

बुधवार, ४ मार्च रोजी खेळल्या गेलेल्या टी-२० वर्ल्ड कपच्या पहिल्या हाय-व्होल्टेज उपांत्य फेरीत न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवून फायनलमध्ये धडक मारली. मात्र, या विजयापेक्षा जास्त चर्चा रंगली आहे ती दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करम याच्या वादग्रस्त विकेटची. सोशल मीडियावर चाहत्यांनी 'थर्ड अंपायर'च्या निर्णयावर ताशेरे ओढले असून, नॉट आऊट असताना आऊट दिल्याचा दावा केला जात आहे.
दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी सुरू असताना रचिन रवींद्रच्या चेंडूवर डॅरिल मिचेलने मार्करमचा कॅच घेतल्याचा दावा केला. मैदानावरील पंचांनी निर्णय थर्ड अंपायरकडे सोपवला. रिप्लेमध्ये चेंडू जमिनीला स्पर्श करत असल्याचे काही कोनातून दिसत होते, खुद्द मिचेलही या कॅचबद्दल साशंक होता. मात्र, थर्ड अंपायरने पुराव्याअभावी 'क्लीन कॅच' घोषित करत मार्करमला १८ धावांवर बाद दिले. मार्करम त्यावेळी स्थिरावला होता आणि तो खेळला असता तर आफ्रिकेचा धावसंख्या १८० च्या पार गेली असती, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
मार्को जेनसनच्या फटकेबाजीमुळे दक्षिण आफ्रिकेने १६९ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य ठेवले होते. न्यूझीलंडच्या रचिन रवींद्र आणि कोल मॅककॉन्ची यांनी आफ्रिकेच्या बड्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. मात्र, जेव्हा न्यूझीलंड फलंदाजीला आले, तेव्हा फिन ॲलन नावाचे वादळ घोंगावले. ॲलनने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीची पिसे काढत अवघ्या ३३ चेंडूंत ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने झंझावाती शतक ठोकले. टिम सायफर्टने ५५ धावांची साथ दिल्याने न्यूझीलंडने हे लक्ष्य केवळ १२.५ षटकांतच पूर्ण केले.
एकवेळ जेतेपदाचे प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला या पराभवामुळे स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. मार्करमच्या विकेटवरून कितीही वाद झाला, तरी न्यूझीलंडने ज्या पद्धतीने खेळ केला, त्यासमोर आफ्रिकेचे गोलंदाज हतबल दिसले. फिन ॲलनला त्याच्या ऐतिहासिक खेळीसाठी 'प्लेयर ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरविण्यात आले. आता न्यूझीलंड जेतेपदासाठी कोणाशी भिडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.