ऐतिहासिक प्रवासाचा घेतलेला हा समर्थ आढावा...

यंदाचा चार जुलै हा केवळ अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन नाही, तर एका ऐतिहासिक प्रवासाचा महत्त्वाचा टप्पा ठरला. दोनशे पन्नास वर्षांपूर्वी अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसलेल्या तेरा वसाहतींनी ब्रिटिश साम्राज्यापासून स्वतंत्र राष्ट्र होण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यावेळी जगात लोकशाही हा अपवाद होता आणि राजेशाही हा नियम. त्या नव्या राष्ट्राचा प्रयोग यशस्वी होईल, असे फार थोड्यांना वाटत होते. पण, त्या प्रयोगाने पुढे जगाच्या इतिहासाला नवे वळण दिले. आज जगात अमेरिकेबद्दल कितीही भिन्न मते असली, तिच्या धोरणांवर कितीही चर्चा होत असली, तरी गेल्या अडीचशे वर्षांत तिने जगाला दिलेल्या अनेक देणग्या कोणताही अभ्यासक नाकारू शकत नाही.

America 250 Years Of Independence
Republic Day 2026 Wishes: भारतात जन्मलो, हेच माझे भाग्य महान! प्रजासत्ताक दिनी शेअर करा 'हे' शुभेच्छा संदेश

लोकशाहीवरील विश्वास अमेरिकेची सर्वांत मोठी देणगी म्हणजे लोकशाहीवरील विश्वास. सत्ता ही राजाची नसून जनतेची असते, सरकार जनतेपुढे जबाबदार असते, व्यक्तीला विचारस्वातंत्र्य आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य असते, न्यायालये स्वतंत्र असतात, कायदा सर्वांना समान असतो आणि सत्तेचे शांततेने हस्तांतरण होते, या संकल्पना आज जगाला स्वाभाविक वाटतात. पण, या कल्पना दृढ करण्यासाठी अनेक पिढ्यांनी संघर्ष केला. अमेरिकेच्या संविधानाने आणि ते जपणाऱ्या संस्थांनी अनेक देशांना प्रेरणा दिली.

भारताच्या राज्यघटनेच्या निर्मितीच्या काळातही अमेरिकेतील काही घटनात्मक तत्त्वांचा अभ्यास करण्यात आला होता. अर्थात, भारताने स्वतःची स्वतंत्र लोकशाही उभी केली; परंतु जगभरातील लोकशाही प्रयोगांमध्ये अमेरिकेचा अनुभव महत्त्वाचा मानला गेला. लोकशाहीइतकीच महत्त्वाची अमेरिकेची दुसरी देणगी म्हणजे ज्ञानाची उपासना. कोणत्याही राष्ट्राची खरी संपत्ती सोने, चांदी किंवा तेल नसते; ती असते माणसाची बुद्धिमत्ता.

America 250 Years Of Independence
America Attack Iran: अमेरिकेचा इराणवर 24 तासांत दुसरा हल्ला; होर्मुझ सामुद्रधुनीजवळील लष्करी ठिकाणं उद्ध्वस्त VIDEO

हा विचार अमेरिकेने कृतीत उतरवला. जगातील अनेक नामांकित विद्यापीठे, संशोधन संस्था, ग्रंथालये, संग्रहालये आणि प्रयोगशाळा अमेरिकेत उभ्‍या राहिल्‍या. या संस्थांनी केवळ अमेरिकन विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर जगभरातून आलेल्या लाखो विद्यार्थ्यांना शिक्षण आणि संशोधनाची संधी दिली. भारतातील हजारो विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेले आणि त्यांनी तेथील ज्ञान, शिस्त, संशोधनाची पद्धत आणि नावीन्याची वृत्ती भारतात आणली. या ज्ञानविनिमयाचा लाभ दोन्ही देशांना झाला.

