Goa Crime News: नवेवाडे-वास्को येथे जळून मृत्यू आलेल्या शिवानी राजावत आणि जयदेवी चौहान यांचे मृत्यू हे अत्यंत संशयास्पदरीत्या झाले आहेत. यावेळी गरोदर असलेल्या शिवानीच्या पोटातील बाळही मृत पावले असून त्यांचा घातपाताने मृत्यू घडवून आणला ही जर गोष्ट खरी असेल तर हा तिहेरी खुनाचा प्रकार आहे.
कारण त्यात त्या जन्म न झालेल्या बाळाचाही मृत्यू झालेला आहे. त्यामुळे या प्रकरणाची गंभीरतेने चौकशी व्हायला पाहिजे, अशी मागणी ‘बायलांचाे एकवोट’ या संघटनेच्या आवदा व्हिएगस यांनी केला आहे. या प्रकरणाची सीबीआयद्वारे चौकशी करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे.
यासंबंधी आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिणार असल्याचे व्हिएगस यांनी सांगितले. यापूर्वी शिवानीचे वडील दिलीप सिंह चौहान यांनीही या प्रकरणाची सीबीआयद्वारे चौकशी करावी, अशी मागणी केली होती.
शिवानीचा पती अनुराग आणि त्याची आई आपल्या मुलीचा हुंड्यासाठी छळ करीत होते, असाही आरोप त्यांनी केला हाेता. पतीकडून आपला छळ होत असल्याचे शिवानीने तिची आई जयदेवी यांना सांगितले होते. त्यामुळेच तिला घरी नेण्यासाठी जयदेवी या वास्कोला आल्या होत्या.
दरम्यान, शिवानीचा भाऊ शुभम यांनीही या प्रकरणात गोलमाल असल्याचा दावा केला आहे. ज्या दिवशी हे जळीतकांड झाले त्या दिवशी आपली आई आणि बहीण मध्यप्रदेशला येणार होत्या.
त्यांना चांगल्याप्रकारे प्रवास करता यावा यासाठी मी त्यांना नंतरचे बुकिंग करून देतो, असे सांगितले होते. मात्र, कुठलेही तिकीट मिळू दे आम्हाला येथून लवकरात लवकर घरी यायला पाहिजे, असे आईने आपल्याला सांगितले होते.
त्यामागेही हेच कारण असावे, असा संशय त्यांनी व्यक्त केला. त्यावेळी मला याची गंभीरता जाणवली नव्हती. पण नंतर जे काय घडले ते भयानक स्वरूपाचे होते, असे शुभम यांनी सांगितले.
गंभीरतेने तपास व्हावा
ही दुर्घटना घडल्यानंतर घरातील वस्तूंच्या जागा बदलण्यात आल्याचे दिसून आले आहे. त्यानुसार पुरावे नष्ट करण्याचा तिथे प्रयत्न झाला असावा, असे प्रथमदर्शनी तरी वाटते. यामुळेच या प्रकरणात अधिक गंभीरतेने तपास होण्याची गरज आहे.
शिवानीचा पती अनुराग राजावत याला ताब्यात घेऊन त्याची चाैकशी करण्याची गरज आहे. गोव्यात महिलांचा छळ आणि त्यांच्या हत्या अशा प्रकाराला थारा नाही, हा संदेेश पोलिस कृतीतून सर्वांसमोर जाण्याची गरज आहे, ‘बायलांचाे एकवोट’ संघटनेच्या आवदा व्हिएगस यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.