Babush Monserrate: राजधानी पणजीतील स्मार्ट सिटीची कामे 31 मेपर्यंत पूर्ण होतील, परंतु या कामांच्या दर्जाबाबत सध्याच मी कोणतीही हमी देणार नाही, असे वक्तव्य पणजीचे आमदार तथा महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
स्मार्ट सिटीच्या कामांचा बाबूश मोन्सेरात यांनी वारंवार आढावा घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी शहरात चाललेल्या कामांची आज पाहणी केली. इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडचे (आयपीएससीडीएल) मुख्य कार्यकारी अधिकारी संजीत रॉड्रिग्ज व अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते. कामांचा आढावा घेण्यासाठी उद्या मंगळवारी मुख्य सचिवांसोबत बैठक घेतली जाईल. सर्व कंत्रादारांनाही बोलाविले जाईल, असे बाबूश यांनी स्पष्ट केले.
‘कामे पूर्ण होईपर्यंत सहकार्य करा, अतिक्रमणे हटवणार’
रस्त्यावरील अतिक्रमणांच्या मुद्यावर बाबूश म्हणाले, मुख्य सचिवांबरोबर बैठक झाल्यावर पणजी महानगरपालिका अधिकाऱ्यांबरोबर बैठक होईल. त्यानंतर शहरातील रस्त्यांवरील सर्व अतिक्रमणे हटविली जातील. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही एकावेळी एकाच रस्त्यावरील कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. मात्र, स्मार्ट सिटीची कामे पूर्ण होईपर्यंत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
आमदार झोपेतून जागे झाले : उत्पल पर्रीकर
पणजीतील स्मार्ट सिटीची कामे ३१ मेपर्यंत पूर्ण होतील, परंतु त्या कामांच्या दर्जाविषयी आपण हमी देऊ शकत नाही, या आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या भाष्यावर त्यांचे राजकीय विरोधक उत्पल पर्रीकर यांनी ‘गोमन्तक’कडे बोलताना खोचक टीका केली आहे. ‘स्मार्ट सिटीची कामे सुरू असताना दहा ते पंधरा डंपर-ट्रक खड्ड्यात गेले. काम पूर्ण झालेल्या ठिकाणी टँकर कलंडले, हे प्रकार कोणत्या दर्जाचे काम दर्शवितात. आपण आवाज उठवला, त्यामुळे ‘आमदार झोपेतून उठले ते बरे’, अशा शब्दात बाबूश यांच्या वक्तव्याचा उत्पल यांनी समाचार घेतला आहे.
मळा येथे युवकाच्या मृत्यूनंतर दखल
मळा येथे १ जानेवारी रोजी स्मार्ट सिटीच्या कामासाठी खोदलेल्या खड्यात दुचाकीसह पडून झालेल्या अपघातात युवकाचा मृत्यू झाला होता. त्यावेळी या कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. बाबूश यांचे राजकीय विरोधक उत्पल पर्रीकर यांनी पत्रकार परिषद घेऊन बाबूश यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर बाबूश यांनी उत्पल यांच्यासह माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर टीका केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दिल्लीवरून सल्ला आल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बाबूश यांना कानपिचक्या दिल्या होत्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.