Restaurants in Goa: Shravan ka mahina Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Restaurants in Goa: 'श्रावण' का महिना

ताजी ताजी मासळी हि गोव्याची खासियत असली तरी इथले शाकाहारी पदार्थ हे सुध्दा तितकेच वेगळे आहेत. या पदार्थांचं महत्व श्रावणात समजतं.

Manaswini Prabhune-Nayak

श्रावणाची किमया किती निराळी आहे ना. हा  श्रावण सुरु होताच आजूबाजूच्या निसर्गात कमालीचे बदल घडतात आणि याबरोबर आपल्या आहारात देखील बदल घडतात. एरवी ताव मारुन नुस्ते (मासळी) खाणारी गोमंतकीय मंडळी या काळात आवर्जून शिवराक (शाकाहारी) जेवण जेवतात. श्रावण सुरु होतो आणि ताज्या भाज्या, फळं यांचं प्रतिबिंब आपल्या ताटात दिसू लागतं.

ताजी ताजी मासळी हि गोव्याची खासियत असली तरी इथले शाकाहारी पदार्थ हे सुध्दा तितकेच वेगळे आहेत. या पदार्थांचं महत्व श्रावणात समजतं. वर्षभरात या पदार्थांना ताटात तेवढं मानाचं स्थान मिळत नाही. पण श्रावण- भाद्रपद हे त्यांचे हक्काचे महिने. 

Restaurants in Goa: Shravan ka mahina

घराघरातल्या ताटातील पदार्थ बदलांवरुन श्रावण महिना सुरु झाल्याचं समजतं. पण आता हा बदल फक्त घरांपुरता राहिला नाही तर रेस्टोरंटमधील मेनूकार्डमध्ये याकाळात झालेला बदल अगदी ठळकपणे जाणवतो. एरवी मेनूकार्डवर न दिसणारी 'श्रावण थाळी' मोठ्या दिमाखात स्वतःला मिरवते. इथल्या रेस्टोरंटमध्ये वर्षभर शिवराक थाळी मिळते पण श्रावणात या थाळीचा आगळावेगळा थाट असतो. त्यात खास गोमंतकीय शकाहारी पदार्थांना महत्वाचं स्थान असतं. 'गोवन फिश थाळी' साठी प्रसिद्ध असलेली रेस्टोरंट देखील आता खवय्यांना आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी 'श्रावण थाळी' द्यायला लागली आहेत. 

Restaurants in Goa: Shravan ka mahina

दीड वर्षापूर्वी करोना नसताना पणजीतील अनेक रेस्टोरंटमध्ये 'श्रावण थाळी' मिळायची. डेल्मन हाॅटेल, फिडाल्गो, राजधानी यासारख्या हाॅटेल्सनी मागच्या काही वर्षांत श्रावणात वेगवेगळ्या पदार्थांची मेजवानी दिली होती. यावर्षी पणजीत कोणकोणत्या रेस्टोरंटमध्ये श्रावण थाळी मिळतेय याचा शोध घेतला तर अगदी हाताच्या बोटावर मोजावीत एवढीच रेस्टोरंटस सापडली आणि त्यात काही रेस्टोरंटस तर एरवी मिळणारी शाकाहारी थाळीच 'श्रावण थाळी' म्हणून ग्राहकांच्या पुढे ठेवून त्यांची फसवणूक करत आहेत. या शोध मोहीममध्ये 'पीप्स किचन' या प्रसिद्ध रेेस्टोरंट मध्येे अतिशय अप्रतिम अशी 'श्रावण थाळी' मिळाली. 

