"..तेव्हाच आपल्याला उमजेल की आपण पैसे खाऊन जगू शकत नाही"! निसर्ग आणि माणूस; एक चिंतन

Goa Opinion: मानवाचा तांत्रिक विकास-ज्याला आपण ‘संशोधन’ म्हणतो ते आणि प्रगतीची जबरदस्त ओढ असूनही, आपण अजूनही पूर्णपणे निसर्गावरच अवलंबून आहोत.
Pale Siridao protest | Goa tree cutting issue|  Nature worship Indian culture
Pale Siridao protest | Goa tree cutting issue| Nature worship Indian cultureDainik Gomantak
Published on
Updated on

पाळे-शिरदोण येथील ग्रामस्थांनी जे आंदोलन केले, ते आपल्या प्रत्येक गोमंतकीयांच्या मनात कायम घर करून राहायला हवे. घरे, निवासी प्रकल्प (ज्यात कुणीही ग्रामस्थ कधीही फ्लॅट, व्हिला विकत घेऊन राहणार नाही) यासाठी झाडांची कत्तल केली जाते, तेव्हा आपल्या निवासापेक्षाही त्यांचे असणे किती महत्त्वाचे आहे, हे आपल्या लक्षांतही येत नाही.

म्हणूनच अबेनाकी-अमेरिकन, कॅनेडियन चित्रपट निर्मात्या लनिस ओबोमसाविन म्हणतात, ‘जेव्हा शेवटचे झाड तोडले जाईल, शेवटचा मासा पकडला जाईल आणि शेवटचा ओढा विषारी होईल, तेव्हाच आपल्याला उमजेल की आपण पैसे खाऊन जगू शकत नाही’, हे पटू लागते.

मानवाचा तांत्रिक विकास-ज्याला आपण ‘संशोधन’ म्हणतो ते आणि प्रगतीची जबरदस्त ओढ असूनही, आपण अजूनही पूर्णपणे निसर्गावरच अवलंबून आहोत. आपल्या विचारांच्या क्षेत्रातील सर्व प्रयत्नांना मर्यादा आहेत.

माणूस निसर्गचक्रातील एक घटक आहे; तेवढ्यापुरतेच त्याचे स्थान मर्यादित आहे. ज्याप्रमाणे निसर्गचक्रातील अन्य घटक त्या मर्यादांचे उल्लंघन करत नाहीत, तसेच माणसांनीही ते करता कामा नये. माणूस ‘मी वाट्टेल ते करू शकतो’ या अट्टहासापोटी निसर्गाचे नियमच बदलू लागतो व त्याचे परिणामही भोगतो.

‘जे काही आकाशात, पृथ्वीवर आहे ते परमेश्‍वराने माणसाच्या उपभोगासाठी कामाला लावले आहे’ आणि ‘संपूर्ण पृथ्वी व्यापून टाका आणि ती आपल्या ताब्यात घ्या’, अशी त्यांना देवाची आज्ञा असलेल्या माणसांनी जगभरातील निसर्गपूजक, निसर्गरक्षक संस्कृती अक्षरश: संपवल्या. भारतीय संस्कृतीत निसर्गातील अनेक घटकांना आपल्या कुटुंबाचे सदस्य म्हटले गेले आहे.

मराठी भाषेत समुद्र हा पुल्लिंगी आहे (तो समुद्र); पण तमीळ व मल्ल्याळम समुद्रासाठी असलेला ‘कडल’ हा शब्द नपुसकलिंगी आहे. तरीही तिथे समुद्राला ‘कडल अम्मा’, असे मच्छीमार म्हणतात. गायीला आपण माता म्हणतो आणि म्हणूनच ‘आई माता असेल तर बैल काय बाप आहे?’,

असे विचारण्याचा गाढवपणा करीत नाही. धरित्रीला आपण माता म्हणतो, तेव्हा आदर असतो; पण जेव्हा जमीन समजतो तेव्हा दर ठरवून ती विकायला काढतो. निसर्गाचे रक्षण होण्यासाठी त्याविषयी विचारांत आणि आचरणात ‘आदर’ असावाच लागतो; अन्यथा फक्त ‘दर’ ठरवला जातो व निसर्ग नष्ट केला जातो.

आणि ते नेहमीच निसर्गाशी जोडलेले असतात. मनुष्य केवळ हेतू किंवा इच्छा व्यक्त करू शकतो, परंतु अंतिम परिणाम हा सहसा मानवी नियंत्रणाबाहेरच्या परिस्थितीवरच अवलंबून असतो.

