म्हापसा : दत्तवाडी-म्हापसा येथील सेंट ब्रिटो हायस्कूलचा संरक्षक कठडा सोमवारी पडलेल्या संततधार पावसामुळे एका चारचाकीवर कोसळला. या अपघातात वीज खात्याची कर्मचारी अर्चना नाईक या जबर जखमी झाल्या. त्यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेत सापडलेल्या गाडीचा मात्र चेंदामेंदा झाला.
प्राप्त माहितीनुसार, सदर अपघात हा सोमवारी दुपारी 1.15 च्या सुमारास दत्तवाडी येथे काजरेश्वर मंदिराजवळ घडला. सज्जन संकुल इमारतीमध्ये वीज खात्याचे कार्यालय आहे. दुपारची जेवणाची सुट्टी झाल्यानंतर जखमी नाईक या कर्मचारी जेवणासाठी जात होत्या.
इमारतीच्या प्रवेशद्वाराच्या शेजारी त्यांनी आपली (GA 08 E 5076) क्रमांकाची कार पार्क केली होती. त्या गाडीमध्ये बसताच, शेजारील शाळेचा संरक्षक कठडा हा या कारवर कोसळला. ही बाब निदर्शनास येताच तुळशीदास खेडेकर व इतरांनी घटनास्थळी धाव घेतली.
खेडेकर यांनी इतरांच्या सहाय्याने संरक्षक कठड्याच्या दरडीखाली गाडीमध्ये अडकलेल्या व गंभीर जखमी झालेल्या नाईक यांना बाहेर काढले. खेडेकर यांनी स्वतःच्या कारमध्ये नाईक यांना घालून त्यांना म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात नेले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना गोवा वैद्यकीय इस्पितळात दाखल केले.
या घटनेची माहिती मिळताच म्हापसा अग्निशमन दलाचे उपअधिकारी अशोक परब यांच्या नेतृत्वाखालील पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच पोलीस उपनिरीक्षक सुनिल पाटील व हवालदार प्रभाकर परब यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर, नगरसेविका प्रिया मिशाळ यांनीही घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
अग्निशमन दलाच्या जवानांनी पालिका कर्मचार्यांच्या साहाय्याने रस्त्यावर कोसळलेली या संरक्षक कठड्याचे दगड, माती आणि कार बाजूला केली. या घटनेचा पंचनामा पोलीस हवालदार महेश शेटगांवकर यांनी केला.
दरम्यान, हा सेंट ब्रिटो हायस्कूलचा जवळपास आठ मीटर उंचीचा संरक्षक कठडा संततधार पावसामुळे जीर्ण झालेला आहे. या कठड्यावरील काही धोकादायक झाडे नंतर अग्निशमन दलाने हटविली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.