WPL 2024 Mumbai Indians vs Delhi Capitals: महिला प्रीमियर लीगचा दुसरा हंगाम आज (23 फेब्रुवारी) पासून सुरु झाला. गेल्या मोसमातील अंतिम फेरीतील दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स पहिल्या सामन्यात आमनेसामने होते. या सामन्यात मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघाने पहिल्यांदा फलंदाजी केली.
मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने टॉस जिंकला होता. पहिल्यांदा फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 5 गडी गमावून 171 धावा केल्या होत्या. या लीगच्या इतिहासात मुंबई इंडियन्सविरुद्ध कोणत्याही संघाची ही सर्वात मोठी धावसंख्या होती.
प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सने 20 षटकांत 6 गडी गमावून 173 धावा केल्या. पदार्पणाच्या सामन्यातील शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून संघाला विजय मिळवून देणारी सजीवन सजना सामन्याची स्टार ठरली.
दरम्यान, हंगामातील पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध हरमनप्रीतच्या मुंबई संघाने पहिला विजय नोंदवला. 4 विकेट्सने या हंगामातील पहिला सामना मुंबईने जिंकला. 172 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झाली नाही. संघाने पहिल्याच षटकात हीली मॅथ्यूजची विकेट गमावली. ब्रंट आणि यस्तिका यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी झाली. ब्रंटने 17 चेंडूत 19 धावा केल्या. यास्तिका भाटियाने 45 चेंडूत 57 धावांची खेळी केली. तर हरमनप्रीतने कर्णधारपदाला साजेशी अशी खेळी खेळली. हरमनप्रीतने पुन्हा एकदा आपल्या शानदार खेळीने प्रभावित केले.
दुसऱ्या हंगामातील हा पहिला सामना अतिशय रोमांचकारी पद्धतीने संपला. संघाला दोन चेंडूत पाच धावा हव्या होत्या आणि चेंडू एलिस कॅप्सीच्या हातात होता. 20 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर 55 धावा करुन हरमनप्रीत कौर बाद झाली. याआधी सलामीवीर यास्तिका भाटियाने 57 धावांची खेळी केली होती. पण शेवटी नवोदित सजीवन सजना हिने संघाला एका चेंडूवर पाच धावांची गरज असताना शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला.
दरम्यान, या सामन्यात इंग्लंडची महिला फलंदाज ॲलिस कॅप्सीने शानदार खेळी केली. कर्णधार मेग लॅनिंगने 31 धावांची खेळी केली. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेल्या कॅप्सीने 53 चेंडूत 75 धावांची उत्कृष्ट खेळी केली. तिच्याशिवाय, जेमिमाह रॉड्रिग्जने 24 चेंडूत 42 धावांची शानदार खेळी खेळली. या खेळीत तिने 5 चौकार आणि 3 षटकार मारले. कॅप्सीने आपल्या खेळीत 9 चौकार आणि 3 षटकार मारले. शेवटी, मारिजन कॅपने 9 चेंडूत 16 धावा करत संघाची धावसंख्या 170 च्या पुढे नेली.
दुसरीकडे, या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सची धाकड आणि सलामीवीर फलंदाज शफाली वर्मा फ्लॉप ठरली. तिने 8 चेंडू खेळून केवळ एक धाव काढली. दक्षिण आफ्रिकेच्या शबनिम इस्माईलने तिला क्लीन बोल्ड केले. या डावात मुंबईसाठी गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर इस्माईलने 1 बळी घेतला. अमेलिया कर आणि नेट सीव्हर ब्रंट यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.