भारताचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनने एका दिव्यांग मुलाचा दिवस अगदी खास बनवला आहे. त्याने त्या मुलाचे एक स्वप्न पूर्ण करत अनेकांची मनं जिंकली आहेत.
खरंतर या लहान मुलाची सॅमसनला भेटण्याची आणि त्याच्याबरोबर खेळण्याची इच्छा होती. या मुलाला खेळताना पाहून सॅमसनने त्याला भेटण्याचे वचन दिले होते. अखेर सॅमसनने त्याचा हा शब्द पाळला आहे.
रणजी ट्रॉफी खेळून केरळला परतल्यानंतर सॅमसन त्या मुलाला भेटण्यासाठी गेला. इतकेच नाही, तर तो त्याच्याबरोबर क्रिकेटही खेळला. या भेटीचा एक व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये दिसते की तो दिव्यांग मुलगा सॅमसनला गोलंदाजी करत आहे, तर सॅमसन फलंदाजी करत आहे. यावेळी तो मुलगा अगदी खूश दिसत आहे. सॅमसनने दाखवलेल्या या उदारतेबद्दल सध्या त्याचे कौतुक होत आहे.
दरम्यान, नुकतेच बीसीसीआयने 2023-24 कालावधीसाठी भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा वार्षिक मानधन करार जाहीर केला आहे. या करारात संजू सॅमसनचा सी विभागात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे 2023-24 हंगामासाठी सॅमसनला बीसीसीआयकडून 1 कोटी रुपये मिळणार आहेत.
सॅमसन भारताकडून अखेरचा जानेवारीमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या टी20 मालिकेत खेळला होता. या मालिकेत एकच सामना तो खेळला होता, त्यातही तो शुन्यावर बाद झाला होता. पण त्याआधी डिसेंबर 2023 मध्ये खेळलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याने शतक केले होते.
सॅमसन आता आगामी आयपीएल 2024 स्पर्धा खेळताना दिसणार आहे. तो आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार आहे. तो गेल्या 3 हंगामापासून राजस्थानचे नेतृत्व करत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली 2022 मध्ये राजस्थानने अंतिम फेरीत गाठली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.