Goa Politics: खरी कुजबुज; गोव्याचा माजी मंत्री झालाय गजनी?

Khari Kujbuj Political Satire: ‘जे चकाकते ते सगळेच सोने असत नाही’ असे म्हणतात. राज्य सरकारने परवा मोठ्या धडाक्यात पर्यावरण दिवस साजरा केला.
Goa Latest Political Updates
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

युरीबाब आपली प्रतिक्रिया दिसली नाही!

‘जे चकाकते ते सगळेच सोने असत नाही’ असे म्हणतात. राज्य सरकारने परवा मोठ्या धडाक्यात पर्यावरण दिवस साजरा केला. ‘एक पेड माँ के नाम’ कार्यक्रम आयोजित केला. याच प्रसंगाचे औचित्य साधून कुंकळ्ळीतील एका १० वर्षांच्या व्युस्ती विजय प्रभू या मुलीने ‘राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणात सुमारे दोन हजार झाडांची कत्तल होणार आहे ती अडवा’ अशी आर्त हाक देत मुख्यमंत्री व पर्यावरणमंत्र्यांना पर्यावरणदिनी पत्र लिहिले. व्युस्ती हिच्या धाडसाचे मात्र कौतुक झाले आणि होत आहे. पर्यावरणप्रेमींसह कुंकळ्ळीकरांनी तिच्या पालकांना फोन करून तसेच तिची भेट घेऊन तिच्या निसर्गप्रेमाची तोंडभरून स्तुती केली. मात्र, स्थानिक आमदार व विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांची यावर प्रतिक्रिया मात्र कुठे दिसली नाही. युरींनी कदाचित यावर मौन राखले असावे. खरे म्हणजे व्युस्ती यांचे वडील युरी आलेमाव यांचे जवळचे कार्यकर्ते. असे असतानाही युरींच्या नजरेतून ही बातमी कशी सुटली हे मात्र समजू शकले नाही. ∙∙∙

गोव्याचा माजी मंत्री झालाय गजनी?

‘एक झूठ को छुपाने के लिए सौ झूठ बोलने पडते है’ अशी एक म्हण आहे. गोव्याच्या एका भाजपाच्या माजी मंत्र्याने विद्यमान भाजपा मंत्र्यावर व सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. मंत्री जमिनीच्या खरेदी विक्री संदर्भातील फाइली पास करण्यासाठी लाखो रुपये मागतात असा आरोप त्या माजी मंत्र्यांनी केला होता. या विधानावर सरकारी अभियंता काशीनाथ शेट्ये यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. आरोप करणाऱ्या माजी मंत्र्यांना मानसिक आजार असून आठ तासांपूर्वी काय बोललो होतो हे त्यांना आठवत नाही असे म्हणे त्या मंत्र्याविरुद्ध वकिलांनी न्यायालयास सांगितले आहे. काशीनाथ बाब आता मतदारांना विचारतात असे गजनी लोक आमदार मंत्री बनले, तर या राज्याचे व जनतेचे काय होणार? याचा विचार करा व अशा विसरभोळ्या गजनींना घरी बसवा. ∙∙∙

दामू झाले सावध

कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्यावर कारवाई होणारच असे सांगणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी गोमेकॉतील डॉक्टर निलंबन प्रकरणात सावध भूमिका घेतली आहे. त्यांनी आपण आधी हा विषय समजून घेतो, उद्या चौकशी करतो. न्याय मिळेल असे पाहतो असे सांगून विषय गुंडाळला आहे. राज्यभरातच नव्हे, तर सगळीकडेच या कारवाईचा व्हिडिओ दामू यांनी पाहिला नसेल असे नाही. तरीही गावडेंबाबत आक्रमकरीत्या प्रतिक्रिया देणारे दामू आता नरमले याची चर्चा आता सुरू झाली आहे. ∙∙∙

दामूंचे टायमिंग

भाजपचा राष्ट्रीय नेता राज्यात आला, तर त्याच्या स्वागतासाठी जबाबदार पदाधिकाऱ्याने जाणे हा शिष्टाचार. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष कारवारला जाण्यासाठी गोव्यातील विमानतळावर उतरले. ते काणकोणमध्ये राहून कारवारला रवाना होणार होते. प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी त्यांचे स्वागत केले. त्याचे छायाचित्र फेसबुकवर अपलोड केले. झाले, त्यामुळे राजकीय चर्चेला ऊत आला. उद्याच मंत्रिमंडळ बदलास सुरवात होईल असे वातावरण तयार झाले. संतोष कारवारला जाऊन दिल्लीलाही परतले. जातानाही दामू यांनी त्यांना निरोप दिला. मात्र, छायाचित्र अपलोड करण्याचे दामूंचे टायमिंग किती जबरदस्त होते याची चर्चा आता सुरू झाली आहे. ∙∙∙

