

US Intelligence Report Iran: मध्यपूर्वेतील युद्ध आता एका अत्यंत निर्णायक वळणावर येऊन पोहोचले आहे. इराण इस्रायल आणि अमेरिका यांच्यात घनघोर युद्ध सुरु आहे. या भीषण संघर्षात गेल्या दोन आठवड्यांपासून अमेरिका आणि इस्रायलने इराणवर तुफान बॉम्बवर्षाव केला. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणावर लष्करी कारवाया होऊनही इराणचे नेतृत्व अजूनही अबाधित असल्याची धक्कादायक माहिती गुप्तचर अहवालांच्या विश्लेषणानंतर समोर आली. 28 फेब्रुवारी रोजी सुरु झालेल्या या हल्ल्यांमध्ये इराणच्या पायाभूत सुविधांचे आणि लष्करी तळांचे अतोनात नुकसान झाले असले तरी, तिथली सत्ता संरचना इतकी खोलवर रुजलेली आहे की ती सहजपणे कोलमडण्याची चिन्हे दिसत नाहीत.
अमेरिकन गुप्तचर यंत्रणांच्या अहवालानुसार, गेल्या 12 दिवसांच्या निरंतर लष्करी हल्ल्यांनंतरही इराणच्या शासनाने देशातील जनतेवर आपले नियंत्रण कायम ठेवले आहे. या युद्धात सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्यासह डझनाहून अधिक वरिष्ठ अधिकारी आणि इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सचे उच्च पदस्थ कमांडर मारले गेले. तरीही, खामेनेईंच्या निधनानंतर त्यांचे पुत्र मुजतबा खामेनेई यांना नवीन सर्वोच्च नेते म्हणून घोषित करणे, हे इराणच्या सत्ता सातत्याचे मोठे संकेत मानले जात आहेत. मैदानावर परिस्थिती क्षणोक्षणी बदलत असली तरी, आयआरजीसी आणि अंतरिम नेतृत्व अजूनही देशाच्या सुरक्षा यंत्रणेवर आणि अर्थव्यवस्थेवर आपली पकड घट्ट धरुन आहे. हा 'सत्ता बदलाचा नवा चक्रव्यूह' इस्रायल आणि अमेरिकेच्या रणनीतीला आव्हान देणारा ठरत आहे.
दुसरीकडे, अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर युद्ध संपवण्यासाठी मोठा राजकीय दबाव वाढत चालला आहे. वाढत्या तेलाच्या किमती आणि जागतिक बाजारपेठेतील अस्थिरता यामुळे ट्रम्प यांनी हे युद्ध 'लवकरच' संपवण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, गुप्तचर अहवालात असा इशारा देण्यात आला की, जोपर्यंत इराणमधील कट्टरपंथी नेतृत्व आपल्या जागेवर मजबूत आहे, तोपर्यंत युद्धाचा कोणताही सन्मानजनक अंत शोधणे कठीण जाईल.
खुद्द इस्रायली अधिकाऱ्यांनीही गोपनीय चर्चेत हे मान्य केले की, केवळ हवाई हल्ल्यांच्या जोरावर इराणमधील राजवटीचा तख्तापलट होईल, याची कोणतीही खात्री देता येत नाही. सुरुवातीला ट्रम्प प्रशासनाने इराणी जनतेला 'सत्ता आपल्या हातात घेण्याचे' आवाहन केले होते, परंतु आता अमेरिकेच्या वरिष्ठ सल्लागारांनी स्पष्ट केले की, सत्तापालट हे त्यांचे सध्याचे अधिकृत उद्दिष्ट नाही.
तसेच, या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन गुप्तचर संस्थांनी इराणमधील कुर्द गटांच्या क्षमतेवरही शंका उपस्थित केली. इराकच्या सीमाभागात असलेल्या इराणी कुर्द गटांनी अमेरिकेशी संपर्क साधून इराणच्या अंतर्गत भागात हल्ले करण्याची तयारी दर्शवली होती. कोमाला पक्षाचे प्रमुख अब्दुल्ला मोहतादी यांनी हजारो तरुण शस्त्रे उचलण्यास तयार असल्याचे सांगितले असले तरी, त्यासाठी त्यांना अमेरिकन शस्त्रास्त्रांची आणि समर्थनाची गरज आहे.
मात्र, ताज्या अमेरिकन अहवालात असे स्पष्टपणे नमूद केले की, या कुर्द गटांकडे इराणच्या बलाढ्य सुरक्षा दलांचा सामना करण्यासाठी पुरेशी शस्त्रास्त्रे आणि संख्याबळ नाही. थोडक्यात, बाहेरुन होणारे हल्ले आणि अंतर्गत बंडाळी या दोन्ही आघाड्यांवर सध्या तरी इराणचे सत्ताकेंद्र स्वतःचा बचाव करण्यात यशस्वी होताना दिसत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.