संशोधकांचे योगदान

विज्ञानाच्या क्षेत्रात अमेरिकेचे योगदान तर विलक्षण आहे. विसाव्या आणि एकविसाव्या शतकातील असंख्य शोध, संशोधन आणि तांत्रिक प्रगतीमागे अमेरिकेतील विद्यापीठे, संशोधन संस्था आणि उद्योग यांचे योगदान आहे. आधुनिक वैद्यकशास्त्रातील अनेक औषधे, निदान पद्धती, प्रत्यारोपण तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, जनुक संशोधन, कृत्रिम अवयव, वैद्यकीय उपकरणे आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील अनेक सुधारणा अमेरिकन संशोधनातून विकसित झाल्या. जगातील अनेक साथीच्या रोगांविरुद्धच्या लढ्यात अमेरिकेतील संशोधकांनी मोलाचे काम केले. संशोधन हे केवळ प्रयोगशाळेत न राहता समाजाच्या उपयोगी पडले पाहिजे, हा दृष्टिकोन त्यांनी जोपासला.

America 250 Years Of Independence
Venezuela Earthquake: व्हेनेझुएलात भूकंपाचा महातांडव! 235 मृत्यू, 39 हजार नागरिक बेपत्ता; ढिगाऱ्याखालून येताहेत किंकाळ्या

डिजिटल युगाचा पाया

संगणक क्रांतीचा विचार केला, तर आधुनिक जगाची कल्पनाच अमेरिकेशिवाय पूर्ण होत नाही. आज आपण हातातील मोबाईलवरून जगाशी जोडलेलो आहोत. इंटरनेट, ई-मेल, क्लाऊड संगणक, कृत्रिम बुद्धिमत्ता, सामाजिक माध्यमे, डिजिटल नकाशे, ऑनलाइन शिक्षण, ई-व्यापार आणि असंख्य संगणकीय सेवा यांचा पाया अमेरिकेतील संशोधन, उद्योग आणि नवकल्पनांनी घातला. या क्षेत्रात इतर अनेक देशांनीही मोठे योगदान दिले आहे; परंतु आधुनिक डिजिटल युगाला चालना देणाऱ्या अनेक कल्पना अमेरिकेत आकाराला आल्या.

विशेष म्हणजे, या परिवर्तनात भारतीय अभियंते, वैज्ञानिक आणि उद्योजक यांचेही मोठे योगदान आहे. त्यामुळे ही केवळ अमेरिकेची नव्हे, तर जगाच्या सहकार्याची यशोगाथा आहे. अवकाश संशोधन हे अमेरिकेच्या इतिहासातील आणखी एक उज्ज्वल पान आहे. चंद्रावर मानवाचे पहिले पाऊल पडले, तेव्हा पृथ्वीवरील प्रत्येक देशातील लोकांनी तो क्षण पाहिला. अवकाश मोहिमा, उपग्रह तंत्रज्ञान, पृथ्वी निरीक्षण, हवामानशास्त्र, सागरी अभ्यास, शेती, आपत्ती व्यवस्थापन आणि दळणवळण या सर्व क्षेत्रांना अवकाश संशोधनामुळे नवी दिशा मिळाली. आज भारताची अवकाश संस्था जगात मानाचे स्थान मिळवत आहे. भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये या क्षेत्रात वाढत असलेले सहकार्य भविष्यासाठी आशादायक आहे.

America 250 Years Of Independence
न्यूयॉर्कमध्ये 'महाराष्ट्र-गुजरात दिन' जल्लोषात साजरा! दोन राज्यांच्या संस्कृतीचा महासंगम; देशाच्या जीडीपीत दोन्ही राज्यांचं 25 टक्के योगदान

उद्योजकतेची नवी संस्कृती

अमेरिकेने जगाला उद्योग आणि उद्योजकतेची नवी संस्कृती दिली. एखादी कल्पना लहान असली, तरी तिच्यावर विश्वास ठेवून कठोर परिश्रमाने ती जागतिक पातळीवर नेता येते, हे अमेरिकेने दाखवून दिले. अनेक तरुणांनी लहान गॅरेज, वसतिगृह किंवा घरातून सुरू केलेले उद्योग पुढे जगातील मोठ्या कंपन्यांमध्ये रूपांतरित झाले. अपयश आले म्हणून प्रयत्न सोडायचे नाहीत, हा आत्मविश्वास अमेरिकन समाजात दिसून येतो. त्यामुळे नवकल्पनांना प्रोत्साहन देणारे वातावरण निर्माण झाले. याच वातावरणाचा लाभ अनेक भारतीय उद्योजकांनाही झाला.

