South Africa Cricket team break Australia's big record in World Cup:
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत मंगळवारी दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश संघात सामना झाला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 149 धावांनी विजय मिळवला. दरम्यान, या सामन्यात खेळताना दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा मोठा विश्वविक्रमही मोडला आहे.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 5 बाद 382 धावा केल्या होत्या. त्यानंतर 383 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ 46.4 षटकात 233 धावा करून सर्वबाद झाला.
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेची वनडे वर्ल्डकपमध्ये 350 पेक्षा अधिक धावा करण्याची ही आठवी वेळ होती. त्यामुळे वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिकवेळा 350 धावांचा टप्पा पार करणाऱ्या संघांच्या यादीत दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियाला मागे टाकत अव्वल क्रमांकावर आले आहे.
ऑस्ट्रेलियाने वनडे वर्ल्डकपमध्ये आत्तापर्यंत 7 वेळा 350 धावांपेक्षा अधिक धावा करण्याचा कारनामा केला आहे.
विशेष म्हणजे दक्षिण आफ्रिकेने आठपैकी तीन वेळा तर २०२३ वर्ल्डकपमध्येच ३५० धावांचा टप्पा ओलांडला आहे. त्यांनी बांगलादेशव्यतिरिक्त श्रीलंका आणि इंग्लंड या संघांविरुद्धही ३५० धावांचा टप्पा ओलांडला आहे. इतकेच नाही, तर त्यांनी श्रीलंकेविरुद्ध ४२८ धावा उभारल्या होत्या, ही वनडे वर्ल्डकपच्या इतिहासातीलही सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे.
वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिकवेळा 350 धावांचा टप्पा पार करणारे संघ -
8 वेळा - दक्षिण आफ्रिका
7 वेळा - ऑस्ट्रेलिया
4 वेळा - भारत
3 वेळा - इंग्लंड
3 वेळा - न्यूझीलंड
2 वेळा - श्रीलंका
2 वेळा - वेस्ट इंडिज
दरम्यान, या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 382 धावा करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डी कॉकने 174 धावांची दीड शतकी खेळी केली. तसेच हेन्रिक क्लासेनने 90 धावांची आणि कर्णधार एडेन मार्करमने 60 धावांची अर्धशतकी खेळी केली. बांगलादेशकडून हसन मेहमुदने 2 विकेट्स घेतल्या.
त्यानंतर, 383 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 6 व्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या मेहमुद्दुलाहने 111 धावांची शतकी खेळी केली. मात्र, त्याला दुसऱ्या बाजूने भक्कम साथ मिळाली नाही. त्यामुळे बांगलादेश संघ 233 धावांवर सर्वबाद झाला आणि दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेकडून गेराल्ड कोएत्झेने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.