Goa News: मुरगाव बंदर धक्का क्र. 8 ते इंधन साठवणुकीच्या टाक्यांपर्यंतच्या भूमिगत वाहिन्यांतून, त्या वाहिन्यांच्या सक्षमतेविषयी चाचणी घेतली जाईपर्यंत इंधन उतरवून घेणे बंद ठेवावे असा आदेश गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने जारी केला असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. महेश पाटील यांनी दिली.
झेआयएव्हीपीएल कंपनीच्या मालकीच्या या टाक्या व वाहिन्या आहेत. इंधन मिसळल्याचा संशय असलेल्या विहिरींतील पाण्यावर प्रक्रिया करून त्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावावी असेही मंडळाने आदेशात नमूद केले आहे.
ॲना ज्योकिना फर्नांडिस यांनी आपल्या विहिरीतील पाण्याला इंधनाचा वास येत असल्याची तक्रार सर्व प्रथम केली होती. दाबोळी-चिखली पंचायत क्षेत्रातील माटवे चॅपेल भाट परिसरातील सर्व विहिरींमध्ये पेट्रोल-डिझेल इंधनमिश्रीत वास दुसऱ्या दिवशीही येत होता.
आज माटवे येथील सदानंद नाईक यांची कुपनलिका, कोप्ला भाट येथील कार्मेलिना कुलासो यांची विहीर आणि गावडेभाट येथील प्रकाश नाईक यांच्या विहिरीतील पाण्याचे नमुने घेण्यात आले. प्रकाश यांच्या विहिरीतील पाण्याला इंधनाचा वास येत होता तर इतर दोन विहिरींमध्ये इंधनाचे अंश आढळले नव्हते.
मंडळाच्या जेनिका सिक्वेरा, डॉ. मोहन गिरप, संजय काणकोणकर, विजय कानसेकर, लुझिया डिसिल्वा आणि सोनिया फर्नांडिस यांच्या पथकाने ही पाहणी केली. मुरगाव बंदरातून 14 किलोमीटर लांबीची इंधनवाहिनी जमिनीत दीड मीटर खोलीवर घालण्यात आली आहे. या वाहिनीची तपासणी 2019 मध्ये करण्यात आली होती.
22नोव्हेंबर रोजी या वाहिनींतून टाक्यांमध्ये इंधन भरण्यात आले होते. त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. सांकवाळ येथील जुआरी इंडियन ऑइल कंपनीतील इंधन वाहिनीला, आल्तो दाबोळी - साकवाळ महामार्गाच्या बाजूला असलेल्या भूमिगत इंधन वाहिनीतील पेट्रोल डिझलला गळती लागल्याने आल्तो दाबोळी खालील चिखली चॅपेल भाट परिसरातील विहिरीत इंधन जमिनी खालून पाझरत असल्याचा संशय विविध सरकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.