Goa Politics: 'मनोज परब असे कोण आहेत, ज्यांनी कॉंग्रेसला उपदेश करावा'? चोपडेकर यांचा हल्लाबोल; जनतेची दिशाभूल केल्याचे आरोप

Nitin Chopdekar: चोपडेकर यांनी या पत्रकात म्हटले आहे, की मनोज परब असे कोण आहेत, ज्यांनी कॉंग्रेसला उपदेश करावा? कॉंग्रेस हा भारताचा सर्वांत जुना, मोठा पक्ष आहे.
Nitin Chopdekar
Nitin ChopdekarDainik Gomatnak
Published on
Updated on

पणजी: देशाचा स्वातंत्र्यलढा, स्वतंत्र भारतातील लोकशाही आणि सामाजिक न्याय यासाठी वाहून घेतलेल्या कॉंग्रेसने (आयएनसी) पार केलेला १४० वर्षांचा टप्पा समस्त देशासाठी अभिमानाची बाब आहे. या जडणघडणीत वाटा असलेल्या गोवा प्रदेश कॉंग्रेसबाबत अत्यंत हास्यास्पद वक्तव्य करण्याचे दु:साहस पुन्हा एकदा मनोज परब यांनी केले आहे. जनतेची दिशाभूल करण्याचा त्यांचा हा दुसरा प्रयत्न आहे, असा घणाघाती आरोप गोवा प्रदेश कॉंग्रेसच्या ओबीसी सेलचे अध्यक्ष नितीन चोपडेकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.

चोपडेकर यांनी या पत्रकात म्हटले आहे, की मनोज परब असे कोण आहेत, ज्यांनी कॉंग्रेसला उपदेश करावा? कॉंग्रेस हा भारताचा सर्वांत जुना, मोठा पक्ष आहे. केवळ राजकीय पक्षच नव्हे, तर कॉंग्रेस ही या देशाचे आणि गोव्याचे भविष्य घडवणारी एक चळवळ आहे.

कॉंग्रेस पक्षाने वसाहतवादाविरुद्ध लढा दिला, लोकशाहीचे रक्षण केले आणि १४० वर्षांहून अधिक काळ ओबीसी, अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) आणि अल्पसंख्याक अशा वंचित घटकांच्या पाठीशी पक्ष ठामपणे उभा राहिला आहे.

चोपडेकर म्हणाले, की गोव्यात भाजपची ‘बी-टीम’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पक्षाचा सदस्य असणाऱ्या व्यक्तीस कॉंग्रेस पक्षावर बोलण्याचा कोणताही नैतिक किंवा राजकीय अधिकार नाही. रिव्हॉल्युशनरी गोवन्स हा पक्ष भाजपचा एजंट म्हणून काम करतो, हे उघड गुपित आहे. धर्मनिरपेक्ष, बहुजन आणि विरोधी मतांचे विभाजन करणे आणि भाजपच्या विजयाचा मार्ग मोकळा करणे यासाठी या पक्षाची निर्मिती करण्यात आली, ही राजकीय वस्तुस्थिती आहे.

चोपडेकर म्हणाले, की मनोज परब आणि त्यांच्या पक्षाकडे कोणतीही विचारधारा नाही. कोणताही संघर्ष नाही आणि गोव्याच्या जनतेप्रति कोणतीही बांधिलकीही नाही.

भाजपसाठी मतांचे विभाजन करणे आणि त्या माध्यमातून भाजपला मदत करणे, एवढेच त्यांचे काम आहे. ते क्रांतीचा मुखवटा घालून मिरवत असले, तरी गोव्याच्या जनतेने त्यांचा खरा चेहरा ओळखला आहे.

गोव्यातील जनतेला हेही चांगलेच माहीत आहे, की मनोज परब यांचे मुंबईत वारंवार होणारे दौरे हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच भाजप नेतृत्वाखालील आघाडीतील वरिष्ठ नेते यांची भेट घेण्यासाठी असतात. मनोज परब यांनी नाकारण्याचा कितीही प्रयत्न केले तरीही, मागच्या दाराने सुरू असलेला राजकीय समन्वय आणि संगनमत या भेटी स्पष्टपणे उघड करतात.

कॉंग्रेसचे नेतृत्व गोव्यातच रुजलेले आहे व गोव्याच्या जनतेस उत्तरे द्यायला बांधील आहे; पण मनोज परब भाजपकडून आदेश घेताना दिसतात, असा टोलाही चोपडेकर यांनी हाणला आहे. चोपडेकरांनी सांगितले, की कॉंग्रेस पक्षाला भाजपच्या हस्तकांकडून कोणत्याही शिकवणीची गरज नाही.

