Restaurants in Goa: गोमंतकीय चव जपणारे कोकणी कँटीन

गोव्यात (Goa) प्रत्येक रेस्टोरंटमधील थाळी आपापल्या परीने वेगळीच असते. पणजीत (Panjim) उपलब्ध असलेल्या अनेक पर्यायांमध्ये ‘कोकणी कॅन्टीन’ (Kokani Canteen) नावाचं रेस्टॉरंट खास गोमंतकीय चवीची जपणूक करणारं आहे
Restaurants in Goa: Kokni Canteen in Panjim
Restaurants in Goa: Kokni Canteen in PanjimManaswini Prabhune-Nayak
Published on
Updated on

गोव्यात (Goa) प्रत्येक रेस्टोरंटमधील थाळी आपापल्या परीने वेगळीच असते. पणजीत (Panjim) उपलब्ध असलेल्या अनेक पर्यायांमध्ये ‘कोकणी कॅन्टीन’ (Kokani Canteen) नावाचं रेस्टॉरंट खास गोमंतकीय चवीची जपणूक करणारं आहे. (Restaurants in Goa: Panaji's famous Kokani Canteen)

पणजीत एका वृत्तवाहिनीत काम करत असताना तिथल्या सर्व सहकाऱ्यांचा एक छान ग्रूप तयार झाला होता. दर महिन्याच्या सुरुवातीस हातात पगार पडला की आम्ही सगळे एकत्र जेवायला जायचो. यानिमित्ताने पणजीतील वेगवेगळ्या रेस्टॉरंटमधील ‘फिश थाळी’ची चव चाखायला मिळाली.

पणजीत महालक्ष्मी मंदिराच्या पुढे थोड्या अंतरावर गेलं की ‘कोकणी कॅन्टीन’ लागतं. खास पोर्तुगीज वास्तुशैली लाभलेल्या छान टुमदार घरात ‘कोकणी कॅन्टीन’ सुरू झालं आणि इथल्या आगळ्यावेगळ्या पदार्थांनी अनेकांना आकर्षित केलं. आता तुम्ही म्हणाल की असा काय आगळावेगळा मेनू? कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये जा थाळीमध्ये तेच ठरलेले पदार्थ असतात.

Kokni Kanteen in Panaji, Goa
Kokni Kanteen in Panaji, GoaManaswini Prabhune-Nayak

शीत (भात)-हूमण- कढी आणि तळलेली मासळी हे थाळीमध्ये समीकरण असलंच पाहिजे. थाळीत ह्या मुख्य पदार्थांबरोबर किसमूर, एखादी भाजी, एखादी रस भाजी इतके पदार्थ असतात. पण खास घरी बनवले जाणारे पदार्थ क्वचितच रेस्टॉरंटमध्ये मिळतात. ‘

कोकणी कॅन्टीन’चा मेनू तयार करताना त्यात खास गोमंतकीय हिंदू स्वयंपाकघरात बनवल्या जाणाऱ्या पदार्थांना महत्त्वाचं स्थान दिलं आहे. जसे प्रॉन्स डांगर, नीरफणस, बाटाटा-वांगं-केळी-भेंडी अशा वेगवेगळ्या भाज्यांची कापं, उडिदमेथी, सासंव, तळून दिलेले सुकें खारें(सुकी खारवलेली मासळी), तळलेल्या ‘वडयो’ (सांडगे), कालवां, तिसऱ्या, कुल्ल्यांचे तोणाक असे पदार्थ जे इथल्या घराघरात बनवले जातात, त्यांना प्राधान्य दिलंय.

Goa: Fish Thali at Panaji's Kokani Canteen
Goa: Fish Thali at Panaji's Kokani CanteenManaswini Prabhune-Nayak

कोकणी कॅन्टीनमध्ये शिरताच तुम्हाला तिथलं वातावरण भावतं. जुन्या घराचा अतिशय योग्य पध्दतीने उपयोग करुन घेतलाय. घराचा प्रत्येक कानाकोपरा वापरात आणलाय. घरात वापरल्या जाणाऱ्या विशेषत: स्वयंपाक घरात वापरल्या जाणाऱ्या वस्तू-भांडी सजावटीसाठी छान कल्पकतेनं वापरल्या आहेत. मनीषा कामत तळावलीकर आणि गिरीश देसाई यांनी सुरु केलेल्या कोकणी कॅन्टीनला अल्पावधीत खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. लोकांना अस्सल घरची चव हवी होती, ती त्यांना इथल्या पदार्थांमध्ये मिळाली. मनीषा कामत तळावलीकर यांनी स्वतः मेनूकार्ड तयार केले आहे.

