पणजी : सोलापूरकरांच्या अनेक वर्षांच्या प्रतिक्षेला अखेर पूर्णविराम मिळणार आहे. 'फ्लाय 91' या प्रवासी विमान वाहतूक करणाऱ्या कंपनीकडून येत्या 26 मे 2025 पासून सोलापूर ते गोवा दरम्यान प्रवासी विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. यासंदर्भातील माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
सोलापूर येथील होटगी रोडवरील विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यासाठी अनेक अडचणी आल्या. मुख्य अडथळा म्हणजे विमानतळाजवळील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची वीज निर्मिती चिमणी. ती चिमणी विमान उड्डाण मार्गात अडथळा निर्माण करत असल्यानं, डीजीसीए (DGCA) कडून उड्डाणास परवानगी मिळत नव्हती.
नऊ वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर अखेर दीड वर्षांपूर्वी ती चिमणी जमीनदोस्त करण्यात आली. त्यानंतर ऑक्टोबर 2023 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जवळपास 60 कोटी रुपये खर्चून विमानतळाचे नूतनीकरण करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळाचे उद्घाटन देखील करण्यात आले होते.
विमानतळाची उभारणी झाल्यानंतर 'फ्लाय 91' कंपनीने सोलापूर-गोवा विमानसेवा सुरू करण्याची तयारी दर्शवली. डिसेंबर 2024 मध्ये सेवा सुरू होईल, असे सुरुवातीला जाहीर करण्यात आले होते. मात्र, त्या काळात वातावरणात निर्माण झालेल्या धुक्यामुळे उड्डाणे करणे शक्य झाले नाही. त्यामुळे सेवा जानेवारी 2025 च्या अखेरीस सुरू करण्याचे ठरले.
मात्र, त्यानंतर पुन्हा 42 सीट्स असलेल्या छोट्या विमानांऐवजी 72 सीट्स असलेली विमानसेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली. त्या मागणीला मंजुरी मिळाल्यानंतर आणखी एक अडचण समोर आली, ती म्हणजे विमानतळावर इंधन पुरवठ्याची सुविधा नव्हती. मात्र प्रशासनाच्या पाठपुराव्यानंतर इंधनाच्या सुविधाही उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
सर्व तांत्रिक अडचणी सोडवल्यानंतर आता अखेर 26 मेपासून सोलापूर ते गोवा दरम्यान नियमित प्रवासी विमानसेवा सुरू होणार आहे. त्यामुळे सोलापूरकरांना गोव्यापर्यंतच्या प्रवासासाठी नव्या पर्यायाचा लाभ घेता येणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.