चिकित्सक नजर, क्षमता

कृषी क्षेत्रातही अमेरिकेने महत्त्वाचे योगदान दिले आहे. सुधारित बियाणे, शेतीचे यांत्रिकीकरण, मृदासंवर्धन, सिंचन, अन्नसाठवण, कृषी संशोधन आणि कृषी शिक्षण या क्षेत्रांत विकसित झालेल्या अनेक पद्धती जगभर पोहोचल्या. भारतातील हरितक्रांतीच्या काळातही अमेरिकेतील संशोधन संस्था आणि तज्ज्ञांशी सहकार्य झाले. त्यामुळे भारत अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण होण्याच्या प्रवासात महत्त्वाची मदत मिळाली. इतकेच नव्हे, तर साहित्य, संगीत, चित्रपट, पत्रकारिता, क्रीडा, लोकसंस्कृती आणि सामाजिक चळवळींच्या माध्यमातूनही अमेरिकेने जगावर मोठा प्रभाव टाकला. विविध भाषा, विविध धर्म, विविध संस्कृती आणि विविध देशांतून आलेल्या लोकांनी एकत्र राहून नवे समाजजीवन उभारण्याचा प्रयत्न केला. तो प्रवास सहज नव्हता. त्यात संघर्षही होते, चुका झाल्या, त्यांची दुरुस्तीही झाली. पण, स्वतःकडे चिकित्सक नजरेने पाहण्याची क्षमता ही कोणत्याही लोकशाहीची ताकद असते. अमेरिकेच्या प्रवासात ही ताकद वारंवार दिसून येते.

America 250 Years Of Independence
Iran America Tension: 'आत्ताच्या आत्ता देश सोडा...' ईराणमध्ये उडणार युद्धाचा भडका? ट्रम्प यांच्या धमकीनंतर अमेरिकेचा अल्टीमेटम

गुणवत्तेला संधी देणारी व्‍यवस्‍था

जगात फार थोडे देश असे आहेत की, जेथे जगाच्या जवळजवळ प्रत्येक कोपऱ्यातून लोक शिक्षण, संशोधन, उद्योग, नोकरी किंवा नवजीवनाच्या शोधात येतात. अमेरिकेने ही ओढ निर्माण केली ती केवळ आर्थिक समृद्धीमुळे नव्हे, तर गुणवत्तेला मिळणाऱ्या संधीमुळे. कोणत्याही देशातून आलेला विद्यार्थी, वैज्ञानिक किंवा उद्योजक आपल्या ज्ञानाच्या बळावर पुढे जाऊ शकतो, ही भावना लाखो लोकांना अमेरिकेकडे आकर्षित करत राहिली. भारतीय समुदायानेही या संधींचा मोठा लाभ घेतला. आज अमेरिकेतील भारतीय वंशाचे डॉक्टर, अभियंते, शास्त्रज्ञ, प्राध्‍यापक, उद्योगपती आणि संशोधक हे त्‍या देशाच्‍या प्रगतीचे भागीदार आहेत.

त्‍याचबरोबर त्‍यांनी भारताशी असलेले नातेही जपले आहे. ज्ञान, गुंतवणूक, संशोधन आणि सामाजिक कार्याच्‍या माध्‍यमातून त्‍यांनी भारताच्‍या विकासातही हातभार लावला आहे. आज जगातील अनेक मोठ्या तंज्ञज्ञान कंपन्‍यांच्‍या नेतृत्‍वात भारतीय वंशाचे अधिकारी दिसतात. हे चित्र केवळ भारतीयांच्‍या यशाचे नाही; तर गुणवत्तेला संधी देणाऱ्या व्‍यवस्‍थेचेही आहे. प्रतिभेला राष्‍ट्रीयत्‍वाच्‍या चौकटीत बंदिस्‍त न ठेवता तिचा जागतिक उपयोग करून घेण्‍याची वृत्ती ही आधुनिक जगासाठी महत्‍वाची ठरली आहे. या अनुभवातून भारतालाही संशोधन, उद्योग व शिक्षण क्षेत्रात अनेक प्रेरणा मिळाल्‍या आहेत.

