Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; सुदिनराव-गोविंद गावडे एकत्र येणार?

Khari Kujbuj Political Satire: कुंकळ्ळीचे गट काँग्रेस अध्यक्ष आसिस नोरोन्हा यांनी आपल्या समाजमाध्यमावर टाकलेल्या एका व्हिडिओने सध्या काँग्रेस-भाजप गटात एका नव्या चर्चेने जोर धरला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

सुदिनराव-गोविंद गावडे एकत्र येणार?

सुदिन ढवळीकर आणि गोविंद गावडे यांच्यात सध्या जिल्हा पंचायत निवडणुकीवरून वाद पेटला आहे. आपला उमेदवार पराभूत होण्यास सुदिन आणि दीपक कारणीभूत आहेत हे गोविंदरावांनी आधीच जाहीर केले आहे तर आपण गोविंदसोबत काम करणार नाही असे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना यापूर्वीच कळवले होते असे सुदिनरावांचे म्हणणे आहे. सगळे खरे आहे पण भाजपची एक जागा कमी झाली त्याचे काय असे भाजप कार्यकर्ते विचारत आहेत. शेवटी सुदिन - गोविंद एकत्र आले तरच पक्षाला फायदेशीर आहे, पण तसा योग काही दिसत नाही. ∙∙∙

युरी-विश्वजीत युती?

कुंकळ्ळीचे गट काँग्रेस अध्यक्ष आसिस नोरोन्हा यांनी आपल्या समाजमाध्यमावर टाकलेल्या एका व्हिडिओने सध्या काँग्रेस-भाजप गटात एका नव्या चर्चेने जोर धरला आहे. सदर व्हिडिओ सत्तरीचे सर्वेसर्वा म्हणून विश्वजीत राणेंचे तोंडभरून कौतुक करण्यात आले आहे. सासष्टीत जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार म्हणून विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचे गुणगान त्या व्हिडिओत आहे. त्याही पुढे गिरदोली मतदारसंघात तब्बल पंधरा वर्षांनंतर कॉंग्रेसचा उमेदवार जिंकला, असा दावा केल्याने यापूर्वी ज्योकीम आलेमांव यांच्या कारकिर्दीत कोण जिंकला होता? असा प्रश्नही नेटकरी विचारत आहेत. आता युरी-विश्वजीतचा हा व्हिडिओ कुणी तयार केला, हे काँग्रेस-भाजपवाले म्हणे शोधत आहेत. ∙∙∙

चर्चिलचे गणित!

चर्चिल आलेमाव हे एक अजब रसायन आहे. मुरब्बी राजकारणी अशी त्यांची ओळख. जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीच्या भानगडीत ते पडले नाही. या निवडणुकीचा आपण यापूर्वी कटू अनुभव घेतला होता, असे ते सांगतात. यापूर्वी त्यांनी झेडपी निवडणुकीत उमेदवार ठेवले होते. ते पराभूत झालेच, मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्याचा फटका आपल्यालाही बसला असे ते म्हणतात. त्यामुळेच या खेपेला आपण ‘झेडपी’साठी कुणालाही पाठिंबा दिला नाही. त्याचा लाभ आता मला विधानसभा निवडणुकीत होणार असे ते उघडपणे सांगू लागले आहे. बाणावली मतदारसंघातून पुढची निवडणूक लढविणार असे त्यांनी यापूर्वीच घोषित केले आहे. मात्र कुठल्या पक्षातर्फे हे मात्र ते उघड करीत नाहीत. चर्चिलच्या भाषेत सांगायचे म्हणजे मला पक्ष लागत नाही, मी लोकांचा माणूस आहे. बघूया पुढे काय घडते ते! ∙∙∙

दिगंबरांच्या दिल्लीवारीची चर्चा!

