MS Dhoni Journey Video: भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी आज (7 जुलै 2023) त्याचा 42 वा वाढदिवस साजरा करत आहे. माही, कॅप्टनकूल, थाला अशी अनेक टोपन नावाने ओळखल्या गेलेल्या धोनीने त्याच्या कारकिर्दीत त्याची वेगळीच ओळख निर्माण केली आहे. सध्या जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळाडूंमध्येही त्याचे नाव घेतले जाते.
केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येच नाही, तर आयपीएलमध्येही धोनीने यशाला गवसणी घातली आहे. भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आणि यष्टीरक्षक म्हणून त्याने नाव कमावले आहे. पण धोनी फक्त त्याच्या मैदानातील कामगिरीसाठीच नाही, तर त्याच्या शांत स्वभावामुळेही चाहत्यांमध्ये लोकप्रिय ठरला.
दरम्यान, धोनीने 23 डिसेंबर 2004 रोजी चितगावला बांगलादेशविरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. पण पहिल्याच सामन्यात तो शुन्यावर असताना धावबाद झाला. पहिल्या काही सामन्यात खालच्या फळीत फलंदाजी करताना त्याला अपयश आले होते. पण नंतर त्याने पहिले शतक केल्यानंतर मागे वळून पाहिले नाही.
धोनीने पहिल्या 4 सामन्यात मोठ्या धावा केल्या नव्हत्या. पण त्याच्या पाचव्या वनडेत पाकिस्तानविरुद्ध गांगुलीने त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले आणि धोनीने या संधीचा फायदा घेत आक्रमक फलंदाजी करत शतक केले.
धोनीने 5 एप्रिल 2005 रोजी विशाखापट्टणमला पाकिस्तानविरुद्ध 148 धावांची खेळी केली. हे त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले-वहिले शतक ठरले.
धोनीने पहिल्या वनडे शतकानंतर दुसरे शतक काहीच महिन्यांनंतर 31 ऑक्टोबर 2005 रोजी जयपूरला श्रीलंकेविरुद्ध केले. त्याने त्यावेळी 15 चौकार आणि 10 षटकारांचा पाऊस पाडला होता. तसेच 145 चेंडूत नाबाद 183 धावांची खेळी केली होती. ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोच्च वनडे खेळीही ठरली.
धोनीने वनडेत त्याच्यातील प्रतिभा दाखवल्यानंतर कसोटीतही त्याच्या फलंदाजीची चुणूक दाखवण्यास सुरुवात केली होती. त्याने त्याचे पहिले कसोटी शतकही पाकिस्तानविरुद्धच झळकावले. त्याने फैसलाबादमध्ये झालेल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानविरुद्ध 148 धावांची खेळी केली होती.
योगायोग असा की धोनीने त्याच्या पहिल्या वनडे आणि कसोटी शतकावेळी पाकिस्तानविरुद्धच 148 धावांची खेळी केली होती.
अनेकांना हे माहिती नसेल की धोनीच्या नावावर कसोटीत एक द्विशतकही आहे. धोनीने फेब्रुवारी 2013 मध्ये चेन्नईला ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यांत 224 धावांची खेळी केली होती. हे त्याचे पहिले द्विशतक ठरले होते. तसेच ही त्याची कसोटीतील सर्वोच्च खेळीही ठरली.
धोनीला 2007 च्या टी20 वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदा भारताचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. त्यानेही या स्पर्धेत त्याच्यातील नेतृत्वगुणांची चुणूक दाखवली आणि भारताला पहिला टी20 वर्ल्डकप जिंकून दिला. यानंतर मात्र धोनीने कर्णधार म्हणूनही मागे वळून पाहिले नाही, त्याला भारताचे तिन्ही क्रिकेट प्रकारातील नेतृत्वाची जबाबदारी मिळाली.
त्याच्याच नेतृत्वाखाली 2009 मध्ये भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर पहिल्यांदा विराजमान झाला. त्यानंतर 2011 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली २८ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भारताने पहिल्यांदा वनडे वर्ल्डकपवर नाव कोरले.
2011 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात धोनीने गौतम गंभीरबरोबर 109 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली होती. तसेच त्याने नाबाद 91 धावांची खेळीही केली होती. त्याला अंतिम सामन्यात सामनावीराचा पुरस्कारही मिळाला. या अंतिम सामन्यात त्याने मारलेला विजयी षटकार आजही क्रिकेटमधील आयकॉनिक क्षणांपैकी एक समजला जातो.