America 250 Years Of Independence
Iran America Tension: 'आत्ताच्या आत्ता देश सोडा...' ईराणमध्ये उडणार युद्धाचा भडका? ट्रम्प यांच्या धमकीनंतर अमेरिकेचा अल्टीमेटम

विज्ञानाच्या आधारावर कार्य

पर्यावरण, हवामान, समुद्र, जैवविविधता आणि नैसर्गिक साधनसंपत्ती यांच्‍या अभ्‍यासातही अमेरिकेतील संस्‍थांनी मोठे योगदान दिले आहे. पृथ्‍वी निरीक्षण करणारे उपग्रह, हवामान अंदाज, महासागरांचा अभ्‍यास, जंगलांवरील संशोधन, भूकंप, चक्रीवादळे आणि इतर नैसर्गिक आपत्तींचे निरीक्षण यांमुळे जगातील लाखो लोकांचे प्राण आणि संपत्ती वाचवण्‍यास मदत झाली आहे. हवामान बदल ही आज संपूर्ण मानवजातीसमोरील समस्या आहे. तिचे उत्तर कोणत्याही एका देशाकडे नाही. अशा वेळी भारत आणि अमेरिकेसारख्या लोकशाही राष्ट्रांनी विज्ञानाच्या आधारावर अधिक जवळून काम करणे ही काळाची गरज आहे.

जगासाठी भरीव योगदान

आरोग्य, शिक्षण, ग्रामीण विकास, आपत्ती निवारण आणि सामाजिक परिवर्तनासाठी काम करणाऱ्या अनेक स्वयंसेवी संस्था, विद्यापीठे आणि परोपकारी संस्थांनीही जगभरात मोलाचे कार्य केले आहे. संशोधनाला निधी देणे, ग्रंथालये उभारणे, शिष्यवृत्ती देणे, दुर्मीळ आजारांवरील संशोधनाला चालना देणे आणि नव्या पिढीला शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे या परंपरांनी जागतिक ज्ञानसंपदेला मोठी भर घातली आहे. अर्थात, अडीचशे वर्षांचा प्रवास कोणत्याही राष्ट्रासाठी सरळ रेषेत झालेला नसतो. अमेरिकेच्याही इतिहासात युद्धे आली, आर्थिक मंदी आली, सामाजिक संघर्ष झाले, वांशिक विषमता आणि अन्यायाचे प्रसंग आले.

America 250 Years Of Independence
डोनाल्ड ट्रम्पच्या डिनर सोहळ्यात गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराचा धक्कादायक 'मेनिफेस्टो' उघड; 'इराणी एजंट' विधानानं खळबळ; काय म्हणाला नेमकं?

परंतु, या सगळ्यांवर चर्चा करण्याची, न्यायालयात प्रश्‍‍न विचारण्याची, प्रसारमाध्यमांना टीका करण्याची, विद्यापीठांमध्ये मुक्तपणे विचार मांडण्याची आणि लोकशाही मार्गाने बदल घडवून आणण्याची क्षमता त्या समाजाने सातत्याने जपली. कोणत्याही लोकशाहीचे खरे सामर्थ्य तिच्या चुका कधीच होत नाहीत यात नसते; तर त्या चुका मान्य करून त्यातून पुढे जाण्याच्या वृत्तीत असते. हा धडा जगातील प्रत्येक लोकशाही राष्ट्रासाठी महत्त्वाचा आहे. भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांची लोकशाही वेगवेगळ्या ऐतिहासिक परिस्थितीत विकसित झाली.

