सासष्टी: राजस्थानहून (Rajasthan) गोव्याला (Goa) मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी करणारा एजंट हरकेश धनिराम बैरवा (38, राजस्थान) याला कोकण रेल्वे पोलिसांनी (Konkan Railway Police) अटक करून मडगाव कोकण रेल्वे स्थानकावरील पार्सल रूममधून 23 लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. ही कारवाई कोकण रेल्वेचे पोलीस अधीक्षक सॅमी तावारीस (Sammy Tavaris) यांच्या मार्गदर्शनाखाली मडगाव कोकण रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हिरू कवळेकर (Hiru Kavalekar) व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.
कोकण रेल्वे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मडगाव (Madgaon) कोकण रेल्वे स्थानकावरील पार्सल रुममध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा साठा देण्यात येणार असल्याची गुप्त माहिती कोकण रेल्वे पोलीस स्टेशनला मिळाली होती. त्यानुसार कोकण रेल्वे पोलीस या पार्सल रूमवर पाळत ठेऊन बसले होते. काल राजधानी एक्सप्रेसमधून लोकांबरोबर मोठ्या प्रमाणात पार्सलही आले होते. ही पार्सल स्थानकावरील पार्सल रुममध्ये ठेवण्यात आल्यावर पोलिसांनी तपास करून हा लाखोंचा गुटखा जप्त केला. पोलिसांनी गुटख्यानी भरलेल्या 56 बॅगा जप्त केल्या असून या गुटख्याची किंमत 23 लाख रुपये आहे.
पोलिसांना गुटख्यानी भरलेली बॅग जप्त केल्यावर हा गुटखा नेण्यासाठी कोण येणार, यासाठी पोलिसांनी सापळा रचला होता. सदर संशयित ही बॅग नेण्यासाठी स्थानकावर आल्यावर पोलिसांनी हरकेश बैरवा या एजंटला ताब्यात घेतले. संशयित मूळचा राजस्थानमधील असून तो वास्को येथे राहत आहे. हा एजंट राजस्थानहुन मोठ्या प्रमाणात गोव्यात गुटख्याची तस्करी करून गोव्यातील विविध भागात हा गुटखा पुरविण्याचे काम करीत आहे. पोलिसांची रात्री उशीरापर्यंत माल मोजण्याची व अन्य कारवाई सुरु होती. पोलिसांनी या संशयिताविरुद्ध गोवा नागरी आरोग्य कायद्याखाली गुन्हा नोंद केला आहे. ही तस्करी करण्यामागे अन्य काहींचा हात असू शकतो असा संशय व्यक्त करून पोलीस त्यांचाही शोध घेण्याचे काम करत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.