इतकेच नाही, तर त्यानंतर दोन वर्षांनी 23 जून 2013 रोजी धोनीच्याच नेतृत्वाखाली भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपदही मिळवले. त्यावेळी धोनी भारताचा आणि जगातील एकमेव असा कर्णधार ठरला, ज्याने आयसीसीच्या तीन वेगवेगळ्या स्पर्धांचे विजेतेपद मिळवले होते. धोनी हा कर्णधार म्हणून चतुर ठरलाच, पण मैदानात त्याचा शांतपणा, खेळाडूंवरील विश्वास यांमुळे तो कॅप्टनकूल म्हणूनही ओळखला गेला.
धोनी केवळ फलंदाज आणि कर्णधार म्हणूनच नाही, तर एक उत्तम यष्टीरक्षक म्हणूनही ओळखला जातो. त्याच्या यष्टीरक्षणातील चपळाईचे सर्वाधिक कौतुक होते. अनेकदा त्याने काही सेंकदातच फलंजादांना यष्टीचीत करण्याचे पराक्रमही केले आहेत. त्यामुळे तो स्टंपमागे असताना फलंदाजही सावध असतात. आज तो जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात यशस्वी यष्टीरक्षक आहे.
धोनीने क्रिकेटच्या मैदानात केलेल्या कामगिरीने तर सर्वांची मनं जिंकलीच, पण त्याच्या साधेपणाने सर्वांना भूरळ घातली. तो अनेकदा विजेतेपद मिळवल्यानंतर ट्रॉफी युवा खेळाडूंच्या हातात सोपवून मागे उभा राहातो. ग्राऊंड स्टाफमधील सदस्यांमध्ये मिसळतो. त्यांना आवर्जून वेळही देताना दिसतो.
निवृत्तीनंतरही तो शेतात रमलेला दिसतो, तर कधी रांचीत त्याच्या बाईकवरून फेरफटका मारताना दिसतो, तर कधी त्याच्या लाडक्या कुत्र्यांबरोबर खेळताना दिसतो. त्याच्या स्वभावातील हाच साधेपणा अनेकांना भावतो, त्याचमुळे त्याचे भारतातच नाही, तर जगभरात चाहते पाहायला मिळतात.
धोनीने 2019 वर्ल्डकपमधील उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध त्याच्या कारकिर्दीतील अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्याने अखेरच्या यासामन्यात 50 धावांची खेळी केली होती.
त्याने या सामन्यात रविंद्र जडेजाबरोबर शतकी भागीदारी करताना भारताला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता. पण तो 50 धावांवर असताना धावबाद झाला. त्यानंतर मात्र भारताच्या विजयाच्या आशाही संपुष्टात आल्या. या सामन्यात भारत 18 धावांनी पराभूत झाला.
धोनी भारतासाठी तिन्ही क्रिकेट प्रकारात फलंदाजी, यष्टीरक्षण आणि नेतृत्व अशा विविध विभागात अनेकवर्षे जबाबदारी सांभाळत होता. पण 2014 सालच्या अखेरीस त्याने कसोटी क्रिकेटमधील त्याचा प्रवास थांबवण्याचा निर्णय घेतला. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका सुरू असताना अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला होता.
पण त्यानंतर तो वनडे आणि टी20 क्रिकेटमध्ये नियमितपण खेळताना दिसला. पण 2017 च्या सुरुवातीला त्याने वनडे आणि टी20 क्रिकेटमधील नेतृत्वाची जबाबदारी विराट कोहलीवर सोपवत कर्णधारपदावरून पायउतार झाला.
धोनीने कसोटी क्रिकेटमधून ज्याप्रकारे अचानक निवृत्ती घेतली, तशीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही 15 ऑगस्ट 2020 रोजी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करत निवृत्तीची घोषणा केली.
धोनीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतच नाही, तर चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना आयपीएलमध्येही मोठे यश संपादन केले. त्याने आयपीएलमध्ये 11 वेळा अंतिम सामना खेळला. तसेच ५ वेळा कर्णधार म्हणून चेन्नई सुपर किंग्सला विजेतेपदही जिंकून दिले. तो आयपीएलमधील सर्वाधिक सामने खेळणारा आणि सर्वात यशस्वी कर्णधारही आहे.
धोनीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 526 सामने खेळले असून 44.96 च्या सरासरीने 11 शतके आणि 108 अर्धशतकांसह 17266 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने यष्टीरक्षक म्हणून 829 विकेट्स घेतल्या आहेत.
चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार धोनी आयपीएलमध्ये सर्वाधिक 5 विजेतीपदं जिंकणाराही कर्णधार आहे. धोनीने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत 250 सामने खेळले असून 38.79 सरासरीने आणि 135.92 स्ट्राईक रेटने 5082 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 24 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने यष्टीरक्षण करताना 180 विकेट्स (138 झेल आणि 42 यष्टीचीत) घेतल्या आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.