आपल्या मागच्या दौऱ्यात 2014 साली गोव्यातील मेरशी येथे जनसभेला संबोधित करताना पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी उघड केलेले विशेष दर्जाचे भूत अजूनही गोव्याच्या मानगुटीवर बसलेले आहे. मोदी यांनी आता तरी गोमंतकीयांची त्याच्यापासून सुटका करावी, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
मोदींच्या गोवा दौऱ्याच्या एक दिवस आधी आलेमाव यांनी मेरशी येथील ‘त्या’ सभेतील त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ प्रसिद्ध केला असून गोव्याशी संबंधित विषयांवर बोलण्याचे आवाहन केले आहे. भाजप सरकारच्या भांडवलशाही धोरणामुळे गोव्याच्या अस्मितेला धोका निर्माण झाला आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारच्या पर्यावरणविरोधी, शेतकरीविरोधी धोरणांमुळे गोव्याचे पर्यावरण, वन आणि वन्यजीव धोक्यात आले आहेत, असेही आलेमाव यांनी म्हटले आहे.
गोमेकॉत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोविडच्या शेकडो रुग्णांच्या मृत्यूंबद्दल, मोपा विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर दाबोळी विमानतळाचे काय होणार यावर, गेल्या दहा वर्षांपासून गोव्यातील खाणकाम बंद आहे.
त्यावर, शेतकऱ्यांच्या लागवडीयोग्य सुपीक जमिनींवर लादण्यात येत असलेल्या प्रस्तावित आयआयटी प्रकल्पावर, पश्चिम घाटातील जैवविविधतेचा मोठ्या प्रमाणावर नाश करणाऱ्या तीन रेषीय प्रकल्पांवर बोलण्याची आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करतो. आमची जीवनदायीनी आई म्हादईचे पाणी वळविण्याच्या कर्नाटक राज्याच्या प्रयत्नांवर पंतप्रधानांना बोलू द्या, असे आवाहन आलेमाव यांनी केले आहे.
कोळसा, कॅसिनोंबाबत भूमिका स्पष्ट करावी
गोव्याला ‘कोळसा हब’ आणि ‘कॅसिनो कॅपिटल’ बनविण्याबाबत पंतप्रधानांनी सरकारची स्पष्ट भूमिका मांडणे आवश्यक आहे. अन्नधान्याची प्रचंड नासाडी आणि चोरीची पंतप्रधानांनी दखल घ्यावी.
सामूहिक पक्षांतराना उत्तेजन देणाऱ्या भाजपशासित अनेक राज्यांबद्दल त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. जनादेशाचा अपमान व लोकशाहीचा खून रोखण्यासाठी कडक पक्षांतरविरोधी कायदा आणण्यासंबंधी पंतप्रधान काही घोषणा करतील का, असा सवाल आलेमाव यांनी विचारला आहे.
युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते-
गोव्यावर मोठा आर्थिक बोजा आहे. भाजप सरकारने गोव्याला दिवाळखोरीत ढकलले आहे. 2012 मध्ये सत्तेत आल्यानंतर भाजप सरकारला गोवा लोकायुक्तांकडून भ्रष्टाचाराची 21 प्रमाणपत्रे मिळाली. मला आशा आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी या विषयावर बोलतील.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.