खरी कुजबुज Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: 'तो' राजकारणी कोण? म्हापशात चर्चा

Khari Kujbuj Political Satire: म्हापसातील एका युवकाच्या आत्महत्येनंतर परिसरात वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

दैनिक गोमन्तक डिजिटल

श्रेय नेमके कुणाला?

गोव्यातील एसटींना राजकीय आरक्षण मिळणे ही आता औपचारिकता असल्याचा दावा भाजप नेत्यांकडून केला जात आहे. भाजपमुळेच गोव्यातील एसटींना राजकीय आरक्षण मिळू शकले, असा दावा भाजपचे सगळेच नेते करू लागले असून विरोधक मात्र हा दावा खोडून काढत आहेत. टीव्हीवरील एका कार्यक्रमात काँग्रेस नेत्यांनी हा दावा खोडून काढला. गोव्यात २०१२ मध्ये भाजप पुन्हा सत्तेत आले आणि त्यानंतर भाजपचेच सरकार सत्तेत होते. भाजपमुळे एसटींना राजकीय आरक्षण मिळाले, हा जर भाजपचा दावा असेल, तर त्यासाठी १४ वर्षांचा विलंब का झाला, असा सवाल वाझ यांनी केला. ते म्हणतात, भाजपने एसटी बांधवांना फक्त झुलवत ठेवले होते. एसटी बांधव मागण्या घेऊन रस्त्यावर उतरले तेव्हाच या सरकारला जाग आली आणि ते सक्रिय झाले. एसटींना जर राजकीय आरक्षण मिळत असेल, तर त्याचे पूर्ण श्रेय आंदोलकांनाच जाते, असा दावाही त्यांनी केला. खोलवर विचार केला तर जोसेफ यांच्या दाव्यात तथ्य आहे, असे वाटत नाही का? ∙∙∙

‘तो’ राजकारणी कोण? म्हापशात चर्चा

म्हापसातील एका युवकाच्या आत्महत्येनंतर परिसरात वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत. काही जण म्हणतात, पोलिसांच्या चौकशीच्या दबावामुळे हे टोकाचे पाऊल उचलले गेले, तर काहींच्या मते या प्रकरणाच्या पडद्यामागे एखादा ‘बडा’ राजकारणी असल्याची कुजबूज सुरू आहे. विशेष म्हणजे, जसे-जसे प्रकरण पुढे सरकत आहे, तसे-तसे आरोपांचे बाण पोलिसांपासून थेट राजकीय वर्तुळाकडे वळताना दिसत आहेत. आता गंमत अशी की, चर्चेत राजकारणी आहे, असे सगळेच म्हणतात; पण तो नेमका कोण, हे मात्र कुणीच स्पष्टपणे सांगत नाही. सर्वत्र ‘तो’ राजकारणी चर्चेत आहे; पण नाव घेताना मात्र सगळ्यांची जीभ अडखळते. काही जण तर म्हणतात, ‘नाव घेतलं तर उद्या फोन येईल!’ दरम्यान, संबंधित राजकारणी कोण आहे यापेक्षा तो खरोखर आहे का, की केवळ चर्चेचा विषय केला जात आहे, याचा शोध आता लोक घेत आहेत. ∙

विनय तेंडुलकर ‘सुसाट’?

माजी खासदार विनय तेंडुलकर यांच्या उपस्थितीत नुकतीच फातोर्डा मतदारसंघाची भाजप महिला मोर्चा समिती जाहीर करण्यात आली. त्यावेळी बोलताना तेंडुलकर यांनी आगामी निवडणुकीत फातोर्डा मतदारसंघावर भाजपचा झेंडा फडकवणारच, असा निर्धार व्यक्त केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी आपण निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केल्यामुळे त्यांच्या जागी विनयरावांची वर्णी लागणार तर नाही ना... अशी चर्चा सुरू होती. नाही म्हटले तरी विनयरावांनी आपण कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे जाहीर केले आहेच. मग व्हाय नॉट फातोर्डा? पण सध्या विनयरावांचा रथ सुसाट सुटल्यासारखा दिसत आहे, एवढे मात्र खरे. सावर्डे, फोंडा आणि आता फातोर्डा, असा सगळीकडे त्यांचा संचार दिसतोय. आता याला ‘मान गये उस्ताद’ म्हणायचे नाही तर आणखी काय म्हणायचे? ∙∙∙