डिसेंबर महिन्यात लागोपाठ दोनदा साबांखामंत्री असलेले दिगंबर कामत दिल्लीला गेले. एकदा तर त्यांनी आपल्या सगळ्या परिवाराला दिल्लीला नेले. त्यांची पंतप्रधानांशी भेट घडवून आणली. त्यांच्या या भेटीमुळे गोव्यात नाना प्रकारची चर्चा सुरू झाली. एरवी अशा भेटीची दखल घेतली जात नाही, पण गोव्यात जिल्हा पंचायत निवडणुकीची धामधूम सुरू असताना त्यांच्या या भेटी घडून आल्या. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. दिगंबर कामत यांचा दक्षिण गोव्यातील राजकारणात भाजपाला फायदा होईल, अशी पक्षधुरिणांची अपेक्षा होती. पण जिल्हा पंचायत निवडणुकीत तसे काहीच दिसून आले नाही. उलट त्याच दिवसांत ते दिल्लीला गेले. मडगावला जवळच्या दवर्ली व गिर्दोळी या झेडपी मतदारसंघातही कामत यांचा काहीच उपयोग झाला नाही, उलट हाती असलेले ते मतदारसंघ भाजपाला गमवावे लागले खरे. मग अशा नेत्याचा नेमका कोणता लाभ झाला? अशी विचारणा मडगावांतील मूळभाजपावाले आता करत आहेत. ∙∙∙

विजयचा बाँब गोळा!

जिल्हा पंचायत निवडणुका संपल्या. आता सर्वांनाच नगरपालिका, विधानसभेचे वेध लागले आहेत. मडगावात नगरपालिकेची निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता आहे, कारण आमदार विजय सरदेसाई यांनी आपण फातोर्डासह मडगावतील प्रभागांमध्ये सुद्धा लक्ष घालणार असे जाहीर केल्याने अनेकांना कंप सुटला आहे. विजयबाबने केवळ जाहीर केले आहे. आपले डावपेच त्यांनी अजून उघड केले नसले तरी नव्या वर्षी लगेच आपण कुठल्याही इतर पक्षांशी युतीची वाट न पाहता कामाला लागणार आहेत, अशी चर्चा आहे. जिल्हा पंचायतीप्रमाणे मडगाव नगरपालिका निवडणुकीत कॉंग्रेस व गोवा फॉरवर्ड युती व्हावी, अशी तमाम मडगावकरांची मागणी आहे. तसे झाल्यास निवडणुकीतील चुरस वाढणार आहे. काही नेते डावपेच आखू लागले आहेत. पण विजयने टाकलेला बॉंब गोळा सत्ताधाऱ्यांना लागला असून तेही सक्रीय झाले आहेत. ∙∙∙

पात्रांव असते तर..

फोंडा मतदारसंघातील कुर्टी झेडपीमध्ये भाजपचा विजय झाला खरा, पण काठावरचा. भाजपने सगळी शक्ति एकवटून सुद्धा ते केतन भाटीकरांच्या अपक्ष उमेदवारावर मोठी आघाडी घेऊ शकले नाहीत, याची खंत अनेक भाजप कार्यकर्त्यांना वाटत आहे. तर अनेकांना रवी पात्रांव असते, तर ही आघाडी दोन हजाराच्या पलीकडे गेली असती, असे वाटत आहे. रवींचे फोंड्यावर एक हाती वर्चस्व असायचे. या मतदारसंघातील कानाकोपरा त्यांना पाठ असल्यामुळे कोणाला कसे फिरवायचे याचे त्यांना चांगले ज्ञान असायचे. याचेच पडसाद लोकांच्या बोलण्यातून उमटताना दिसत आहे. पण शेवटी ‘जाने वाले कभी नही आते, जाने वालों की याद आती है।’ हेच खरे, नाही का? ∙∙∙

अखेर खरा चेहरा पुढे!

