Goa Politics: खरी कुजबुज; राजकीय नेत्यांवर सूड...

Khari Khujbuj: बऱ्याच काळानंतर प्रियोळचे आमदार गोविंद गावडे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष फोंड्याच्या शिमगोत्सवात एकत्रित दिसले.
Khari Khujbuj
Khari KhujbujDainik Gomantak
Published on
Updated on

राजकीय नेत्यांवर सूड...

‘टीसीपीच्या ३९ ए’ कायद्याच्या विरोधात जोरदार आंदोलन झाले. रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टीचे आमदार वीरेश बोरकरमुळे या आंदोलनाची धार वाढली. त्याचा फायदा कॉंग्रेस, आम आदमी या पक्षांच्या नेत्यांनी घेण्याचा प्रयत्न पण झाला. आता टीसीपी खात्यातील फाईल गायब झाल्या, मंत्र्यांच्या निवास्थानावर मोर्चा नेण्यात आला. त्यासाठी राजकीय नेत्यांवर पोलिस तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारी मागे नेमके कोण आहेत, हे सुजाण गोमंतकीयांना सांगणे न लगे. तरी युरी व टीसीपी मंत्र्यांमध्ये गत विधानसभेत आरोप प्रत्यारोप झाले, विभिन्न प्रकारचे हातवारे झाले व युरीबाबने जी विधाने केली, त्याचा वचपा घेण्यासाठी कदाचित या तक्रारींचा ससेमिरा त्यांच्यासह इतर नेत्यांच्या पाठीशी लावण्याचा व सूड उगविण्याचे हे कारस्थान तर नसेल ना? अशी लोकांमध्ये चर्चा होताना दिसत आहे. ∙∙∙

गावडे-दामू एकत्र!

बऱ्याच काळानंतर प्रियोळचे आमदार गोविंद गावडे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष फोंड्याच्या शिमगोत्सवात एकत्रित दिसले. दोघांनीही सुरेख ढोलताशावादन करून उपस्थितांची मनेही जिंकली. दामू नाईक यांनी ढोलवादन करून तर गोविंद गावडे यांनी ताशावादन करून गोमंतकीय लोककलेची जाणीव करून दिली. त्यानंतर शिमगोत्सव समितीचे रितेश नाईक आणि नगरसेवक रॉय नाईक या दोन्ही रवी पुत्रांनीही ‘हम भी कुछ कम नही’चा प्रत्यय आणून दिला, एवढे सुरेख ढोलवादन केले. शिमगोत्सवाची भट्टी तर चांगलीच जमली आहे, आता या भट्टीवर फोंड्यातील पोटनिवडणुकीची पोळी भाजप कशी भाजून घेते, ते पहावे लागेल.

शिमगोत्सवाचा जोर

फोंड्यात शिमगोत्सवाचा जोर चढला आहे. पोटनिवडणूकही नजीकच्या काळात आहे. पोटनिवडणुकीसाठी लोकसंपर्काचे प्रभावी माध्यम म्हणून शिमगोत्सवाकडे इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे. शिमगोत्सवातून जनसंपर्क वाढीस लावताना मतांची टोपली आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी सध्या इच्छुक उमेदवारांची व्यूहरचना सुरू आहे. आता कसे काय बुवा? हे लोक जमवतील, हे त्यांचे त्यांनाच ठाऊक बुवा! पण ३ रोजी चंद्रग्रहण आहे, किती लोक घराबाहेर येतील? हे त्याच दिवशी कळेल बरं का!

कॅप्टनचा सल्ला मानणार?

गोव्यात प्रथमच भारतीय लष्करात काम करणारे दोघे लोकप्रतिनिधी बनले आहेत, म्हणजे लोकांनी त्यांना निवडून दिले आहे. मागे अनेक नेते गोमंतकीय तरुणांना भारतीय लष्करात सामील व्हा व भवितव्य घडवा, असे आवाहन करताना आढळले होते. पण गोवेकर तरुणांकडून त्यांना तसा प्रतिसाद मिळालेला नाही. गोवेकर सरकारी नोकऱ्या मागतील, प्रसंगी बेरोजगार राहतील पण लष्करात काही भरती होणार नाहीत कारण त्यांची ती मानसिकता नाही. पण आता एका खासदाराने केलेले हे आवाहन त्यांच्या मतदारसंघातील बेरोजगार तरुण तरी गांभीर्याने घेतील का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. बारावी वा पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर पासपोर्ट करणे व पोर्तुगालमार्गे लंडनकडे कूच करणे, हेच अनेकांचे गेल्या अनेक वर्षांचे ध्येय बनले आहे. लंडन वा अन्य युरोपीय देशांत जाणे व तेथेच राहतात, अशाचे मत परिवर्तन होईल का?