खास गोमंतकीय पदार्थांवर त्यांचा भर होता. खवय्यांना नवीन पर्याय मिळाले पाहिजे या उद्देशाने हे मेनूकार्ड तयार झालं. घरगुती मसाल्यांचा वापर हेच इथल्या रुचकर चवीचं रहस्य. रोज बनणाऱ्या स्वयंपाकात हेच घरगुती मसाले वापरले जातात. पोटात कावळे ओरडत असताना म्हणजेच भरपूर भूक लागली असताना कोकणी कॅन्टीनमध्ये पाऊल टाकलं तर समोर फिश थाळीत भात-हुमण, सोलकढी, वालाची भाजी, विसवणाची तळलेली पोस्तं (कुरकुरीत तळलेली सुरमई), सुक्या सुंगटाची नाहीतर सुक्या बांगड्याची किसमूर, कुल्ल्यांचे तोणांक, तिसऱ्यांचे सुकें अशा पदार्थांनी भरगच्च भरलेली थाळी समोर येते. एवढी वैविध्यपूर्ण थाळी बघून आणखीन जास्त भूक लागते. पण यात तिसऱ्या जरा जास्त स्पेशल आहेत.

‘काफ्रियाल' मसाल्यात केलेल्या तिसऱ्यांची चव अतिशय चविष्ट आणि अतिशय वेगळी लागते. आम्ही घरी अनेकदा तिसऱ्या करतो पण तिसऱ्या काफ्रियाल मसाल्यात कधी खाल्ल्या नव्हत्या. हा एक वेगळा प्रकार खाऊन मजा आली. याशिवाय गोमंतकीय घरांमध्ये बनवले जाणारे काही विशेष पदार्थ इथे मिळतात उदा. डांगर म्हणजे कटलेट. यात प्रॉन्स डांगर अप्रतिम लागतात. खारे म्हणजे सुकी मासळी, बांगड्याची उड्डमेथी, पोस (खरवस) हे पदार्थ फार कमी हॉटेल्समध्ये मिळतात.

Kokani Canteen in Panaji, Goa offers wide variety of food
Kokani Canteen in Panaji, Goa offers wide variety of food Manaswini Prabhune-Nayak

खरंतर कोकणी कँटीन ' सी फूड ' साठी प्रसिद्ध आहे. अस्सल, खात्रीशीर असं ' गोवन सी फूड ' इथं मिळतं. त्यामुळे तुम्ही कधीही जा, इथे गर्दी असते. शिवाय इथे अस्सल गोवन शाकाहारी थाळी मिळते जी पणजीमध्ये खूप कमी हॉटेल्समध्ये मिळते. शाकाहारी थाळी आता जवळ जवळ सगळ्याच हॉटेल्समध्ये मिळते पण ती ' नॉर्थ इंडियन थाळी ' असते. ज्यात रोटी, छोले, पनीर असलं सगळं असतं. कोकणी कँटीनमधल्या थाळीत मात्र गोमंतकीय पद्धतीच्या दोन प्रकारच्या भाज्या, डाळ - भात, बटाटा-वांगी-नीरफणस -केळ्याच्या फोडी (रवा लावून खरपूस तळलेल्या फोडी ), सॅलड, दही, पापडाची किसमूर, एक पापड असे पदार्थ असतात.

त्यामुळे कोकणी कँटीन जरी ताज्या मासळीसाठी प्रसिद्ध असलं तरी इथल्या शाकाहारी थाळीचा थाट काही कमी नसतो. मला इथली सीझनमध्ये मिळणाऱ्या भाज्याची कुरकुरीत कापं विशेष आवडतात. जर पूर्ण थाळी खाण्या इतकी पोटात जागा नसेल तर स्वतंत्रपणे वेगवेगळे पदार्थ मागवू शकता. कुरकुरीत पावाबरोबर कालवावे तोणांक, कुल्ल्यांचे तोणाक, हळसाणे तोणांक खायला एकदम रुचकर लागतं. पाव खायचा नसेल तर गरम गरम पोळी -चपाती खाऊ शकता. आम्ही ऑफिसमधले आठ दहाजण जेवायला गेलो होतो.

प्रत्येकाच्या आवडीनुसार जेवण मिळालं. जेवणानंतरची स्वीट डिश मुद्दाम खाण्यासारखी आहे. छान तोंडात विरघळणारा खरवस आणि ‘सेराडुरा’ (एक प्रकारचं कस्टर्ड) ही कोकणी कॅन्टीनची खास स्वीट डिश मिळते. पोटभर जेवल्यानंतर या स्वीट डिशसाठी पोटात आपोआप जागा तयार होते. मित्र मंडळींबरोबर गप्पा मारत कोकणी कॅन्टीनमध्ये जेवण्यात वेगळीच मजा आहे. शाकाहारी आणि मासे खाणारे अशा दोघांसाठी कोकणी कँटीन एक वेगळा पर्याय आहे. कधी पणजीत असाल तर अवश्य इथं जाऊन बघा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com