वास्को: येथील वास्को रेल्वे स्थानकाहून प्रवासी भाडे नेणाऱ्या खासगी बसचालकांविरोधात १५ दिवसांत कारवाई करण्यात आली नाही, तर आम्ही वेळप्रसंगी रस्त्यावर येऊ असा इशारा साईबाबा टॅक्सी असोसिएशन वास्कोच्या टॅक्सीचालकांनी दिला आहे. तथापि, वास्को टॅक्सीचालकांचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यासंबंधी आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी दिले. आमचे सरकार सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देत आहे. त्यामुळे रस्त्यावर येऊ नका, असे आवाहन साळकर यांनी केले.
आपल्या समस्या ऐकण्यासाठी संबंधित टॅक्सीचालकांनी आमदार साळकर व मुरगावचे नगराध्यक्ष गिरीश बोरकर यांना निमंत्रित केले होते. त्यांच्यासमोर त्यांनी आपल्या समस्या मांडल्या. पूर्वी आम्हाला हॉटेल ते दाबोळी विमानतळ दरम्यानचे भाडे हॉटेलाकडून मिळत होते, परंतु आता मोपा विमानतळ झाल्याने प्रवासी भाडे मिळणे कठीण जात आहे.
त्यातच वास्को रेल्वे स्थानकासमोर काही खासगी बसगाड्या येऊन प्रवाशांना प्रत्येकी १५० रुपये भाडे घेऊन जातात. त्यामुळे त्यांना मोठा व्यवसाय मिळतो, परंतु आमच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. याप्रकरणी त्या खासगी बसचालकांना विचारले, तर ते अरेरावीची भाषा करतात. याप्रकरणी आम्ही पूर्वी आमदार साळकर यांच्याकडे प्रश्न मांडला होता.
तेव्हा पोलिसांच्या मध्यस्थीमुळे ते बसचालक वास्को रेलस्थानकासमोर येत नव्हते, परंतु आता त्यांनी पुन्हा येण्यास आरंभ केला आहे. तसेच आम्हाला मुरगाव बंदरात येणाऱ्या क्रूझ प्रवाशांचे भाडे मिळत नाही. आम्ही वास्कोचे असूनही आम्हाला ही वागणूक दिली जाते. याकडे संबंधितांनी लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले.
साळकर म्हणाले की, या प्रकरणी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. वेळप्रसंगी या चालकांचे शिष्टमंडळही मुख्यमंत्र्यांच्या भेटीला नेण्यात येईल. वास्को रेल्वे स्थानकासमोर संबंधित बसगाड्या उभ्या करण्यास अटकाव करण्याची गरज आहे. यापूर्वी काही दिवस असा अटकाव करण्यात आला होता, परंतु आता ते पुन्हा येथील प्रवासी नेत आहेत.
या प्रकरणी आरटीओ वास्को कार्यालयाने कृती करण्याची गरज आहे, परंतु आरटीओ अधिकाऱ्यांकडून अशी कृती का होत नाही याबद्दल आश्र्चर्य वाटते. वास्को शहर भागात मोठ्या प्रमाणात रेंट-अ- कार, बाईक्स मोठ्या प्रमाणात पार्क केल्या जातात. जेणेकरून इतरांना वाहने उभी करण्यास जागा मिळत नाही. त्यासंबंधी आरटीओने लक्ष देण्याची गरज आहे.
क्रूझ टर्मिनलमध्ये येणाऱ्या क्रूझमधील प्रवासी मिळण्यासाठी टॅक्सीवाल्यांना क्यू सिस्टम तयार करण्याची गरज आहे. जेणेकरून सर्वांना भाडे मिळेल. भवितव्यात मोठ्या प्रमाणात क्रूझ तेथे येतील, तेव्हा या टॅक्सीवाल्यांनाही भाडे मिळण्याची गरज आहे. त्यासाठी योग्य तोडगा काढण्याची गरज असल्याने आपण, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, दाबोळीचे आमदार माविन गुदिन्हो यांच्याशी चर्चा करणार आहोत.
टॅक्सीचालकांना टॅक्सी स्टँड देण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. आम्ही एक जागा पसंत केली होती, ती टॅक्साचालकांनाही पसंत पडली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सर्व सोपस्कार करण्यात येतील. त्यांचे प्रश्न लवकरात लवकर दूर केले जातील.गिरीश बोरकर, नगराध्यक्ष वास्को
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.