Goa Politics: खरी कुजबुज; कोण खरे? विरियातो की भाजपवाले?

Khari Khujbuj Goa Politics: घोगळ येथील मशीद या आवारात खून झाल्यामुळे बंद झाली होती. रमजान निमित्त ती खुली करावी यासाठी स्थानिक मुस्लिमांनी प्रयत्न करूनही ते सफल होत नसल्याबद्दल त्यांनी आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांना गळ घालून पाहिली.
Khari Khujbuj Goa Politics
Khari Khujbuj Goa PoliticsDainik Gomantak
Published on
Updated on

कोण खरे? विरियातो की भाजपवाले?

दाबोळी विमानतळावरुन कॉंग्रेसचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस व भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. खासदार फर्नांडिस यांनीच दाबोळी विमानतळ बंद करण्यास भाजपने पुढाकार घेतला आहे, असा आरोप केला होता. नंतर त्यात विजयबाब, आम आदमी पक्ष, रेव्होल्युशनरी गोवन्स यांनी टीकेची झोड उठवली. ‘दाबोळी विमानतळ बंद’ विरोधात लोक सुद्धा जागृत झाले. त्यामुळे भाजपच्या मंत्र्यांना दाबोळी विमानतळ बंदचा निर्णय राज्य व केंद्रीय स्तरावर स्थगित करावा लागला. भाजपवाल्यांनीही दाबोळी विमानतळ बंद होणार नाही, हे जाहीर करून टाकले. आता ट्विटरद्वारे दाबोळी विमानतळ उद्या बंद होणार, असा संदेश प्रसारित झाला आहे. हा ट्विट विरियातोंच्या नावे आहे. विरियातो यांनी हे ट्विट आपले नसून भाजपवाल्यांचे काम असल्याचे स्पष्ट केले आहे. भाजपवाले सांगतात, हे विरियातो बाबचेच ट्विट आहे. नेमके कोण खरे याबद्दल मात्र लोकांमध्ये संभ्रम आहे. दाबोळी विमानतळावरील विमान वाहतूक कमी होताना व त्याच बरोबर मोपा विमानतळावर वाढ होताना दिसत आहे. यामागे नेमके कोण हेही स्पष्ट व्हायला हवं ना!

दामू नाईक यांची मध्यस्थी

घोगळ येथील मशीद या आवारात खून झाल्यामुळे बंद झाली होती. रमजान निमित्त ती खुली करावी यासाठी स्थानिक मुस्लिमांनी प्रयत्न करूनही ते सफल होत नसल्याबद्दल त्यांनी आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांना गळ घालून पाहिली. रेजिनाल्ड यांनी त्यासाठी प्रयत्न केलेही, पण जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे म्हणणे गंभीरपणे ऐकून घेतले नाही. शेवटी स्थानिक मुस्लिमांनी भाजप प्रदेश अध्यक्ष दामू नाईक यांना गळ घातली आणि महत्वाचे म्हणजे दामू यांनी आपले वजन वापरून ही मशीद खुली करून दाखवली सुद्धा. एरव्ही रेजिनाल्ड यांना वजनदार आमदार म्हटले जाते. पण त्यांच्यापेक्षा दामूंचे राजकीय वजन अधिक जास्त, हे या कृतीतून सिद्ध झालेच.

Khari Khujbuj Goa Politics
Goa Shigmotsav: शिमगोत्सव मेळांना 300 कोटींचे अर्थसाह्य देणार! मंत्री रमेश तवडकर यांची माहिती

भंडारी समाजाला प्रतिनिधित्व

भारतीय जनता युवा मोर्चाची प्रदेश समिती जाहीर झाल्यानंतर त्यात राज्यातील सर्वात मोठ्या भंडारी समाजाला प्रतिनिधीत्व नसल्याची बाब चर्चेत आली आहे. भाजपच्या युवा समितीत भंडारी समाजाचा दुष्काळ दिसतो. क्षमता आहे पण प्रतिनिधीत्व नाही याची जबाबदारी कोण घेणार अशी विचारणा समाज माध्यमावर होताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीत भंडारी समाजाला असेच प्रतिनिधीत्व नाकारले जाण्याची ही सुरवात असल्याची समाजात चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी भंडारी समाजाचे दामू नाईक असताना असे कसे झाले याचे कोडे अनेकांना सुटलेले नाही.

