मोदी सरकारने (Modi Government) राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराच्या (Rajiv Gandhi Khel Ratna Award) नावात बदल करण्याचा मोठा निर्णय घेतला. आता यापुढे या पुरस्काराचं नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार (Major Dhyanchand Khel Ratna Award) असं असणार आहे. यासंबंधीची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी स्वता:हून दिली आहे. मेजर ध्यानचंद यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करतानाचा फोटोही यावेळी मोदींनी ट्वीट केला आहे. त्यानंतर या मुद्यावरुन देशभरात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यावरच आता महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मोदींवर हल्लाबोल केला आहे.
मोदी सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला गांधी आणि नेहरु या नावाचा प्रचंड तिरस्कार आहे. या तिरस्कारुपी मानसिकतेमधूनच राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराच्या नावामध्य़े बदल केला गेला आहे. योजना, प्रकल्पाची नावे बदलण्याची कामे मोदी सरकार केवळ अन् केवळ द्वेषातूनच करत आहे. केंद्र सरकाच्या या कोत्या मानसिकतेचा कॉंग्रेस पक्ष तीव्र विरोध करत आहे, असेही यावेळी नाना म्हणाले आहेत.
हॉकीसाठी मेजर ध्यानचंद यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या सन्मानार्थ दुसरा वेगळा पुरस्कार देता आला असता किंवा त्यांच्या नावाने स्वतंत्र अशी क्रिडा योजना सुरु करता आली असती, आणि त्यामधून त्यांचा सन्मान करता आला असता. त्यांच्या नावाला कोणत्याही नेत्याचा किंवा सामान्य नागरिकाचा विरोध असण्याचं कारणच नाही. मात्र केवळ गांधींचा द्वेष या एकाच कारणामधून हे अशापध्दतीचं सूडबुध्दीचं राजकारण करुन नावं बदलत असाल तर तुमची कोती मानसिकता प्रदर्शित होते. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे देशाच्या विकासातील योगदान आणि देशातील करोडो लोकांच्या मनातील स्थान मोठे असून अशा पध्दतीने ते स्थान तसुभरही कमी होऊ शकत नाही, असही ते यावेळी म्हणाले आहेत.
द्वेषमूलक कृती
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावालाच विरोध असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रिडा क्षेत्रासाठी काय योगदान दिले असा सवालही पटोले यांनी उपस्थित केला आहे. शिवाय अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमला देशातील एका महान खेळाडूचे नाव देता आले असते मात्र त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचे या स्टेडियमला दिलेले नाव बदलून स्वता:चे नाव दिले. त्यामुळेच आता राजीव गांधी यांचे बदल्याने काहीच आश्चर्य करण्यासारखे नाही. ही नाव बदलण्याची कृती भाजप आणि संघांच्या द्वेषमूलक वृत्तीमधूनच आलेली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.