शिक्षणाचे व्यापारीकरण!

स्पर्धा आवश्यक आहे, मात्र शिक्षणाचा व्यापार व्हायला लागला आणि विद्यार्थी ग्राहक बनले, तर ते घातक म्हणावे लागेल. आपल्या राज्यात दुर्दैवाने शिक्षणाचे व्यापारीकरण व्हायला लागले आहे. राज्यात शिक्षणाच्या खासगीकरणाबरोबरच होलसेलमध्ये व्यापारीकरण व्हायला लागले आहे. गोव्यात अनेक खासगी शिकवण्या देणारी मोठमोठी केंद्रे उभी राहिली आहे. राजस्थानातील कोटा शिक्षण हबसारखे गोव्याला बीच शिक्षण हब बनविण्याचे कारस्थान चालले आहे, हे आपल्या गोव्याचे दुर्दैव. नीट, जेईई व इतर स्पर्धात्मक परीक्षेसाठी तयार करण्याकरिता गोव्यात इंटिग्रेटेड उच्च माध्यमिक शिक्षण खासगी शिकवणी केंद्रांनी सुरू केली आहे. लाखो रुपयांचे शुल्क आकारून विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी तयार केले जाते. यातून करोडो रूपायांचीं उलाढाल होत आहे. या स्पर्धेत लाखो रुपये खर्च करणारे सगळेच विद्यार्थी आयआयटी, वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी पात्र होतात, असे नाही. या व्यापारी कारणावर आपल्या शिक्षण मंत्र्याची नजर असायला नको का?

‘३९ ए’मुळे कॅसिनोंचा विसर

माजी न्यायमूर्ती रिबेलो यांनी गोव्यात ‘३९ ए’ व कॅसिनोविरुद्ध रणशिंग फुंकल्या नंतर लगेच त्याविरुद्ध जनमत तयार होईल, असे वाटले होते. निदान पणजी महापालिका निवडणुकीत तरी कॅसिनोचा मुद्दा ऐरणीवर येईल, असे अनेकांचे मत बनले होते. त्यानंतर ‘३९ ए’ विरुध्द उग्र आंदोलन उभे झाले व निदान सांतआंद्रे मतदारसंघापुरता तरी ‘३९ ए’ बाबत तोडगा निघाला, पण कॅसिनोविरुध्द मात्र काहीच झालेले नाही. निदान नव्या अवाढव्य कॅसिनो जहाजाबाबत काही तरी निर्णय सरकार घेईल असे दिसत होते, पण प्रत्यक्षात काहीच झालेले नाही. त्यामुळे ‘३९ ए’ च्या आंदोलनामुळे संबंधितांनी कॅसिनोकडे दुर्लक्ष केले की त्याचा विसर तर पडला नाही ना, अशी शंका कॅसिनो विरोधक व्यक्त करू लागले आहेत. ‘आमी पणजेकार’ त्याबाबत गंभीर आहेत ना? अशी विचारणाही होऊ लागली आहे.

Khari Khujbuj
Goa History: 1320 च्या दशकात खिलजी सेनापती मलिक काफूरने गोपकपट्टण लुटले; आर्यादुर्गा व गोव्यातील कदंब

माजी मंत्र्यांची मखलाशी!

सध्या गोव्यात लोकांच्या तोंडी एकच मुद्दा आहे, तो टीसीपी कायद्यांतील कलम ३९ ए. या कलमाबाबत ‘अआईई’ची ही माहिती नसलेले अनेकजण त्यावर तावातावाने बोलतात, ते समोर कॅमेरा आल्यावर व त्यामुळे लोकांची चांगलीच करमणूकही होते. काल एक माजी टीसीपी मंत्रीही असेच काहीतरी बोलत होते. त्यांना प्रत्यक्षात टीसीपीचा फुल फॉम काय? ते देखील माहीत असेल की काय असा प्रश्न त्याचे बोलणे ऐकून अनेकांना वाटले. तो सदर कलमामुळे काय हानी होईल, ते तोंडपाठ सांगत होता. पण आजवर त्या खात्याचा भार वाहिलेल्या अशा नेत्यांनी अशी अनिष्ट कलमे वा तरतुदी, त्या कायद्यात येऊ नये, म्हणून ते खाते सांभाळताना काय केले? अशी विचारणा अनेकजण करू लागले आहेत.

म्हापशातील फळे

म्हापशात फळांचा मोठा व्यापार चालतो. मार्केट यार्ड परिसरात घाऊक पद्धतीने फळ खरेदी विक्री चालते. उत्तर गोव्यातील किरकोळ व्यापारी येथूनच खरेदी करतात. म्हापशाच्या बाजारातही फळ विक्री मोठ्या प्रमाणावर होते. आता ही फळे रसायनांचा वापर करून कृत्रिमरीत्या पिकवू नयेत यासाठी अन्न व औषध प्रशासन खात्याने कारवाई सुरू केली आहे. गेले दोन दिवस त्या खात्याचे अधिकारी म्हापशात होते. योग्य पद्धतीने फळे पिकवण्यासाठी कृषी खात्याने व्यवस्था केली असतानाही बेकायदेशीरपणे फळे का पिकवली जातात याच्या मुळाशी यंत्रणा कधी जाणार असा प्रश्न यानिमित्ताने चर्चेत आला आहे. ∙∙∙

Khari Khujbuj
Goa Crime: घातपात की अपघात? पणजीच्या ला कॅम्पला कॉलनीत आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह; पोलिसांकडून तपास सुरू

चर्चिलचे ‘आप’शी लागेबांधे

आम आदमी पक्ष गोव्यात आपले पाय अधिक मजबूत करण्याच्या प्रयत्नांत आहे, हे सर्वश्रुत आहे. दिल्लीतील सत्ता गेल्याने त्यांचे नेते गोव्यात सतत ये-जा करीत आहेत. आम आदमी पक्षाचे गोव्यात दोन आमदार आहेत. यांचा या पक्षाला तसा फायदाच झाला आहे. पण २०२७च्या निवडणुकीत त्यांचे आमदार वाढणार की घटणार? हे तो वेळच सांगेल. पण सध्या आम आदमी पक्षाने वार्काचे पात्रांव चर्चिलबाब आलेमाव यांच्याकडील संबंध वाढविल्याचे ऐकिवात आहे. पक्षाच्या नेत्या अतिशी मार्लेना या त्यांना जाऊन भेटल्या आहेत. पण बाणावलीत वेन्झी व्हिएगशच्या रुपाने त्यांचा आमदार आहेच, तर मग चर्चिलशी संबंध जोडण्याचे कारण काय? एक तर वेन्झीबाबा आप नेतृत्वावर खूष नाहीत किंवा आप नेत्यांना वेन्झीबाबला बाजूला केले असेल. पण चर्चिलकडे संबंध जोडून पक्षाला काही फायदा होईल काय? पूर्वी प्रमाणे चर्चिलबाबची अजूनही या मतदारसंघावर पकड आहे का? याचा ‘आप’च्या नेत्यांनी सारासार विचार केला आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे. ∙∙∙

रितेश - रॉय एकत्र!

यंदा प्रथमच रवी नाईक नसताना फोंड्यातील शिमगोत्सव साजरा होत आहे. रवी यांनी मुख्यमंत्री असताना गावातील शिमगोत्सव शहरापर्यंत नेला. उद्देश एकच होता, शहरवासीयांनाही शिमगोत्सव समजावा पाहता यावा आणि आनंद लुटावा हाच. दरवर्षी सरकारी पातळीवरील शिमगोत्सव साजरा करण्याचा पहिला मान फोंड्याला जातो. यंदाही हा मान देण्यात आला आहे, मात्र रवी नाईक यांची अनुपस्थिती भाविकांना जाणवते, असे त्यांच्या कार्यकर्त्यांनी बैठकीवेळी सांगितले. मात्र रवी पात्रावच्या अनुपस्थितीत त्यांचे दोन्ही पुत्र रितेश आणि रॉय हे दोन्ही बंधू एकमेकांच्या सहकार्याने या शिमगोत्सवाचे शिवधनुष्य उचलले, हेही नसे थोडके, असेही शिमगोप्रेमी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com