चिंबल ग्रामस्थांकडून सध्या युनिटी मॉलला विरोधात उपोषण सुरू झाले आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीपूर्वी चिंबल ग्रामस्थांनी या ठिकाणी आंदोलन केले तेव्हा येथील ग्रामपंचायत मंडळाने आम्ही लोकांबरोबर आहोत, असा दिखावा केला. त्याशिवाय या मॉलला परवानगी देणार नसल्याचेही सांगितले, पण अखेर ती परवानगी मिळाल्यानेच काम सुरू झाल्याचा पर्यटन विकास महामंडळाचा दावा आहे. त्यामुळे पंचायत मंडळाने येथील ग्रामस्थांनाच एक प्रकारे फसविल्याचे दिसते. ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेमुळे पंचायत मंडळाचे सदस्य आणि सचिवही पंचायतीकडे फिरकत नसल्याची चर्चा सुरू आहे. ज्या ठिकाणी मॉल होणार आहे, तो भाग डोंगरउताराचा आहे. बांधकाम झाल्यास या परिसरातील जैवविविधतेला फटका बसेल, त्याचबरोबर शेतीवरही परिणाम होईल, असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सरकार हा प्रकल्प दुसरीकडे नेण्याच्या मनःस्थितीत नसल्यानेच ग्रामस्थांना उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे. या प्रकारामुळे पंचायत मंडळाच्या सदस्यांविरोधात सध्या ग्रामस्थांमध्ये असंतोष खदखदू लागला आहे. यावरून अनेकांचा खरा चेहरा पुढे आला आहे, असे दिसते. ∙∙∙

केतन नको, रितेशच का?

जिल्‍हा पंचायत निवडणुकीनंतर गोमंतकीय जनतेचे लक्ष लागून आहे, ते विधानसभा मतदारसंघ असलेल्‍या फोंड्यातील पोटनिवडणुकीकडे. माजी मंत्री रवी नाईक यांच्‍या मृत्‍यूमुळे या मतदारसंघात लवकरच पोटनिवडणूक घ्‍यावी लागणार आहे. पोटनिवडणुकीच्‍या माध्‍यमातून फोंड्यातून आपले राजकीय नशीब अजमावण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे नेते उत्सुक आहेत. परंतु, रवींच्‍या निधनापासून चर्चा सुरू आहे, ती त्‍यांचे ज्‍येष्‍ठ सुपुत्र रितेश नाईक यांच्‍या नावाची. फोंड्यातील पोटनिवडणुकीत भाजपची उमेदवारी कुणाला मिळणार, याचे कोणतेही संकेत प्रदेश भाजपने अद्याप दिलेले नाहीत. परंतु, मगोचे अध्‍यक्ष दीपक ढवळीकर यांनी मात्र भाजपने रितेश यांनाच उमेदवारी द्यावी आणि त्‍यांना निवडून आणावे, ही मागणी लावून धरली आहे. दीपक यांच्‍या या मागणीला सुरुवातीपासून विरोध करणाऱ्या आणि मगोचे कट्टर समर्थक असलेल्‍या केतन भाटीकर यांनी जिल्‍हा पंचायतीचे निमित्त साधून मगोची साथ सोडली. तरीही दीपक अजूनही आपल्‍या मागणीवर ठाम आहेत. त्‍यामुळे दीपक यांना केतन नको, पण रितेशच का हवे आहेत? या प्रश्‍‍नाचे उत्तर फोंड्यातील मतदार शोधत आहेत. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"माणसं पिंजऱ्यात आणि प्राणी मोकळे"! गोवा अ‍ॅनिमल लिबरेशन मूव्हमेंटचा ‘रिव्हर्स रोल-प्ले’; मांसाहाराविरुद्ध प्राणी मुक्ती मोर्चा

Dhalanche Mand: डिचोलीत फुलू लागलेत धालांचे मांड! लोकसंस्कृतीचे दर्शन; 'रंभा अवसर' प्रथेचे आकर्षण

पोर्तुगीजांनी गोव्‍यात व्‍यसनं आणली, गोवेकरांनी आध्‍यात्‍मिक वारसा जपला; आता देवपूजेबरोबर जास्‍त मानवसेवा करण्‍याची गरज..

Goa Live News: उत्तर गोवा जिल्हा पंचायत: भाजपची नामांकने जाहीर

एकाच महिन्यात 200 अपघात आणि 18 बळी, नितीन गडकरींचे CM सावंतांना पत्र; वैयक्तिक लक्ष देण्याची मागणी!

SCROLL FOR NEXT