कौतुक सक्रिय

फोंड्यातील लोकांसाठी काळवेळ न पाहता धाऊन जाणारे डॉ. केतन भाटीकर यांच्या अकाली ‘एक्झिट’ मुळे आता पुढे काय असा प्रश्न केतनच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना पडला होता, पण केतनचे भाऊ डॉ. कौतुक भाटीकर यांनी समाजकार्यात रस दाखवल्यामुळे या कार्यकर्त्यांचा जीव सध्या तरी भांड्यात पडला आहे. आमच्या मागे कुणी तरी आहे ही भावनाच मुळी सुखावणारी असते आणि तीच बाब आता केतनच्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत घडत आहे. राजकारणासंबंधी कौतुक भाटीकर यांना विचारले असता ‘जरा थांबा नंतर सांगतो, असे उत्तर त्यांनी दिले म्हणजे नक्कीच धूर आहे तेथे आग ही असणारच. बरोबर ना...! ∙∙∙

रितेशचा जनसंपर्क

फोंड्यात रवी पुत्र रितेश नाईक सध्या फॉर्मात आहेत. रितेशने फोंड्यात कार्यक्रम आणि उपक्रमांचा सपाटा लावला आहे. गेल्या पोटनिवडणुकीत जिंकून येण्यासारखी प्रचाराची कामगिरी केलेल्या रितेश नाईक यांना ऐनवेळी निवडणूकच रद्द झाल्यामुळे नामी संधी हुकली. पण, रितेशने धीर सोडलेला नाही. ते कार्यक्रमांमध्ये व्यस्त आहेत. लोकांचा त्यांचा जनसंपर्क वाढलेला आहे. सध्या तर खडपाबांध येथील रवी नाईक अर्थातच रितेश यांच्या कार्यालयात समस्या घेऊन येणाऱ्या फोंडेकरांची संख्या पाहिली तर विचार करण्यासारखी आहे. त्यामुळे रितेश पूर्ण तयारीत आहेत असेच दिसून येत आहे. पाहुया येत्या निवडणुकीत काय होते ते...! ∙∙∙

लालफितीचा असाही कारभार....

सरकारीबांबूच्या लालफितीच्या कारभाराचा अनुभव नेहमीच ‘कॉमनमॅन’ घेत असतो. आता हा कटू अनुभव खुद्द सरकारी अधिकाऱ्यांनाही येऊ लागला आहे. त्याचे झाले असे की, सासष्टीतील एका गावातील जमिनीत मातीचा भराव टाकून जमीन पुरविण्याचे व तेथे कुंपण घालण्याचे काम बिनदिक्कत सुरू होते. मूळ जमीन मालकाला त्याचा थांगपत्ताही नव्हता. ज्यावेळी त्यांना ही गोष्ट समजली तेव्हा तातडीने त्यांनी तक्रार नोंदवली. ‘फ्लाइंग स्कॉड’ आले व पाहणी केली आणि नंतर उपजिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल दिला. ज्यांनी कायदा धाब्यावर बसवून हे काम केले होते, त्यांच्यावर पोलिस तक्रार होणे गरजेचे होते. ज्या ठिकाणी हा गैरप्रकार घडला तो भाग म्हणे याच तालुक्यातील कुंकळ्ळी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतो. मात्र, उपजिल्हाधिकारी कार्यालयातून हे प्रकरण मायणा-कुडतरी पोलिस ठाण्यात पाठवण्यात आले. त्या जमिनीचा मूळ मालक ‘पीआय’ पदावर आहेत. जेव्हा त्यांना ही माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी खडसावले. तेव्हा कुठे हे प्रकरण कुंकळ्ळी पोलिस ठाण्यात पाठवून देण्याचे शासकीय सोपस्कार सुरू झाले. ∙∙∙

