पणजी: डावखुरा अष्टपैलू दर्शन मिसाळ याच्याकडे रणजी करंडक क्रिकेट संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले. राजस्थान व झारखंडविरुद्धच्या सुरवातीच्या दोन सामन्यांसाठी संघ गोवा क्रिकेट संघटनेचे सचिव रोहन गावस देसाई यांनी रविवारी जाहीर केला.
(Darshan Missal as captain of Goa Ranji Trophy cricket team)
गोव्याचा राजस्थानविरुद्ध सामना मंगळवारपासून (ता. 13) पर्वरी येथे, तर झारखंडविरुद्ध जमशेदपूर येथे 20 डिसेंबरपासून सामना खेळला जाईल. मुंबईकर पाहुणा क्रिकेटपटू सिद्धेश लाड संघाचा उपकर्णधार आहे. सचिन तेंडुलकरचा पुत्र डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकर याला गोव्यातर्फे रणजी करंडक (प्रथम श्रेणी) पदार्पणाची संधी आहे.
डावखुरा फिरकी गोलंदाज अमूल्य पांड्रेकर याला संघातून वगळण्यात आले, तर गतमोसमात खेळलेल्या अमित यादव, आदित्य कौशिक व मलिक शिरूर यांचाही विचार झाला नाही. गोव्याच्या झटपट क्रिकेट संघातील नियमित खेळाडू, पण शेवटचा रणजी करंडक सामना जानेवारी 2015 मध्ये खेळलेला अष्टपैलू दीपराज गावकर याने सोळा सदस्यीय संघात पुनरागमन केले आहे.
यंदाच्या मोसमात एकदिवसीय, टी-20 स्पर्धेत खेळलेले ईशान गडेकर, मोहित रेडकर, ऋत्विक नाईक यांना रणजी संघात स्थान मिळाले असून फिरकी गोलंदाज शुभम देसाई 2019 नंतर गोव्याच्या संघात आला आहे.
दुसऱ्यांदा नेतृत्व
दर्शन मिसाळ याच्याकडे गोव्याच्या रणजी करंडक क्रिकेट संघाचे दुसऱ्यांदा नेतृत्व सोपविण्यात आले आहे. यापूर्वी 2017-18 मोसमात नियमित कर्णधार सगुण कामत जायबंदी असताना 27 वर्षीय खेळाडूने दोन सामन्यांत गोव्याचे कर्णधारपद भूषविले होते. त्यावेळी नोव्हेंबर 2017 मध्ये पर्वरीत झालेल्या लढतीत विदर्भाने गोव्याला डावाने हरविले होते, तर कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर बंगालविरुद्धचा सामना अनिर्णित राहिला होता.
मोसमातील चौथा कर्णधार
दर्शन हा गोव्याचा मोसमातील चौथा कर्णधार ठरला. ऑक्टोबरमध्ये जयपूर येथे झालेल्या सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 स्पर्धेत स्नेहल कवठणकर याने, तर नोव्हेंबरमध्ये बंगळूर येथे झालेल्या विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेत सुयश प्रभुदेसाई याने गोव्याचे नेतृत्व केले होते. सप्टेंबरमध्ये चंडीगड येथे झालेल्या जे. पी. अत्रेय एकदिवसीय स्पर्धेत अमोघ देसाई संघाचा कर्णधार होता. गतमोसमातील तिन्ही रणजी सामन्यांत स्नेहलने नेतृत्व केले होते.
सामन्यावर पावसाचे सावट
गोव्यात काही दिवस पाऊस पडण्याचे अंदाज आहेत. रविवारी रात्री पाऊस आला. त्यामुळे मंगळवारपासून पर्वरीत होणाऱ्या चार दिवसीय सामन्यावर पावसाचे सावट असेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.