पणजी: गोवा बुद्धिबळ संघटनेची (Goa Chess Association) आगामी निवडणूक स्वच्छ आणि पारदर्शक वातावरणात व्हावी अशी मागणी तिसवाडी तालुका बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष महेश कांदोळकर (Mahesh Kandolkar) यांनी केली. सध्याच्या निवडणूक प्रक्रियेस सासष्टी तालुका बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष आशेष केणी यांनीही आक्षेप घेतला आहे.
निवडणूक अधिसूचना जारी केल्यानंतर वैध कारणाशिवाय ठराविक कालावधीपुढे प्रक्रिया रद्द किंवा लांबणीवर टाकता नाही याकडे कांदोळकर यांनी लक्ष वेधले आहे. कोविड-१९ महामारीच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपूर्वी निवडणूक घेण्याचा आग्रह त्यांनी धरला आहे.
सध्याच्या निवडणूक प्रक्रियेसंदर्भात कांदोळकर यांनी मावळत्या समितीच्या सचिवांकडून स्पष्टीकरण मागविले असून त्यासंदर्भात त्यांना ईमेल पाठविला आहे. गोवा बुद्धिबळ संघटनेची २०२१-२०२५ कालावधीसाठी व्यवस्थापकीय समिती निवडण्यासाठी ३० जुलै रोजी निवडणूक नियोजित होती, पण दोन तालुका संघटनांच्या निवडणुका लांवणीवर पडल्याचे कारण देत राज्य संघटना निवडणूक लांबणीवर टाकण्यात आली आहे.
पुरेसा कालावधी आवश्यक
संघटनेच्या घटनेनुसार उमेदवारी अर्ज प्रक्रिया पूर्णतेसाठी १४ दिवसांचा कालावधीत अत्यावश्यक असल्याचे संघटनेचे सचिव किशोर बांदेकर यांनी म्हटले आहे.
महिनाभर लांबणीवर का?
संघटनेची निवडणूक महिनाभर लांबणीवर का टाकण्यात आली असा सवाल कांदोळकर यांनी केला आहे. तालुका संघटनांना माहिती न देता एका वर्तमानपत्रांतील बातमीद्वारे निवडणूक 22 ऑगस्टला होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र आम्ही नऊ जुलै रोजी संघटनेच्या वास्को येथील नोंदणीकृत कार्यलयात गेलो असता उमेदवारी अर्ज देण्यात आले नाही, असे कांदोळकर यांनी म्हटले आहे. तीन तालुका संघटना निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच राज्य संघटना निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. संघटनेच्या 19 जून रोजीच्या सुधारित सूचनापत्रकानुरास उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 5 ते 12 जुलै हा कालावधी निश्चित करण्यात आला होता. बाकी तीन संघटनेची निवडणूक प्रक्रिया चार जुलै रोजी संपली. त्यानंतर संबंधित तालुका संघटनेने अधिकृत पत्राद्वारे त्यांच्या प्रतिनिधींची नावे पाठविली. आता गोवा बुद्धिबळ संघटनेच्या १३ जुलैच्या ईमेलनुसार प्रतिनिधी यादीस अंतिम स्वरूप देण्यासाठी १९ जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे, असे कांदोळकर यांनी नमूद केले.
संघटना सचिवावर आरोप
गोवा बुद्धिबळ संघटनेच्या सध्याच्या व्यवस्थापकीय समितीची मुदत ३० जून रोजी संपली. आता कोविड-१९ विषयक निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहे, तरीही निवडणूक लांबणीवर टाकल्याबद्दल कांदोळकर यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. यासंदर्भात तालुका संघटनांना अंधारात ठेवल्याबद्दल त्यांनी निषेध नोंदविला आहे. संघटनेचे सचिव तालुका संघटनांना हेतूपूर्वक सतावत असल्याचा आरोप कांदोळकर यांनी केला आहे.
संघटनेचे सचिव अनियमित : केणी
सासष्टी तालुका बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष आशेष केणी यांनी गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नीलेश काब्राल व अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाला पत्र पाठवून राज्य संघटनेचे सचिव अनियमित रीतीने कार्य करत असल्याचा आरोप केला आहे. केणी यांनी पत्रात म्हटले आहे, की कोविड-१९ निर्बंधांमुळे तालुका संघटनेची निवडणूक दहा दिवसांसाठी लांबणीवर टाकण्याची मागणी केली होती. त्यानंतर सरकारच्या परवानगीने नंतर निवडणूक घेण्यात आली. त्यानंतर गोवा बुद्धिबळ संघटनेच्या सचिवांनी निवडणुकीची नवी तारीख ठरविण्यासंदर्भात ईमेल पाठविला, पण सचिव किशोर यांनी उमेदवारी अर्ज स्वीकारणे लांबणीवर टाकल्याचे नमूद केले नाही, तसेच उमेदवारी अर्जासाठी दूरवरून आलेल्या प्रतिनिधींना ते नाकारण्यात आले. अधिसूचनेनुसार अर्ज स्वीकारण्यासाठी १२ जुलै शेवटची तारीख होती.
आता वर्तमानपत्रातील बातमीनुसार संघटनेची निवडणूक २२ ऑगस्टला होणार असून सचिव खजिनदारपदासाठी, तसेच सचिवपदासाठीही प्रस्तावित उमेदवार असल्याचे समजले. मात्र संघटनेच्या सचिवांनी अजून निवडणूक लांबणीवर टाकल्याचे अधिकृतपणे कळवलेले नाही. संघटनेचे कामकाज नियमानुसार आहे का, तसेच निवडणूक प्रामाणिकपणे होतेय का हे अध्यक्षांनी पाहावे ही विनंती आहे. सचिवाने सर्व निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे हस्तांतरीत करावी, जो निष्पक्ष असावा.``
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.