Goa Sports: कियान नासिरी गिरी आठव्या इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल स्पर्धेत अगोदर फक्त दोनच मिनिटे खेळला, मात्र शनिवारी या एकवीस वर्षीय ‘सुपरसब’ने कमाल केली. अर्धा तासाच्या खेळात भरपाई वेळेतील दोन गोलसह (Goal) या बदली खेळाडूने शानदार हॅटट्रिक नोंदवत एटीके मोहन बागानला आयएसएलमधील ‘कोलकाता डर्बी’त स्वप्नवत विजय मिळवून दिला.
वास्को येथील टिळक मैदानावर एटीके मोहन बागानने (ATK Mohun Bagan) ईस्ट बंगालला एका गोलच्या पिछाडीवरून 3-1 फरकाने हरविले. आयएसएलमध्ये या दोन्ही संघातील चार लढतीत एटीके मोहन बागानने आता ओळीने विजय मिळविले आहेत. भारतीय, विशेषतः कोलकात्यातील फुटबॉलमध्ये खेळाडू-प्रशिक्षक या नात्याने नावलौकिक मिळविलेले इराणचे जमशिद नासिरी यांचा कियान हा मुलगा आहे. आयएसएलमध्ये शनिवारी तो दुसराच सामना खेळला.
सामन्यातील सर्व गोल उत्तरार्धातील खेळात झाले. नेदरलँड्सच्या डॅरेन सिडोल याने 56व्या मिनिटास ईस्ट बंगालतर्फे गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडली. बदली खेळाडू कियान गिरी याने 64व्या मिनिटास ‘फर्स्ट टच’ गोल नोंदवून एटीके मोहन बागानला बरोबरी साधून दिली. 67व्या मिनिटास डेव्हिड विल्यम्सने पेनल्टी फटक्याची दिशा चुकविली आणि एटीके मोहन बागानला मोठे नुकसान झाले. मात्र नंतर गिरी याने भरपाई वेळेत सलग दोन गोल नोंदवून हॅटट्रिकसह एटीके मोहन बागानला स्वप्नवत विजय मिळवून दिला. त्याने 90+2 व 90+3व्या मिनिटास गोल नोंदवत प्रशिक्षक हुआन फेरांडोंनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरविला.
एटीके मोहन बागान संघ या विजयामुळे गुणतक्त्यात चौथ्या स्थानी आला आहे. सलग सहा लढती अपराजित असलेल्या या संघाचा हा 11 लढतीतील पाचवा विजय असून त्यांचे 19 गुण झाले आहेत. स्पर्धेत सातवा पराभव स्वीकारल्यामुळे ईस्ट बंगालला 14 लढतीनंतर 9 गुणांसह शेवटच्या अकराव्या स्थानी राहावे लागले.
नाट्यमय उत्तरार्ध
सामन्याच्या पूर्वार्धात गमावलेल्या संधी पाहायला मिळाल्या, तर उत्तरार्ध नाट्यमय ठरला. सेटपिसेसवर नेदरलँड्सच्या डॅरेन सिडोल याने ईस्ट बंगालला आघाडी मिळवून दिली. त्याचा हा मोसमातील दुसरा गोल ठरला. विश्रांतीनंतरच्या अकराव्या मिनिटास अंतोनियो पेरोसेविच कॉर्नर किकवर सिडोल याने शानदार फटक्यावर गोलरक्षक अमरिंदर सिंगचा बचाव भेदला. यावेळी एटीके मोहन बागानच्या बचावातील त्रुटी स्पष्ट झाल्या. तासाभराच्या खेळानंतर हुआन फेरांडो यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने पिछाडी भरून काढली. तीन मिनिटे अगोदर मैदानात उतरलेला कियान गिरी एटीके मोहन बागानसाठी ‘सुपरसब’ ठरला. त्याच्या ‘फर्स्ट टच’ वर बरोबरीचा गोल झाला. आयएसएल स्पर्धेत यापूर्वी पदार्पण करताना गिरी फक्त दोनच मिनिटे खेळला होता. नंतर डेव्हिड विल्यम्सने पेनल्टी फटका दिशाहीन मारल्यामुळे एटीके मोहन बागानने आघाडी घेण्याची सुवर्णसंधी गमावली. ईस्ट बंगालच्या अमरजित कियाम याने गोलक्षेत्रात लिस्टन कुलासोला पाडल्यानंतर रेफरीने पेनल्टी फटक्याची खूण केली होती. गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्य याला चकविण्याच्या नादात विल्यम्सने चेंडू भलत्याच दिशेने मारला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.