Goa Politics: खरी कुजबुज; रवी नाईक ‘किंगमेकर’?
रवी नाईक ‘किंगमेकर’?
परवा आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी फोंड्याच्या एका कार्यक्रमात कृषिमंत्री रवी नाईक हेच भंडारी समाजाचे नेते असल्याचे प्रतिपादन केले. आणि त्यांच्या या बोलण्याचा प्रत्यय सध्या फोंड्यात येत आहे. उपेंद्र गावकर यांच्या समांतर म्हणून अस्तित्वात आलेल्या भंडारी समाजाच्या समितीचा बोलबाला फोंड्यात सुरू झाला आहे. पात्रावाची समिती म्हणून या समितीकडे फोंड्यातील भंडारी समाज बघू लागला आहे. त्यामुळे आपली समिती खरी, अशी म्हणणारे थोडेसे बाजूला फेकल्यासारखे झालेत. आणि यातून रवी पुन्हा एकदा ‘किंग मेकर’ ठरू लागलेत. आहे की नाही ‘नेहले पे देहला’चा प्रकार? आणि रवींच्या या ‘करामती’ची फोंड्यातील भंडारी समाजात जोरदार चर्चा सुरू झालेली दिसत आहे. ∙∙∙
दामूंचा चाळीसावा मेळावा
दामू नाईक ४० व्या भाजप कार्यकर्ता मेळाव्याच्या प्रतीक्षेत आहेत. विशेष म्हणजे हा चाळीसावा मेळावा खुद्द त्यांच्याच मतदारसंघात फातोर्डा येथे होणार आहे. मागच्या एकोणचाळीसही मेळाव्यांना दामूंनी उपस्थिती लावली. काही वेळा तर दिवसा दोन मेळावे घेण्यात आले. पण दामूंनी सर्व मेळाव्यांना उपस्थिती लावून लोकांत चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला, हे बाकी खरे. आता चाळीसावा मेळावा झाल्यानंतर दामूंना हायसे नक्कीच वाटणार...! ∙∙∙
वन योजनेमुळे लोकांत संभ्रम
काही दिवसांपूर्वी पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सोनसडो कचरा प्रकल्प परिसरात शहरी वन योजनेचा शुभारंभ करण्यात आला, त्यासाठी वनमंत्री राणे यांची खास उपस्थिती होती. दोनच दिवसांनी मुख्यमंत्री मडगावात आले. त्यांनी नगरसेवकांबरोबर चर्चा करून येथील समस्या जाणून घेतल्या. त्याच बरोबर सोनसड्यावर नव्या कचरा प्रकल्पाला मंजुरी देण्यात येईल, अशी घोषणा केली. आता सरकारला सोनसडो इथे नेमके काय करायचे आहे, हा प्रश्न पडला असून लोकांमध्ये संभ्रम पसरला आहे, हे नक्की. ही नगरपालिका निवडणुकांची तयारी तर नाही ना, अशीही शंका लोकांना येत आहे. ∙∙∙
दामूचा विजयवर अप्रत्यक्ष तीर
भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष व फातोर्ड्याचे दोन वेळचे माजी आमदार दामूबाब तसेच फातोर्ड्याचे विद्यमान आमदार विजय सरदेसाई यांच्यात अधुनमधून शाब्दिक चकमक उडत असते, पण अप्रत्यक्ष पद्धतीने. सध्या फातोर्ड्यात सिवरेज पाईपलाईनची समस्या उद्भवली आहे. या संदर्भात बोलताना दामूबाब सांगतात हा, प्रश्न आमदाराने सोडवायचा आहे. फातोर्ड्यामध्ये काही ठिकाणी बेकायदेशीर कामे चालू आहेत. त्याचा नायनाट करण्याची जबाबदारी पण आमदाराची. हे सांगून दामू बाब अप्रत्यक्ष रीतीने विजय यांच्यावर तीर सोडत आहेत, असे लोकांना वाटते. दामूबाब हळू हळू फातोर्डा मतदारसंघाकडे सुद्धा वळू लागल्याचे हे द्योतक तर नसेल ना, असेही लोक बोलू लागलेत. ∙∙∙
दिगंबरबाब वर्तमानपत्रांवर घसरले
कुडतरी मतदारसंघात भाजप कार्यकर्ता मेळाव्यात आमदार दिगंबर कामत वर्तमानपत्रांवर घसरलेले दिसले. वर्तमानपत्रांवर काहीही छापून आणले जाते, त्यावर विश्वास ठेवू नका. एखादा रस्त्यावर खड्डा पडला, तर वर्तमानपत्रे त्याचा मोठा बाऊ करतात. मात्र, भाजपतर्फे लोकांना मिळत असलेल्या वेगवेगळ्या योजना मिळतात, त्यांची त्यांना माहितीच नसते. दिगंबरबाब वर्तमानपत्रांवर का घसरले, याचे कोडे अनुत्तरीत आहे. ∙∙∙
मडकई मेळाव्यात ‘सीएम’ची, भाऊंची अनुपस्थिती
दुर्भाटमध्ये भाजपचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला, पण या मेळाव्याला मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक अनुपस्थित होते. एकट्या दामू नाईक यांनी बाजी लढवली. मेळाव्याचा कार्यक्रम तसा सुटसुटीत झाला हे मात्र खरे. मडकई मतदारसंघात भाजपची दोन शकले आहेत. त्यामुळे कदाचित या दोन्ही नेत्यांनी मेळाव्याला येण्याचे टाळले की काय, अशी चर्चा सभास्थळी रंगली होती. ∙∙∙
काब्रालच्या वह्या; रोहनची बॅग!
‘भगवान देता है तो छप्पर फाड कर देता है’, या म्हणीचा अनुभव कुडचडे भागातील शालेय विद्यार्थी घेत आहेत. कुडचडे मतदारसंघातील शालेय विद्यार्थ्यांना या मतदारसंघाचे आमदार नीलेश काब्राल यांनी मोफत वह्या वाटल्या आहेत. सरकारने पहिली ते आठवीपर्यंतच्या मुलांना मोफत पाठ्यपुस्तके दिली आहेत. ती मोफत मिळालेली पाठ्य पुस्तके व वह्या घालण्यासाठी भारतीय क्रिकेट मंडळाचे सहसचिव व काब्राल यांचे राजकीय प्रतिस्पर्धी रोहन गावस देसाई यांनी मुलांना मोफत बॅगा वाटल्या आहेत. एक मात्र खरे काब्राल व रोहन यांच्यातील स्पर्धा कुडचडे मतदारसंघातील मतदारांच्या पथ्यावर पडली आहे.आता पाहूया निवडणुकीत जनतेला वह्या आठवणीत राहतात, की बॅग आठवण राहते. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.