भारताने आपल्या संस्कृती, परंपरा आणि विविधतेला साजेशी लोकशाही घडवली. अमेरिकेने स्वतःच्या अनुभवातून संस्थात्मक लोकशाही मजबूत केली. या दोन देशांच्या मैत्रीचे वैशिष्ट्य म्हणजे ती केवळ व्यापारापुरती मर्यादित नाही. शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, शेती, वैद्यक, संरक्षण, अवकाश, ऊर्जा, पर्यावरण, आरोग्य, सागरी सुरक्षा आणि लोकांमधील संबंध अशा अनेक क्षेत्रांत सहकार्याचा विस्तार होत आहे. जगातील दोन मोठ्या लोकशाही राष्ट्रांनी परस्परांच्या अनुभवातून शिकत राहणे, ही एक सकारात्मक घडामोड आहे.

America 250 Years Of Independence
America Plane Crash: अमेरिकेत पुन्हा विमान अपघात! नॉर्थ कॅरोलिनाजवळ विमान समुद्रात कोसळले; वैमानिक थोडक्यात बचावला

गोवा आणि अमेरिका

गोव्यासारख्या छोट्या राज्याचाही या नात्याशी वेगळा संबंध आहे. अनेक गोमंतकीय विद्यार्थी अमेरिकेत उच्च शिक्षण घेत आहेत. गोव्यातील अनेक कुटुंबांचे नातेवाईक तेथे स्थायिक झाले आहेत. वैद्यकीय, अभियांत्रिकी, संशोधन, माहिती तंत्रज्ञान, उद्योग आणि शिक्षण या क्षेत्रांत गोमंतकीय युवकांनी आपली छाप पाडली आहे. त्यामुळे अमेरिका हा गोव्यासाठी केवळ नकाशावरील दूरचा देश राहिलेला नाही; तर अनेक घरांशी, स्वप्नांशी आणि अनुभवांशी जोडलेला देश बनला आहे.

चार जुलै २०२६ रोजी अमेरिका आपल्या स्वातंत्र्याची अडीचशे वर्षे पूर्ण करत असताना हा केवळ एका राष्ट्राचा उत्सव नाही. हा मानवी जिद्दीचा, स्वातंत्र्याच्या आकांक्षेचा, ज्ञानाच्या शोधाचा आणि सतत स्वतःला नव्याने घडवत राहण्याच्या वृत्तीचा उत्सव आहे. या प्रवासात अमेरिकेने जगाला अनेक कल्पना, अनेक संस्था, अनेक शोध आणि असंख्य संधी दिल्या. त्याचबरोबर जगातील इतर देशांतील लाखो प्रतिभावान लोकांनीही अमेरिकेला समृद्ध केले. म्हणूनच हा प्रवास एकतर्फी नसून परस्पर सहकार्याचा आहे.

America 250 Years Of Independence
America Missile: अमेरिकेने काढले भयानक 'मिसाईल', 30 मिनिटांत करणार भूभाग उध्वस्त; तुफान वेगाने करणार खात्मा

भारत आज वेगाने विकसित होत आहे. विज्ञान, अवकाश, डिजिटल तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, औषधनिर्मिती, स्टार्टअप्स आणि शिक्षण या क्षेत्रांत भारताचे स्थान सातत्याने उंचावत आहे. अशा वेळी भारत आणि अमेरिका यांचे संबंध समानता, परस्पर आदर आणि ज्ञानाच्या देवाणघेवाणीवर अधिक दृढ व्हावेत, हीच या ऐतिहासिक दिनानिमित्त अपेक्षा आहे. जगातील सर्वांत जुनी आणि सर्वांत मोठी लोकशाही एकत्र आल्या, तर त्याचा लाभ केवळ या दोन देशांनाच नव्हे, तर संपूर्ण मानवजातीलाही होईल. अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या अडीचशे वर्षांच्या या प्रवासाकडे पाहताना हीच आशा आणि हा विश्वास मनात जागा होतो. सर्व अमेरिकन नागरिकांना आमच्या शुभेच्छा, भारत व अमेरिकेतील लोकशाही चिरायु होवो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com