मडगाव: दक्षिण गोवा पोलिसांनी अमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध धडक मोहीम राबवत अवघ्या ११ दिवसांत एनडीपीएस कायद्यांतर्गत एकूण ६ गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत ९ संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून २.६० लाख किमतीचा विविध प्रकारचा अमली पदार्थ साठा जप्त करण्यात आला आहे.
दक्षिण गोवा जिल्ह्यातील विविध पोलिस स्थानकांच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेल्या मालामध्ये गांजा, हायड्रोपोनिक गांजा, चरस, हशीश ऑईल आणि एमडीएमए या अमली पदार्थांचा समावेश आहे. मायणा-कुडतरी पोलिसांनी जयेश अनंत पागी (रा. दे पाळोळे, काणकोण) याला अटक करून सुमारे १ लाख रुपये किमतीचा १९९ ग्रॅम संशयित चरस आणि ८ लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी फ्रॉन्क्स कार जप्त करण्यात आली आहे.
कोलवा पोलिसांनी केलेल्या कारवाईत लोव्हस्टन लुकास दोरादो (रा. कोलवा) आणि सुफियान ब्यागडी (रा. कुडतरी) या दोघांना अटक करीत ८१ हजार रुपये किमतीचा ६ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा आणि ६६ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. याच पोलिसांनी केलेल्या दुसऱ्या कारवाईत फुर्तादो (रा. नावेली) याला अटक करून साडेबारा हजार रुपये किमतीचा ५ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. फातोर्डा पोलिसांनी केलेल्या कारवाईत जिब्रान सय्यद (रा. फातोर्डा) आणि ब्रुनो परेरा (रा. पणजी) यांना अटक करून १० हजार रुपये किमतीचा ८ ग्रॅम गांजा आणि ०.९८ ग्रॅम एमडीएमए, तसेच दोन मोबाईल फोन आणि एक टीव्हीएस एनटॉर्क स्कूटर जप्त करण्यात आली आहे.
यापुढेही कारवाई सुरूच राहणार
केपे पोलिसांनी केलेल्या कारवाईत रेनबर्ट डायस (रा. आमोणा, केपे) आणि आदेश संभाजी पाटील (रा. शेळवण) या दोघांना अटक करून ३५ हजार रुपये किमतीचा ३५४ ग्रॅम गांजा, ११,५०० रुपये रोख रक्कम, दोन मोबाईल फोन आणि एक ज्युपिटर स्कूटर जप्त करण्यात आली आहे.
मुरगाव पोलिसांनी मोहम्मद रफिक मोहम्मद हनिफ किल्लेदार (रा. बायणा) याला अटक करून १०,९०० रुपये किमतीचे ४ ग्रॅम संशयित हशीश ऑईल आणि २९ ग्रॅम संशयित गांजा जप्त करण्यात आला. सध्या या सर्व सहा गुन्ह्यांचा पुढील तपास सुरू आहे.
अमली पदार्थांची तस्करी आणि सेवन रोखण्यासाठी दक्षिण गोवा जिल्हा पोलिस कटिबद्ध असून, या बेकायदेशीर व्यवसायात गुंतलेल्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहील, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
तसेच, गोवा ड्रग्जमुक्त करण्यासाठी नागरिकांनी अमली पदार्थांशी संबंधित कोणतीही माहिती असल्यास ती पोलिसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही दक्षिण गोवा जिल्हा पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.