

Train Viral Video: रेल्वे किंवा बस प्रवासादरम्यान महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. सार्वजनिक वाहनांमधून प्रवास करताना महिलांना अनेकदा विचित्र नजरांचा किंवा छेडछाडीचा सामना करावा लागतो. अशाच प्रकारची एक संतापजनक घटना नुकतीच एका चालत्या ट्रेनमध्ये घडली असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एका बाजूच्या बर्थवर बसलेला एक व्यक्ती समोरील तरुणीकडे ज्या प्रकारे टक लावून पाहत होता, त्यामुळे ती तरुणी कमालीची अस्वस्थ झाली. अखेर स्वतःच्या सुरक्षिततेसाठी आणि त्या व्यक्तीचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी तिने हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद केला.
हा व्हिडिओ 'स्लीपर' बोगीमधील असून, त्यामध्ये वरच्या बर्थवर एक तरुणी बसलेली दिसत आहे. तिच्या अगदी समोरच्या 'साईड अप्पर बर्थ'वर एक व्यक्ती बसलेला आहे, जो सातत्याने तिच्याकडे टक लावून पाहत आहे. सुरुवातीला त्या तरुणीने याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या व्यक्तीची नजर हटतच नव्हती. जेव्हा परिस्थिती असह्य झाली आणि तिला असुरक्षित वाटू लागले, तेव्हा तिने आपला मोबाईल काढून व्हिडिओ शूट करण्यास सुरुवात केली. व्हिडिओमध्ये ती तरुणी स्पष्टपणे सांगत आहे की, समोरील 'अंकल' तिला सातत्याने न्याहाळत आहेत, ज्यामुळे तिला तिथे बसणेही कठीण झाले. अशा प्रकारच्या मानसिकतेमुळे आज कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी महिला स्वतःला सुरक्षित समजू शकत नाहीत, अशी भावना या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त होत आहे.
हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर '@pritysingh28.official' या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून त्याला आतापर्यंत 3 कोटी 80 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओ शेअर करताना त्या तरुणीने एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट नमूद केली. तिने म्हटले की, "कोणालाही जज करण्यापूर्वी त्याची पूर्ण कहाणी जाणून घेणे आवश्यक आहे. मी फक्त माझ्या कंटेंटसाठी किंवा लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला नाही. मला तिथे खरोखरच अस्वस्थ (Uncomfortable) वाटत होते आणि म्हणूनच मी कॅमेरा ऑन केला." या एका विधानातून रेल्वे प्रवासात महिलांना किती मानसिक त्रासातून जावे लागते, याचे वास्तव समोर आले.
अशा प्रकारच्या घटना नवीन नाहीत. काही दिवसांपूर्वीच एका विदेशी महिलेलाही अशाच अनुभवाला सामोरे जावे लागले होते. एका पोर्तुगीज महिलेने थ्री-एसीमध्ये प्रवास करताना काही लोक तिचा पाठलाग बाथरुमपर्यंत करत असल्याचा आणि तिला सतत न्याहाळत असल्याचा व्हिडिओ बनवला होता. त्यानंतर टीटीईने तातडीने कारवाई करत त्या व्यक्तींना फटकारले होते. सध्याच्या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी त्या तरुणीच्या धाडसाचे कौतुक केले आहे, तर काहींनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना पुरुषांनी आपल्या नजरेवर ताबा ठेवणे किती गरजेचे आहे, यावर भाष्य केले. प्रवासादरम्यान महिलांची (Womens) सुरक्षितता ही केवळ कायद्याची जबाबदारी नसून ती समाजाच्या मानसिकतेशीही जोडलेली आहे, हेच या घटनेवरुन पुन्हा एकदा सिद्ध झाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.