गुपित कारभाराचे ‘गुपित’

कला अकादमीच्या ‘अ’ गट नाट्यस्पर्धेतील निकाल निश्चित करण्यासाठी कला अकादमीच्या अधिकाऱ्यांनीच प्रयत्न केल्याची बातमी ‘गोमन्तक’मध्ये प्रसिद्ध झाली आणि कला अकादमीची उरली सुरली लक्तरेही उतरवली गेली. कला अकादमीच्या उपाध्यक्षपदी प्रवीण गावकर हे संवेदनशील कलाकार आहेत. त्यांना अशा प्रकारांमुळे दुःख होणे स्वाभाविक होते. ते काल अध्यक्षांना भेटण्यासाठी कला अकादमीत गेल्यावर त्यांना बैठक सुरू असल्याचे कारण देत आत बोलावण्यात आले नाही. ते स्वतःहून आत गेल्यावर त्यांनी याविषयी ‘गोमन्तक’शी बोलताना मत का व्यक्त केले, अशी विचारणा अध्यक्ष बाबू कवळेकर यांच्याकडून करण्यात आली. यामुळे कोण कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करतो, अशी वेगळीच चर्चा जोर धरू लागली आहे.

सुदिनसाठी खरा ‘सुदिन’!

मडकईचे आमदार तथा मगो पक्षाचे नेते आणि राज्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सरकारी पातळीवर होणाऱ्या फर्मागुढीतील शिवजयंती सोहळ्यात प्रमुख पाहुणा होण्याचा मान पटकावला. त्यामुळे अश्‍वारूढ शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला त्यांनीच प्रथम पुष्पहार अर्पण केला. वास्तविक शिवजयंतीला मुख्यमंत्री प्रमुख पाहुणे असतात, मात्र निवडणुकांच्या आचारसंहितेवेळी वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना हा मान जातो. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देशाबाहेर असल्याने पोहचू शकले नाहीत, मात्र फोंड्यातील शिरोड्याचे आमदार तथा सहकारमंत्री सुभाष शिरोडकर तसेच प्रियोळचे माजी मंत्री आणि आमदार गोविंद गावडे का बरे आले नाहीत, याची मात्र चर्चा होताना दिसली.

Khari Khujbuj Goa Politics
Goa Sand Mining: रेती परवाने आणखी लांबणार, नव्‍याने जारी होण्‍याची शक्‍यता धूसर; 'सीआरझेड-4'ची आडकाठी

फुकटचे मिळाले म्हणून..!

वेर्णा येथून शीतपेयाने भरलेल्या बाटल्या घेऊन बेंगळुरूकडे जाणाऱ्या ट्रक ट्रॉलीला गुरुवारी सकाळी अपघात झाला. हा ट्रक कलंडला. ट्रॉलीतील क्रेटस् व बाटल्या रस्त्यावर विखुरल्या गेल्या. वास्तविक तिथे असलेल्या लोकांनी अपघातग्रस्त वाहनाला मदत करायला हवी होती, पण काहीजणांनी हीच संधी असे समजून हाताला लागतील तेवढ्या क्रेटस् व बाटल्या पळविल्या. या अपघातामुळे तेथे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. ही वाहतूक सुरळीत करण्यास मदत करावी, असे कुणाला वाटले नाही. पण बाटल्या पळवण्यात अनेकांनी धन्यता मानली. तथापि वेर्णा पोलिस काही काळानंतर तिथे दाखल झाले अन् त्यांनी वाहतूक सुरळीत केली. पण तोवर उपस्थितांत एकच चर्चा सुरू झाली, फुकटचं मिळालं म्हणून पळवलं..!

पणजीतील राजकारण

गोव्यातील एकमेव अशा पणजी महापालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकीत कधी नव्हे, ती यावेळी रंगत येणार आहे. ती बाबूश मोन्सेरात यांच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी उभ्या ठाकलेल्या ‘आमी पणजेकार’ या पॅनलमुळे. निवडणुकीचा निकाल काहीही लागो पण पणजीतील राजकारणाला त्यामुळे नवी दिशा मिळते की काय ते स्पष्ट तर होईलच पण पुढील वर्षी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीतील पणजीचे राजकारण त्यातून दिशा पकडेल, असे अनेकांना वाटते. एक खरे की मूळ भाजपवाले या निमित्ताने उत्पल पर्रीकर यांच्या भोवती गोळा होताना दिसत आहेत. पण त्यांचा हा जोश असाच राहतो व त्यांची संख्या वाढत जाते, की दिवस जातात तसा कमी होतो ते येणारा काळच दाखवून देईल. पण कधी नव्हे ते भाईंच्या नंतर प्रथमच पणजीतील राजकारण ढवळून निघताना दिसत आहे.

