सावंतवाडी: महाराष्ट्र-गोवा सीमेवर गेल्या काही दिवसांपासून भ्रमंती करणाऱ्या ‘ओंकार’ हत्तीमुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या हत्तीच्या हालचालींवर नियंत्रण ठेवून त्याला सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी वन विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे, अशी माहिती सावंतवाडी वन विभागाचे उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांनी दिली.
शर्मा यांनी सांगितले की, “या हत्तीला पकडण्यासाठी चार ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. त्या ठिकाणी बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन ‘ओंकार’ला सुरक्षितपणे रेस्क्यू करण्यात येणार आहे.”
सध्या हा हत्ती कास आणि सातोसे परिसरात फिरत असून, परिसरातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. स्थानिक शेतकऱ्यांना त्यामुळे आर्थिक फटका बसत असल्याने वन विभागावर तातडीने कारवाईची मागणी वाढली आहे.
उपवनसंरक्षक शर्मा पुढे म्हणाले, “सावंतवाडी वन विभागाचे पथक ‘ओंकार’वर सातत्याने लक्ष ठेवून आहे. त्याच्या हालचालींचा बारकाईने अभ्यास करून योग्य ठिकाणी रेस्क्यू मोहीम राबवली जाईल.
महाराष्ट्र वन विभागाकडे या कामासाठी आवश्यक साधनसामग्री आणि तज्ज्ञ उपलब्ध आहेत. तसेच कर्नाटक वन विभागालाही मदतीसाठी पत्र पाठवण्यात आलं असून त्यांच्याकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.”
दरम्यान, ‘ओंकार’च्या वावरामुळे नागरिक आणि शेतकरी सावध झाले असून, वन विभागाकडून परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.