भाजपचा भ्रष्टाचार, हुकूमशाही, गोव्याशी केलेली गद्दारी, उपजीविकेचा नाश आणि ओबीसी व बहुजन समाजाची केलेली पद्धतशीर उपेक्षा याविरुद्ध लढणारी एकमेव विश्वासार्ह शक्ती म्हणजे कॉंग्रेसच आहे! मी मनोज परब यांना कडक इशारा देतो, की त्यांनी कॉंग्रेस पक्षावर बोलण्याची हिंमत करण्यापूर्वी ते नेमके कोणाच्या अजेंड्यावर काम करत आहेत, याचे उत्तर गोव्याच्या जनतेला द्यावे.

राजकीय सोयीसाठी जनतेचा कौल विकणाऱ्यांना गोवा माफही करणार नाही आणि कधी विसरणारही नाही, असे चोपडेकर यांनी पत्रकात नमूद केले आहे. गोव्यातील भाजप आणि त्यांच्या हस्तकांना कॉंग्रेस पक्ष निर्भयपणे, सातत्याने आणि सत्याच्या आधारावर उघडे पाडत राहील, असेही चोपडेकर यांनी ठणकावले आहे.

‘आरजी’चे विश्‍वेश नाईक खोटारडे

कवळे जिल्हा पंचायत मतदारसंघातील रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाचे उमेदवार विश्‍वेश नाईक हे खोटारडे असून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. ज्याला एक हजार मते पडण्याची लायकी नाही, त्याने मगोपचे नेते सुदिन ढवळीकर यांच्याविरोधात एक शब्दही बोलू नये. आम्ही संयम पाळून आहोत. त्यामुळे सांभाळून बोला, असा इशारा मगोपचे नेते तथा कवळेचे नवनियुक्त जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक आणि बांदोड्याचे सरपंच रामचंद्र नाईक यांनी दिला आहे.

Nitin Chopdekar
Goa Politics: त्यांची अवस्था 'ना घर का ना घाट का'! मंत्री ढवळीकरांची RGP वर टीका, Watch Video

बांदोड्यात गणपत नाईक, रामचंद्र नाईक आणि पंचसदस्य वामन नाईक यांनी पत्रकार परिषदेत ‘आरजी’वर तोफ डागली. ‘आरजी’कडून मगोपचे नेते सुदिन ढवळीकर यांच्यावर बेताल वक्तव्य झाल्यामुळे त्याला प्रत्युत्तर देण्यात आले.

गणपत नाईक म्हणाले की, कवळे जिल्हा पंचायत मतदारसंघात ‘मगोप’ आणि ‘आरजी’ या दोनच पक्षांचे उमेदवार निवडणूक रिंगणात होते. तिसरा पर्याय नसल्याने जे लोक ‘मगोप’च्या विरोधात आहेत, त्यांनी ‘आरजी’ला मते दिली. याचा अर्थ, ही सर्व मते ‘आरजी’ची आहेत, अशा भ्रमात विश्‍वेश यांनी राहू नये.

Nitin Chopdekar
Goa Politics: मैत्रीत 'दगा' की राजकारणाची 'मजा'? भाजपच्या बालेकिल्ल्यात मगोचा शिरकाव; युतीचे समीकरण धोक्यात!

मडकई मतदारसंघात मगोपच्या विरोधात सुमारे सात हजार मते आहेत. त्यापैकीच ही मते असून ती केवळ ‘आरजी’ला नव्हे, तर तिसरा पर्याय नसल्यानेच मिळाली असल्याचे नाईक यांनी सांगितले.

सरपंच रामचंद्र नाईक म्हणाले, की शापूर भागातील लोकांना ‘घाटी’ म्हणून संबोधताना विश्‍वेश नाईक यांनी बेताल वक्तव्ये केली आहेत. ही वस्ती सुदिन ढवळीकर यांनी वसविली असल्याचेही विश्‍वेश म्हणत आहेत; पण हे चुकीचे असून सुदिन हे जेव्हा आमदारही नव्हते, त्यावेळी लष्करी तळ उभारताना या ठिकाणी जे बिगर गोमंतकीय कामगार आले होते, ते येथे वस्ती करून राहिले. त्यामुळे त्यांना सरकारच्या सुविधा उपलब्ध झाल्या. अपुऱ्या माहितीवर विश्‍वेश यांनी सुदिन यांच्याविरोधात कोणतेही वक्तव्य करू नये. आम्ही संयम पाळून आहोत. त्यामुळे सांभाळून बोला, असे रामचंद्र नाईक म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com