भारताच्या महिला आणि पुरुष टेबल टेनिस संघांनी बुधवारी (21 फेब्रुवारी) इतिहास रचला आहे. भारताचे महिला आणि पुरुष हे दोन्ही संघ यावर्षी होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेसाठी पात्र ठरले आहे.
खरंतर भारताच्या दोन्ही संघांना बुधवारी बुसानमध्ये चालू असलेल्या आयटीटीएफ वर्ल्ड टेबल टेनिस टीम चॅम्पियनशीप स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला, पण तरी या संघांनी रँकिंगच्या जोरावर पॅरिस ऑलिम्पिकची पात्रता मिळवली आहे.
दरम्यान ऑलिम्पिकमध्ये 2008 पासून सुरू झालेल्या टेबल टेनिस स्पर्धेसाठी भारताचे महिला आणि पुरुष संघ पात्र ठरण्याची ही पहिली वेळ आहे. तथापि, अद्याप याबद्दल अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, कारण संघांची रँकिंग 4 मार्चला अपडेट होणार आहे. पण, समीकरणानुसार भारताचे दोन्ही संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरत आहेत.
याबद्दल भारतीय टेबल टेनिस फेडरेशनचे सचिव कमलेश मेहता यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की 'भारताचे महिला आणि पुरुष संघाची कामगिरी चांगली झाली आहे, आम्हाला त्यांचा अभिमान आहे. आम्ही त्यांच्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याच्या अधिकृत घोषणेची वाट पाहात आहोत, ही घोषणा 5 मार्चला करण्यात येईल.'
बुधवारी उपउपांत्यपूर्व फेरीत मनिका बत्राच्या नेतृत्वातील भारतीय महिला टेबल टेनिस संघ चायनिज तिपेईविरुद्ध 1-3 पराभूत झाला, तर शरथ कमलच्या नेतृत्वातील भारतीय पुरुष संघाला 0-3 ने दक्षिण कोरियाकडून पराभवाचा धक्का बसला.
दरम्यान, लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की संघ जरी पहिल्यांदा पात्र ठरले असले, तरी एकेरीत आणि दुहेरी भारतीय टेबल टेनिसपटू यापूर्वी ऑलिम्पिकमध्ये खेळले आहेत. यात पॅरिस ऑलिम्पिकसाठी मनिका बत्रा आणि श्रीजा यांचे स्थान जवळपास पक्के आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.