गृह योजनांचे तीनतेरा

मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे हल्ली दिवसागणिक नवनव्या घोषणा करताना दिसत आहेत, पण त्यांची अंमलबजावणी कितपत होते हा एक प्रश्नच असल्याचे आता नीज भाजपवालेच म्हणताना दिसतात. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे २०२७ मधील निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून अशा घोषणा ठीक आहेत, पण त्यातून नव्या समस्या उद्भवणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी, पण ते दोतोरांना सांगणार कोण हा प्रश्न आहे. आता त्यांनी परवा जी दुर्बल घटकांसाठी गृहयोजनेची घोषणा केली आहे त्याबाबत हीच मंडळी सवाल करत आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे गृहनिर्माण मंडळाची दुर्बलांसाठी (ईडब्ल्यूएस) गृहयोजना आहे. प्रत्येक वसाहतीत ती घरेही होती, पण प्रत्यक्षात काही ठिकाणी झोपडपट्ट्या तयार झाल्या आहेत, तर काही ठिकाणी या एक खोलीच्या घरांच्या ठिकाणी बंगले, तर काहीकडे दोन-तीन मजली इमारती उभ्या झाल्या आहेत. मग आणखी वेगळी योजना कशाला अशी चर्चा सुरू झाली आहे. ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज; काँग्रेसचे ‘लाव रे तो व्हिडिओ’

शिक्षकांनाच धडा!

इयत्ता तिसरी ते आठवीपर्यंतच्या परीक्षांच्या प्रश्‍नपत्रिका आता जीएससीईआरटी काढणार आहे. त्यामुळे आता शिक्षकांना याचा संताप निश्‍चितपणाने होणार आहे. पूर्वी आपल्या विषयातील आपल्याला जे हवे ते शिकविले उर्वरित अभ्यासक्रम सोडून दिला. जेवढे शिकवले आहे त्यावर प्रश्‍नपत्रिका काढली की व्हायचे, परंतु आता प्रश्‍नपत्रिका काढायच्या नसल्याने कोणता प्रश्‍न येईल सांगता येत नाही. त्यामुळे पूर्ण अभ्यासक्रम शिकवावाच लागणार आणि तोही अतिशय काटेकोरपणे. एकंदरीत जीएससीईआरटीद्वारे प्रश्‍नपत्रिका काढून केवळ विद्यार्थ्यांचीच परीक्षा घेतली जाणार आहे असे नाही, तर यातून शिक्षक आणि शाळांचे देखील प्रगती पुस्तक तयार होणार असल्याची चर्चा आता राज्यातील शिक्षकांमध्ये सुरू झाली आहे. एकंदरीत प्रश्‍नपत्रिकेमुळे शिक्षकांनाच हा धडा रुचला नसल्याचे बोलले जात आहे. ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: दामू नाईक - संतोष यांची विमानतळावर भेट! रात्री उशिरापर्यंत खलबते; राजकीय वर्तुळात खमंग चर्चा

पावसाने दिली संधी पण...

सगळ्यांचे अंदाज खोटे ठरवत पावसाने यंदा मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातच पदार्पण केले. मान्सूनला पडत नाही असा जोरदार पाऊस त्या दिवसात पडला. त्यामुळे डांबरीकरण, शाळांचे छप्पर आदी कामे खोळंबली. विविध भागांत भूमिगत वीज केबल, मलनिस्सारण वाहिन्या घालण्याचे काम अर्धवट राहिले. त्यासाठी खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती न झाल्याने प्रत्येक ठिकाणी लोकांची प्रचंड गैरसोय होत आहे, पण मुद्दा तोही नाही. गेला आठवडाभर पावसाने दडी मारली आहे व मे महिन्यात ऊन पडले होते, तेव्हा संबंधित यंत्रणेणे रस्त्यांची दुरुस्ती का केली नाही अशी विचारणा होऊ लागली आहे. खरे म्हणजे खोळंबून असलेले हॉटमिक्सचे मिश्रण टाकून तात्पुरती रस्ता दुरुस्ती केली असती तर गैरसोय दूर झाली असती, पण त्याकडे कोणी लक्ष दिलेले नाही. त्यामुळे पुन्हा रस्ता दुरुस्तीचे कंत्राट जारी करण्याची क्लृप्ती तर त्यामागे नसावी ना असा संशय व्यक्त केला जात आहे. खरे म्हणजे अशा दुरुस्तीची संधी पावसाने दिली आहे, पण ती घेण्यास सरकार कमी पडत आहे असे दिसत आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com