Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

Rohit Sharma Birthday: काकांकडे बालपण, कोचमुळे शाळेत मिळाली शिष्यवृत्ती ते भारताचा कर्णधार, वाचा हिटमॅनची स्टोरी

Pranali Kodre

Rohit Sharma Story: रोहित शर्मा हे भारतीय क्रिकेट वर्तुळातील एक प्रसिद्ध नाव. हिटमॅन नावाने ओळख मिळालेल्या रोहित शर्माचा आज (30 एप्रिल) 36 वा वाढदिवस आहे. रोहितने सुरुवातीला मधल्या फळीतील फलंदाज, मग सलामीवीर अन् आता भारताचा कर्णधार इथपर्यंत यश मिळवलं आहे. आगामी काळात तो वर्ल्डकपमध्येही भारताचे नेतृत्व करताना दिसेल. पण याच रोहितसाठी भारतीय क्रिकेटपर्यंत पोहोचण्याचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. त्याला अनेक कष्ट घ्यावे लागले.

रोहितचा जन्म झाला 30 एप्रिल 1987 रोजी महाराष्ट्रातील नागपूरमध्ये. त्याचे बाबा गुरुनाथ हे एका ट्रान्सपोर्ट स्टोअरहाऊसचे केअरटेकर म्हणून काम करत होते. त्याला एक लहान भाऊही आहे. रोहितचे कुटुंब नंतर मुंबईला स्थायिक झाले होते. पण त्याच्या आई-वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने रोहित बोरिवलीमध्ये त्याच्या आजी-आजोबांबरोबर आणि काकांबरोबर राहिला.

तिथेच त्याचे बालपण गेले. तो सुटीला फक्त आई-बाबांकडे जायचा. त्याच्या काकांच्या मदतीनेच त्याने 1999 मध्ये एक क्रिकेट क्लबमध्ये प्रवेश घेतला होता. तिथेच त्याला त्याचे प्रशिक्षक दिनेश लाड भेटले, ज्यांनी त्याच्या कारकिर्दीला एक महत्त्वाचे वळण दिले. दिनेश लाड यांनी त्याच्या काकांना त्याची शाळा बदलण्यास सांगितले. त्यांनी त्याला स्वामी विवेकानंतर इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रवेश घेण्याबद्दल सुचवले.

या शाळेत लाड क्रिकेट प्रशिक्षण देत होते. पण या शाळेची फी रोहितला आणि त्याच्या कुटुंबाला परवडणारी नव्हती. पण लाड यांना रोहितने त्याच्या खेळाने प्रभावित केले होते. त्यांनी शाळेतील अधिकाऱ्यांना रोहिला फ्रीशीप देण्यासाठी विनंती केली. अखेर त्याला ही फ्रीशीप मिळाली आणि रोहित नव्या शाळेत शिकू लागला, जिथे क्रिकेटसाठी चांगल्या सुविधा होत्या. या काळात रोहितनेही चांगली मेहनत घेतली.

रोहित सुरुवातीला ऑफ स्पिनर म्हणून खेळायचा. पण त्याच्यातील फलंदाजीचे कौशल्य लाड यांनी हेरले आणि त्यांनी रोहितला फलंदाज म्हणून घडवले. रोहितने हॅरिस आणि गिल्स शिल्ड या मुंबईतील मानाच्या शालेय स्पर्धेत सलामीवीर म्हणून खेळताना पहिल्या सामन्यात शतकही ठोकले.

पण तो प्रकाशझोतात आला ते मार्च 2005 मध्ये. त्याने देवधर ट्रॉफी स्पर्धेतून पश्चिम विभागाकडून लिस्ट ए क्रिकेटमध्ये मध्यविभागाविरुद्ध खेळताना पदार्पण केले होते. या सामन्यात त्याने 123 चेंडूत 142 धावांची खेळी केली होती. रोहितने त्याच्या क्षमतेच्या जोरावर नंतर 19 वर्षांखालील भारतीय संघात, मुंबई संघात आणि भारतीय अ संघातही स्थान मिळवले.

तो 2006 साली झालेला 19 वर्षांखालील वर्ल्डकपही खेळला. या स्पर्धेत त्याने 6 सामने खेळताना 41 च्या सरासरीने 205 धावा केल्या. त्यानंतर रोहितने 2007 साली भारताच्या संघातही पदार्पण केले. विशेष म्हणजे रोहितचे भारताकडून टी20 पदार्पण थेट 2007 टी20 वर्ल्डकपमध्ये झाले होते. त्यामुळे रोहितला पहिला वहिला टी20 वर्ल्डकप जिंकण्याचा मानही मिळाला. त्याने अंतिम सामन्यात भारतासाठी महत्त्वाची 30 धावांची खेळीही केलेली.

रोहित सुरुवातीला मधल्या फळीत खेळायचा, पण 2013 पासून त्याने सलामीला खेळायला सुरुवात केली. हा निर्णय यशस्वी ठरला आणि आता रोहित भारताचा यशस्वी सलामीवीर म्हणून ओळखला जातो. इतकेच नाही, तर आता रोहित भारताचा कर्णधारही आहे. तो आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 4 शतके करणारा, वनडेत तीन द्विशतके करणारा एकमेव खेळाडू आहे. त्याने हिटमॅन हे बिरुदही मानाने मिळवलं.

या दरम्यान, त्याला आयपीएलमधूनही मोठी ओळख मिळाली. 2008 साली डेक्कन चार्जर्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलेल्या रोहितने 2009 मध्ये ऍडम गिलख्रिस्टच्या नेतृत्वाखाली खेळताना पहिल्यांना आयपीएल ट्रॉफी जिंकली. त्यानंतर 2011 साली तो मुंबई इंडियन्स संघात आला आणि त्याच्या कारकिर्दीने नवीन वळण घेतले.

रोहितने 2013 मध्ये मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद स्विकारले. तेव्हापासून आत्तापर्यंत तो या संघाचे कर्णधारपद सांभाळत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने 5 वेळा आयपीएलचे विजेतेपदही जिंकले. त्यामुळे तो आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारही ठरला. महत्त्वाचे म्हणजे त्याच्या नेतृत्वाला 10 वर्षे पूर्ण होत असल्याने मुंबई इंडियन्सने 30 एप्रिल 2023 रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर होणारा सामना रोहितला समर्पित केला आहे. आता रोहितलाही त्याचा 36 वा वाढदिवस खास करण्याची अपेक्षा असेल.

रोहितची कारकिर्द

रोहितने त्याच्या कारकिर्दीत आत्तापर्यंत 49 कसोटी सामने खेळले. यामध्ये त्याने 45.66 च्या सरासरीने 9 शतके आणि 14 अर्धशतकांसह 3379 धावा केल्या आहेत. त्याने 243 वनडे सामने खेळले असून 30 शतके आणि 48 अर्धशतकांसह 48.63 च्या सरासरीने 9825 धावा केल्या आहेत.

रोहितने 148 आंतरराष्ट्रीय टी20 सामनेही खेळले असून 31.32 च्या सरासरीने 4 शतके आणि 29 अर्धशतकांसह 3853 धावा केल्या आहेत. रोहितने आयपीएलमध्ये 234 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 1 शतक आणि 41 अर्धशतकांसह 30.15 च्या सरासरीने 6060 धावा केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT