Khari Kujbuj Political Satire: Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; दामू के आंगने मे विजय?

Khari Kujbuj Political Satire: विश्‍वजित राणे यांना बॅकफूटवर जावे लागले, त्याचे एक कारण म्हणजे जनमानसातून तीव्रतेने उमटलेली प्रतिक्रिया.

Sameer Panditrao

दामू के आंगने मे विजय?

दोन दिवसांपूर्वी घोगळ-हाऊसिंग बाेर्ड येथील संकटमोचन हनुमान मंदिराला फाताेर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी भेट देऊन या मंदिराला स्‍वत:ची दहा लाख रुपयांची देणगी जाहीर केली. एवढेच नव्‍हे तर मंदिराच्‍या सौंदर्यीकरणाचे काम आमदार निधीतून करण्‍याचे आश्‍वासनही दिले. वर वर ही गोष्‍ट धार्मिक स्‍वरुपाची असे वाटत असले तरी प्रत्‍यक्षात त्‍यामागेही बरेच मोठे राजकारण असल्‍याचे सांगितले जाते. ज्‍या भागात हे हनुमान मंदिर आहे, तो भाग सध्‍याचे भाजप प्रदेशाध्‍यक्ष आणि पूर्वीचे फातोर्ड्याचे आमदार दामू नाईक यांचे प्राबल्‍य असलेला भाग म्‍हणून ओळखले जाते. या भागातून सरदेसाई यांना निवडणुकीत फारशी मते पडलेली नाहीत. अशा परिस्‍थितीत या भागातील मंदिराला दहा लाखांची भरीव देणगी जाहीर करून विजयने एका दगडात कितीतरी पक्षी मारल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. दामूंच्‍या या अंगणात आता विजयने घुसखोरी केली, असे म्‍हणायचे का? ∙∙∙

रंगाचा बेरंग कसा झाला?

विश्‍वजित राणे यांना बॅकफूटवर जावे लागले, त्याचे एक कारण म्हणजे जनमानसातून तीव्रतेने उमटलेली प्रतिक्रिया. त्यामुळे गोव्यातील डॉक्टरांनी दाखवलेले असाधारण ऐक्य आहेच. परंतु आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा ११ वा वाढदिवस होता. नवी दिल्लीत एका बाजूला पंतप्रधानांच्या गौरवाची बातमी झळकली, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्याच पक्षाच्या गोव्यातील मंत्र्याच्या ‘महाप्रतापाची’ बातमी प्रसिद्ध झाली. स्वाभाविकच पक्षश्रेष्ठींना या आनंदाच्या क्षणी ही बातमी कटू वाटली तर नवल नाही. अजूनपर्यंत विश्‍वजित यांच्याकडे आश्‍वासक नेता म्हणून पाहणारी मंडळीही नाखूश झाली. गोव्यात स्वाभाविक प्रतिक्रिया उमटली. विश्‍वजितनी स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतला. त्यांना मिळू शकणारे मुख्यमंत्रिपद त्यांनीच आपल्या कर्तृत्वाने गमावले! ∙∙∙

प्रत्यक्ष तेथे माफी मागणार नाही!

सरकारी इस्पितळेच नव्हे तर सरकारी कार्यालयांमध्ये शिस्त राहिली नाही. अधिकारी बेमुर्वतखोर बनले आहेत. कोणाचा वचक राहिलेला नाही. सरकारी अधिकारी ‘जावई’ असल्यासारखे वागतात, असा अनुभव लोकांना दररोज येतो. या पार्श्वभूमीवर गोमेकॉतील डॉक्टरांनी आरोग्यमंत्र्यांच्या माफीनाम्यासाठी जो हट्ट धरला आहे, त्याची चर्चा सर्व स्तरावर सुरू झाली आहे. वास्तविक मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांचे पटत नाही. दोघे एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात. परंतु या प्रकरणात मुख्यमंत्री ठाम राहिले आहेत. ‘म्हातारी मेल्याचे दुःख नाही, काळ सोकावतो’ आरोग्यमंत्र्यांनी दोन वेळा जाहीरपणे डॉक्टरांची माफी मागितली आहे, तेव्हा प्रत्यक्ष इस्पितळात येऊन त्याच जागी डॉक्टरांची माफी मागण्याचा प्रश्न नाही. अशी सरकारची भूमिका आहे. मुख्यमंत्री स्वतः डॉक्टरांची समजूत काढतील, परंतु आरोग्यमंत्र्यांना गोमेकॉत येऊन माफी मागावी लागली तर प्रत्येक ठिकाणी असेच वातावरण तयार होईल, त्यामुळे सरकारी वचक निर्माण करण्याच्या प्रयत्नांना सुरुंग लागेल व सरकारी कर्मचारी शिरजोर होतील, अशी भीती सरकारच्या नेत्यांना आहे. परंतु गोष्ट खरी आहे की, सरकार हे प्रकरण सावधपणे हाताळते आहे. प्रकरण हाताबाहेर जाऊन द्यायचे नाही, याचीही काळजी घेतली जातेय! ∙∙∙

म्हापशात जे घडले ते लोकांना आवडले...

सरकारी इस्पितळातील डॉक्टरांच्या वर्तणुकीबद्दल लोक चांगले बोलत नाहीत. म्हापसा इस्पितळात स्वतः विश्वजित राणे यांनी याचा अनुभव घेतला. जेवणाची वेळ टळून गेल्यानंतर विश्वजित यांनी या इस्पितळाला भेट दिली असता तेथे खोलीचे दार बंद करून एक डॉक्टर व दुसरी महिला गुफ्तगू करीत बसल्याचे त्यांना आढळले. बाहेर रुग्णांची रांग लागली होती व हे डॉक्टर दार बंद करून बसले होते, त्यामुळे राणे यांनी त्यांना दटावले होते व त्यांची कॅमेऱ्यासमोर खरडपट्टी काढली होती. परंतु शनिवारी गोमेकॉमध्ये घडलेला प्रकार आरोग्यमंत्र्यांचा अतिरेक होता. मंत्री अत्यंत कृद्ध, उद्धट भाषेत बोलले.मुख्य अधिकाऱ्याचा सर्वांसमोर पाणउतारा करतो, ही हीरोगिरी नव्हती. त्यामुळे म्हापसा प्रकरणात त्यांनी जे कमावले होते, ते गोमेकॉ प्रकरणात गमावले. मंत्र्यासारख्या ज्येष्ठ नेत्याकडे संयम, तारतम्य असायला हवे, नपेक्षा जनतेच्या प्रक्षोभाला सामोरे जायची वेळ येते. त्यामुळे आरोग्यमंत्र्यांची इभ्रत व सारी प्रतिष्ठा धोक्यात येते, तसेच घडले. त्यांनी मोठी राजकीय नुकसानी ओढवून घेतली, ते वेगळे! ∙∙∙

दामू नाईकांचा ‘एल्गार’

परवा मडकई येथे झालेल्या भाजप मेळाव्यात भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी भाजप कार्यकर्त्यांना मडकई काबीज करा, असे आवाहन केले. आता हे आवाहन त्यांनी वीज मंत्री तथा मडकईतून सलग सहा वेळा निवडून आलेले ‘मगो’चे सर्वेसर्वा सुदिन ढवळीकर यांना डिवचण्याकरता केले होते का, भाजप कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याकरता केले होते. हे कळायला मार्ग नसला तरी त्यांच्या या आवाहनाची चर्चा आज दिवसभर बांदोड्यात सुरू होती. मडकईत सुदिन यांना हरविणे म्हणजे सध्या तरी ‘मुश्किल ही नही नामुमकीन है’ असा सूर या चर्चेतून निघत असलेला दिसत होता. तर काही ना हे आवाहन म्हणजे भाजप-''मगो’ युती संपविण्याची नांदी वाटत होती. आता या आवाहनाचा मतितार्थ काय तो कळेलच, पण सध्या दामूंचा हा ‘एल्गार’ मडकई मतदारसंघातील लोकांकरता एक मनोरंजनाचा विषय ठरलाय, एवढे मात्र नक्की. ∙∙∙

सरकारी दवाखाने झाले सक्रिय

परवा ‘गोमेकॉ’त जो प्रकार घडला त्याचे सर्वत्र तीव्र पडसाद उमटले आहेत. त्याचे अंतिमतः फलित काहीही होवो, पण तालुका व ग्रामीण भागांत जी सरकारी आरोग्य केंद्रें व उपकेंद्रे आहेत तेथील कर्मचारी म्हणे सक्रिय झाले आहेत. पूर्वी तेथे तपासणीसाठी आलेल्या लोकांबद्दल तत्परता नव्हती तसेच तेथील कर्मचारीही वक्तशीर नव्हते. पण परवापासून कोणीही न सांगता सगळे ठिकठाक दिसून येत आहे. लोकांबद्दल त्यांच्या वागणुकीतही बदल दिसून येत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. त्यामुळे गोमेकॉत जे काय घडले त्याचे चांगले परिणाम म्हणे ग्रामीण भागात लोकांना जाणवू लागले आहेत. असे म्हणतात, अगोदर विविध आरोग्यकेंद्रातील सुरक्षा कर्मचारीही कोणतीही चौकशी केली तरी सर्वसामान्यांची दखल घेत नव्हते. पण आता झालेला बदल पाहिला तर वाईटांतूनही चांगले निपजू शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे. ∙∙∙

‘गोमेकॉ’ची व्हीआयपी संस्कृती

गोमेकॉतील तज्ज्ञ डॉक्टरना बुधवारी व शुक्रवारी वाळपई मतदारसंघातील जनतेच्या सेवेसाठी पाठवले जाते. आदिती नाईक या माजी इंटर्नने इंस्टाग्राम व एक्सवर आपले अनुभव सांगताना हे नमूद केले आहे. ‘गोमेकॉ’तील कारभार कसा चालतो यावर तिने प्रकाशझोत टाकला आहे. तिने म्हटल्यानुसार, अन्य कोणत्याही मतदारसंघासाठी अशी सेवा नाही. याचा फटका ‘गोमेकॉ’च्या कारभाराला बसतो. महनीय रुग्णांना जागा निर्माण करण्यासाठी सर्वसामान्य रुग्णांना इतरत्र हलवणे ‘गोमेकॉ’त सामान्य बाब आहे. वैद्यकीय अहवालासाठीही सर्वसमान्यांना मोठी प्रतिक्षा करावी लागते. वशिला नसेल तर ‘गोमेकॉ’त उपचार होत नाहीत असे वाटेल, अशी स्थिती आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार पाण्यावरची टॅक्सी! कोचीचे पथक करणार पाहणी; प्रवाशांना मिळणार नवा पर्याय

Goa News Live: ओपा पाणी प्रक्रिया प्लांटमध्ये विद्युत बिघाड, तिसवाडी, फोंड्यात मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Politics: खरी कुजबुज; पैशांसाठी भारतीय स्त्रिया बनल्या विधवा?

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

SCROLL FOR NEXT