Restaurants in Goa: Shravan ka mahina

श्रावण थाळीचं वेगळेपण 

या थाळीचं वेगळेपण त्यातील पदार्थांमध्येच दडलेलं आहे. श्रावणातल्या सणवारांना बनवले जाणारे पदार्थ या थाळीत खायला मिळतात. याकाळात मिळणारे आंबाडे, हळदीची पानं, फागला, नीर फणस, वेगवेगळ्या ताज्या भाज्या यासगळ्यांपासून बनवले जाणारे रुचकर असे पदार्थ थाळीत असतात. मूगागाठी, सासंव, उडदमेथी, किसमूर, तोणांक यासारखे घराघरात बनवले जाणारे पदार्थ मुद्दाम श्रावण थाळीसाठी बनवले जातात. 

पीप्स किचनची श्रावण थाळी

ज्या काही हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच श्रावण थाळी सापडल्या त्यात 'पीप्स किचन'ची श्रावण थाळी अतिशय वैविध्यपूर्ण, वेगवेगळ्या चवींनीं भरलेली आहे. वांग्याचं खास गोमंतकीय पध्दतीचं भरीत, चण्याचा रोस, वडीयोंची किसमूर, बटाटा भजी, आंबाड्याचे सासंव, गरम गरम पुरी, गरम गरम भात आणि त्यावर ताजी तेरफळां आणि भेंडी घालून केलेला रोस, टोमॅटोची चटणी असा थाट पीप्स किचन मधील थाळीचा आहे. गरम गरम पुरी बरोबर चण्याचा रोस आणि टोमॅटोची चटणी फारच वेगळी संगती वाटली. खाल्ल्यावर तिखट -आंबट गोड अशी चव जिभेवर रेंगाळत राहते. वडीयो हा खास उन्हाळी वाळवणातला प्रकार ज्याला महाराष्ट्रात सांडगे म्हणलं जातं. तर या तळलेल्या कुरकुरीत वडीयोंची किसमूर देखील चवीत सुंदरशी भर घालते. सगळे पदार्थांचा छान आस्वाद घेऊन तृप्तीची ढेकर यायची तयारी असते तोच समोर हळदीच्या पानातली पातोळी येते आणि पातोळीला नाही कसं म्हणणार!

Restaurants in Goa: Shravan ka mahina

Dainik Gomantakपीप्स किचनमध्ये मिळणाऱ्या गोड पदार्थांसाठी पोटात आपोआप जागा तयार होते. बाजारात विकत मिळणारे गोड पदार्थ आणून तेच थाळीत वाढले जात नाही. तर श्रावणात ज्या गोड पदार्थांना महत्व आहे ते मुद्दाम बनवून थाळीत वाढले जातात. मनगणे, कणगाच्या नेवर्या, पातोळ्या, शेवयांची खीर, धोणंस रोज अशा वेगवेगळ्या गोड पदार्थांचा समावेश असतो. या गोड पदार्थांवर ताव मारणारे अनेकजण आजूबाजूस दिसतात. फिश थाळी घेणारे लोक देखील तुमच्या श्रावण थाळीकडे मोठ्या आश्चर्याने बघू लागतात. थाळीचा आकार, त्यातील पदार्थांची विविधता, जिभेवर रेंगाळणारी चव यामुळे अगदी पक्की मासेखाऊ व्यक्ती देखील फिश थाळी बाजूला सारून श्रावण थाळीला पसंती देईल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Suresh Prabhu: गोवेपण टिकवायचं असेल तर.... ; सुरेश प्रभूंनी सोप्या भाषेत समजावून सांगितलं

Pilgao Farmers Protest: खनिज वाहतुकिचा प्रयत्न हाणून पाडणार, पिळगाव शेतकऱ्यांचे वेदांता विरोधातील आंदोलन तीव्र, ST समाजही सहभागी

Goa Crime: 35.50 लाखांचा घोटाळा; Central Bank Of India च्या व्यवस्थापकाला अटक

Goa Live News Today: लाचखोरी प्रकरणी आयटीडी अधिकाऱ्यांना सशर्त जामीन मंजूर!

Suyash Prabhudessai: गोमंतकीय क्रिकेटप्रेमींची घोर निराशा, अष्टपैलू 'सुयश' IPL मध्ये Unsold

SCROLL FOR NEXT