

Vaibhav Sooryavanshi Credits Yuvraj Singh Double Century: आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत भारताच्या 'अ' संघाकडून खेळताना विस्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशीने युएईविरुद्ध अवघ्या 52 चेंडूंत द्विशतक झळकावत क्रिकेटविश्वात खळबळ उडवून दिली. पहिल्याच षटकापासून आक्रमक पवित्रा घेत त्याने या ऐतिहासिक खेळीत तब्बल 28 षटकारांची आतिषबाजी केली आणि अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले. या वादळी खेळीनंतर दिलेल्या एका खास मुलाखतीत वैभवने आपल्या या यशाचे संपूर्ण श्रेय भारताचा माजी दिग्गज फलंदाज युवराज सिंग याला दिले.
स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यांत वैभवची बॅट शांत राहिली आणि त्याला केवळ 37 धावाच करता आल्या. देशांतर्गत क्रिकेटमध्येही धावा होत नसल्याने त्याचा आत्मविश्वास काहीसा डळमळीत झाला होता. मात्र, युएईविरुद्धच्या (UAE) सामन्यापूर्वी त्याने आपले वडील, बालपणीचे प्रशिक्षक मनीष ओझा, सहकारी खेळाडू आणि त्यानंतर युवराज सिंग याच्याशी संवाद साधला. युवराज सरांनी तब्बल अर्धा तास त्याच्याशी चर्चा करत फलंदाजीतील तांत्रिक बारकावे समजावून सांगितले. तू जर खेळपट्टीवर 20 चेंडू टिकून राहिलास, तर चित्र नक्कीच बदलेल, असा मोलाचा सल्ला युवराजने त्याला दिला होता.
युवराज सिंग हे माझे गुरु असून त्यांच्याशी बोलल्यानंतर मला माझ्या चुका समजल्या आणि खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला, असे वैभवने सांगितले. मैदानावर उतरल्यानंतर सुरुवातीचे दोन चेंडू खेळपट्टीचा अंदाज घेण्यासाठी खेळले, मात्र चेंडू बॅटवर व्यवस्थित येत असल्याचे लक्षात येताच आणि गोलंदाजांना फारशी मदत मिळत नसल्याचे पाहून मी मोठे फटके खेळण्याचा निर्णय घेतला, असे तो म्हणाला. टी-20 नंतर आता वनडे क्रिकेटमध्येही आपली छाप पाडणाऱ्या वैभवने परिस्थितीनुसार खेळ बदलण्याची क्षमता आपल्यात असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.