केतनचा काँग्रेस प्रवेश

फोंड्याची पोटनिवडणूक होऊ घातली असून त्यामुळे आता येनकेनप्रकारेण फोंडा जिंकूच, अशी इर्षा राजकीय पक्षांत लागली आहे. एरव्ही मगो पक्षाचे फोंड्यातील नेते असलेले केतन भाटीकर यांना यावेळेला काँग्रेस पक्षाने फोंड्यातून उमेदवारी देण्याचे निश्‍चित केले आहे, त्यासंबंधी बैठका झाल्या, तरीही अजून तसे काहीच नाही म्हणणाऱ्या भाटीकर आणि काँग्रेसच्या नेत्यांनी झाकून ठेवलेला कोंबडा अखेर आरवलाच. आता येत्या मंगळवारी भाटीकर काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे पाहुया भाजप फोंड्यासाठी कोणत्या रणनितीचा अवलंब करते ते.

पार्सेकर सरांची खंत

सत्तेपुढे कोणाचे शहाणपण चालत नाही, असे म्हणतात. माजी मुख्यमंत्री अशी बिरुदावली लावणाऱ्या पार्सेकर सरांना म्हणे त्याचे प्रत्त्यंतर आता येऊ लागले आहे. कोणताही नागरिक कसलीही तक्रार घेऊन गेला, तर अधिकारी त्याला म्हणे आमदाराची मान्यता घेऊन या, असे सांगत आहेत. ते सत्यच असणार कारण पार्सेकर सर हे उगाचच तारे तोडणाऱ्यांपैकी नाहीत. पण सत्ता नसली तरी कोणी विचारत नाहीत, असे म्हणतात तेच खरे त्याचा अनुभव त्यांनी स्वतः घेतला. एकेकाळी ते आरोग्यमंत्रीही होते, पण नंतर सत्ता गेल्यावर एकदा ते गोमेकॉत कोणाला भेटण्यासाठी गेले असता त्यांची कोणी दखलही घेतली नव्हती. साधे भोळे पार्सेकर सर हे माजी मुख्यमंत्री असल्याचे सांगावे लागले. आजचे अरेरावी करणारे मंत्री-आमदार पाहिले तर हा फरक जास्त लक्षात येतो खरा.

Khari Khujbuj Goa Politics
Goa Crime: म्हापसा हादरलं! अपार्टमेंटजवळ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ; मृत्यूचं कारण अद्याप गुलदस्त्यात

नुसते इशारे नकोत, कृती करा!

फुकटचे इशारे देण्याने क्रांती घडत नाही. दिलेले इशारे खरे करून दाखविण्याचे धाडस इशारे देणाऱ्यांना असणे गरजेचे. कुंकळ्ळी येथे फिश मिल प्रकल्पाच्या विरोधात आपण प्राणपणाने लढणार, असा इशारा आमदार युरी आलेमाव यांनी दिला आहे. फिश मील प्रकल्पाच्या विरोधात न्यायालयात आव्हान याचिका दाखल करण्याचा इशारा पालिका मंडळाने दिला आहे. फिश मील प्रकल्पाच्या विरोधात गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षावर मोर्चा नेण्याचा इशारा एका भाजपा नगरसेवकाने दिला आहे. याचे स्थानिक समर्थन करतात. मात्र एक मोर्चा पर्यावरण मंत्र्यांच्या घरावर काढूया, असे आवाहन आता स्थानिक रहिवाशी नगरसेवकांना करू लागले आहेत.

आर्चितचे वेलकम!

आर्चित नाईक हे गोवा प्रदेश युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष आहेत. सध्या कॉंग्रेसचे गोव्यात संघटन सृजन अभियान सुरू आहे.त्यासाठी अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे निरीक्षक गोव्यात ठाण मांडून आहेत. हे निरीक्षक आर्चितरावाची आपुलकीने विचापूस करतात. मडगावात गुरुवारी दक्षिण गोवा कॉंग्रेस मुख्यालयात आयोजित ‘प्रेस ब्रीफिंग’च्यावेळी त्याचा प्रत्यय आला. पक्षाचे निरीक्षक विजय इंदर सिंगला यांनी आर्चितला अगत्याने व्यासपीठावर बसण्यास सांगितले. ही विनंती त्यांनी मान्य करून व्यासपीठ शेयरही केले.आर्चितचे वडील स्व. शांताराम नाईक हे ‘लॉयल कॉंग्रेसमन’ होते. शांतारामबाबाच्या पक्ष निष्ठेला कॉंग्रेस पक्ष विसरला नाही, हे यावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आता पुढच्या वर्षी राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. युवा मतदारांना कॉंग्रेसकडे वळविण्याची जबाबदारी आता आर्चितच्या खांद्यावर सोपविली आहे. आता ही जबाबदारी ते पेलू शकणार का, हे येणारा काळच ठरवेल म्हणा!.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com