भारतीय संस्कृतीत निसर्गातील प्रत्येक घटकाची पूजा करण्यामागे, काहींना मातृस्थानी मानण्यामागे ‘त्यांच्यामुळे आम्ही आहोत’ हा विचार आहे. या विचारामुळेच हजारो वर्षे आयुष्य असलेली झाडे, वनस्पती असलेल्या देवराया आजही टिकून राहिल्या.

अन्यथा कैक पिढ्यांआधीच त्या विकून खाल्ल्या असत्या. ‘मानव सर्वश्रेष्ठ आहे व त्याच्या उपभोगासाठी निसर्ग निर्माण झालाय’, हा विचार, पूर्वग्रह घातक आहे. आपल्या संस्कृतीला हीन ठरवत तिची टिंगलटवाळी करत राहण्याची वसाहतवादी मानसिकता आमच्यात इतकी भिनली आहे, की निसर्गपूजेला आम्ही थोतांड, अंधश्रद्धा म्हणू लागलो आहोत आणि त्याच तोंडाने निसर्गरक्षणाच्या गप्पाही हाणत आहोत.

वस्तुस्थिती ही आहे की, निसर्गाचा विनाश करत राहणे आणि तरीही या ग्रहावर आपण जिवंत राहू अशी आशा करणे आपल्याला कदापि परवडणारे नाही. ‘वसुधैव कुटुंबकम्’ असलेली कुटुंबपद्धती, संस्कृती नष्ट करण्याचे प्रमुख ध्येय असलेली विचारधारा आणि भांडवलशाही वृत्ती सतत सांगत असते की मानव अंतराळात, चंद्रावर आणि मंगळावर वस्त्या करेल.

Pale Siridao protest | Goa tree cutting issue|  Nature worship Indian culture
Maha Andolan: आमदार वीरेशना ‘सलाईन’ची मात्रा! सकाळी पुन्हा आझाद मैदानात उपोषण; आंदोलनकर्त्यांची घोषणाबाजी

अशा गोष्टी अल्पकाळासाठी व्यवसायाच्या दृष्टीने फायदेशीर वाटू शकतात, पण त्या खरोखरच अर्थपूर्ण आहेत का? निसर्गापासून, कुटुंबापासून दूर जात असलेली आपली सध्याची जीवनशैली शाश्वत आहे का?

कुटुंब, गाव यांच्याशी आपली नाळ घट्ट जोडून ठेवणारा ग्रामीण भागातील सर्वसामान्य गोमंतकीय माणूस या भांडवलशाही प्रवृत्तीविरुद्ध उभा राहत आहे. परंतु, निसर्गाच्या सुंदर निर्मितीपेक्षा - ते हिरवेगार गडद जंगल, ते खळखळणारे झरे आणि पक्ष्यांचा किलबिलाट - यांच्यापेक्षा आपले विचार आणि त्या विचारांतून निर्माण केलेली सामाजिक-आर्थिक रचना अधिक महत्त्वाची आहे, हे शहरीकरणामुळे आपल्या मनावर झालेले संस्कार आपण पुसून टाकू शकू का?

Pale Siridao protest | Goa tree cutting issue|  Nature worship Indian culture
Maha Andolan: आझाद मैदानावर शेकडो नागरिक एकवटले! 39 A विरोधात महाआंदोलन; पोलिसांचा कडेकोट पहारा

माता म्हणून पृथ्वीला वंदन न करणारे व त्याचे समर्थन करणारे आपण भले चंद्रावर वस्ती करू; तेवढे मानवाचे सामर्थ्य निश्‍चितच आहे, पण म्हणून तसे ते करावे का? आपली पृथ्वी नष्ट करून तिथे जाऊन राहण्याचे समर्थन, इंग्रजीत विचार, उच्चार करून मातृभाषा त्यागण्याचे ‘ग्लोबल’ समर्थन करतो तसे करू. कदाचित उपयुक्त असेल, पण नैतिक असणार नाही. चंद्रावर, मंगळावर जीवसृष्टी तग धरू शकते, म्हणून हजारो वर्षे जिथे ती टिकून आहे तिथे ती नष्ट करणे चुकीचेच आहे.

झाडे, प्राणी, पृथ्वी पुजणाऱ्या भारतीय संस्कृतीला कितीही नावे ठेवली तरी ‘निसर्ग आहे, म्हणून आम्ही आहोत’ हे त्रिकालाबाधित सत्य बदलत नाही!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com