

पणजी: हरमल येथील खालचावाडा भागात फोफावलेल्या वेश्या व्यवसायाविरुद्ध आता स्थानिक जनता एकवटली आहे. पोलिसांना दोनवेळा रीतसर निवेदन देऊनही कोणतीच कारवाई न झाल्याने संतप्त नागरिकांनी स्वतः पुढाकार घेत या व्यवसायातील पीडितांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र, या कारवाईदरम्यान पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेमुळे आता एकच प्रश्न विचारला जात आहे. पोलिस ‘कॉल रेकॉर्डस्’ तपासायला का घाबरत आहेत आणि या काळ्या धंद्याला नेमका कुणाचा ‘आशीर्वाद’ आहे?
स्थानिकांनी पीडितांना पकडल्यानंतर पोलिसांना पीडित महिलेचा मोबाईल तपासण्याची विनंती केली. यांचे ‘कॉल रेकॉर्डस्’ तपासा म्हणजे कोणते पोलिस कर्मचारी यांच्या संपर्कात आहेत आणि हा व्यवसाय कुणाच्या पाठिंब्याने सुरू आहे हे लगेच उघड होईल, असे स्थानिकांनी ठणकावून सांगितले.
मात्र, ‘कॉल रेकॉर्डस्’मुळे पडद्यामागचे बिंग फुटेल या भीतीने पोलिस निरीक्षकांनी तातडीने पीडितांना ताब्यात घेतले आणि मोबाईल तपासण्यास टाळाटाळ केली. ज्या निरीक्षकाला कारवाई कशी करावी हे समजत नाही, त्यांच्यावरच प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
या प्रकरणी सोमवारपर्यंत तपास करावा, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा ग्रामस्थांनी देऊन पोलिसांना अल्टिमेटम दिला आहे.
स्थानिक महिलांची सुरक्षा धोक्यात!
एका महिलेने आपले नाव न सांगण्याचा अटीवर सांगितले की, या व्यवसायाचा परिणाम इतका भीषण झाला आहे की, रस्त्यावरून चालणाऱ्या कोणत्याही स्थानिक महिलेला पर्यटक चुकीच्या उद्देशाने विचारणा करत आहेत. हरमलची ओळख ‘चुकीच्या कामांचे केंद्र’ म्हणून होऊ लागल्याने स्थानिक महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
स्थानिकांच्या मागण्या...
वेश्या व्यवसाय कायमचा बंद व्हावा.
संबंधित भ्रष्ट पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी.
संशयास्पद पोलिसांचे कॉल रेकॉर्डस् सार्वजनिक करावेत.
लोकांकडून उपस्थित होणारे गहन प्रश्न
हरमलमध्ये दोन बीट पोलिस तैनात असताना २०२४ पासून हा व्यवसाय इतका कसा वाढला? स्थानिक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होते की जाणीवपूर्वक पाठबळ?
हरमलमध्ये एकूण १३ ‘स्पा सेंटर्स’ आहेत (खालचावाडा ५, मधलवाडा २, गिरकरवाडा ४). यातील अनेक ‘स्पा’ बेकायदेशीर असूनही पोलिस गप्प का? यापूर्वीच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले होते, मग सध्याचे अधिकारी गप्प का आहेत?
पोलिसांच्या ज्या पद्धतीने ‘फुटबॉल’सारख्या बदल्या झाल्या, त्यावरून या व्यवसायाचे धागेदोरे खूप खोलवर असल्याचे स्थानिकांना वाटते. म्हणूनच सर्व संबंधित पोलिसांचे ‘कॉल रेकॉर्डस्’ तपासण्याची मागणी केली जात आहे. ते कधी तपासणार?
स्थानिक नागरिक जॉकीम फर्नांडिस यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे. ते म्हणाले की, आम्ही पोलिस महासंचालकांपासून ते स्थानिक निरीक्षकांपर्यंत सर्वांना निवेदने दिली होती. तरीही काहीच घडले नाही. आता आम्ही पोलिसांना ८ दिवसांचा वेळ दिला असून त्याची मुदत सोमवारी संपणार आहे. तोपर्यंत या भागातील वेश्या व्यवसाय कायमचा बंद झाला पाहिजे आणि संबंधित दोषी पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे. अन्यथा, याचे रूपांतर मोठ्या जनआंदोलनात आणि निदर्शनात होईल.
- जॉकीम फर्नांडिस, हरमल स्थानिक
सर्व पोलिसांना स्थानिकांच्या समोर उभे करा, आम्ही ओळखून दाखवू की कोणते पोलिस इथे येऊन वेश्या व्यवसायाला समर्थन देतात. पोलिसांनी सहकार्य मागितले तर आम्ही द्यायला तयार आहोत, पण हा प्रकार आता कायमचा बंद झाला पाहिजे.
- जॉकीम फर्नांडिस, स्थानिक रहिवासी
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.