‘रेनकोट डिप्लोमसी’ ची चर्चा

आगामी विधानसभा निवडणुकांना अजून अवकाश असला, तरी म्हापसा मतदारसंघात मात्र आत्तापासूनच राजकीय हवा तापू लागली आहे. अनेक इच्छुकांनी पक्षाच्या तिकिटावर दावे ठोकण्यास सुरुवात केली असतानाच, सामाजिक कार्यकर्ते मयूर सावकार यांनी घेतलेली आक्रमक आघाडी म्हापशात चर्चेचा विषय ठरत आहे. नुकतेच त्यांनी स्थानिक पायलट बांधवांना केलेले रेनकोटचे वितरण वरकरणी समाजकार्य वाटत असले, तरी या ‘रेनकोट डिप्लोमसी’मुळे मतदारसंघातील राजकीय वातावरण तापले आहे. सावकार यांनी सध्या लोकसंपर्क कमालीचा वाढवला असून, ‘भाजपची उमेदवारी आपल्यालाच मिळणार!’ असा ठाम दावा केला आहे. विशेष म्हणजे, विद्यमान आमदारांचे काही जुने आणि निष्ठावान कार्यकर्तेही सध्याच्या या बदलत्या समीकरणांमुळे अंतर्गत गोटात कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. एकूणच, म्हापशाच्या राजकीय आखाड्यात रंगू लागलेला हा सावकार विरुद्ध विद्यमान आमदार असा सामना आगामी काळात किती अटीतटीचा होतो, हे दिसून येईलच. ∙∙∙

कुजबुज इफेक्टमुळे सुधारणा

चतुर्थीच्या हंगामासाठी सध्या कोंकणी नाटकांच्या संहितांचे काम जोरात चालू आहे. मूळ संहिता वा चित्रपटाचे किंवा कादंबरीचे लेखक यांचे नाव स्पष्टपणे न देता स्वतःचेच नाव देण्याचा सपाटा चालू होता. पण कुजबुज इफेक्टमुळे ही कुप्रथा हळूहळू बंद पडू लागली आहे. कारण कॉपी केलीच तर त्याचा लागलीच पर्दाफाश, भंडाफोड होण्याचा धाक आहे. कलाकारांनी समाजात रंगमंचीय आविष्कारातून चुकीचे संकेत देऊ नयेत. विषय असंख्य आहेत. धमक असल्यास आपण मौलिक रचना करावी. ती उथळ असो वा त्यात चुका असोत, हरकत नसावी. विनोद, दर्जा, फार्स, मेलोड्रामॅटिक रूपबंध हा मसाला सोडून द्या. पण दुसऱ्या लेखकांच्या कल्पनांचे, विचारांचे कडबोळे करून ते आपल्या नावावर खपवू नयेत. रंगदेवतेचे, भाषेचे पावित्र्य आणि शालीनता यांना ठेच पोहोचू नये. ∙∙∙

अजूनही नगरसेवक असल्याचा तोरा

मडगाव पालिकेच्या निवडून आलेल्या नगरमंडळाचा कार्यकाळ कधीच संपल्याने या पालिकेवर प्रशासक नेमण्यात आला आहे. मात्र, काही नगरसेवक अजूनही आपलीच सत्ता पालिकेवर असल्याच्या तोऱ्यात वावरत आहेत. यातील काही नगरसेवक, ज्यांचा कार्यकाळ कधीच संपला आहे, ते अजूनही नियमितपणे मडगाव पालिकेत येऊन नगरसेवकांच्या कक्षात बसतात आणि पालिकेतील कर्मचाऱ्यांना म्हणे ऑर्डरी सोडतात. त्यामुळे काही पालिका कर्मचारी सध्या हैराण झाले आहेत. अजूनही यांचाच तोरा का, असा सवाल ते करू लागले आहेत. ∙∙∙

निवडणुका येतायत म्हणे...!

राज्यात सध्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आता सरकारी कार्यालयात पंखा बंद पडला, फाइल हरवली, रस्ता खड्ड्यात गेला किंवा खड्डा रस्त्यात आला, तरी त्यालाही राजकीय रंग चढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पूर्वी एखादी घटना घडली की लोक विचारायचे, ‘नेमकं काय झालं?’ आता मात्र पहिला प्रश्न असतो, ‘यामागे राजकारण कोणाचं?’ त्यामुळे प्रत्येक घटनेचा तपास होण्याआधीच तिचे राजकीय विश्लेषण सुरू होत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. काही घटनांमध्ये खरोखर तथ्य असू शकते; पण निवडणुका जवळ आल्या की तथ्यापेक्षा त्यातून कोणाला किती राजकीय फायदा होणार, याचे गणित आधी मांडले जाते. त्यामुळे आता येत्या काळात कोणती घटना ‘प्रशासकीय’ राहते आणि कोणती ‘राजकीय’ बनते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. काही जण तर मिश्किलपणे म्हणू लागले आहेत की, निवडणुका जवळ आल्या की राज्यात दोनच गोष्टी वेगाने वाढतात. आरोप आणि स्पष्टीकरणे!∙∙∙

‘कोंकणी बुदवंतां’ ची हुकमी चाल

कैक वर्षांनी कॅथॉलीक कोंकणी सेवकाच्या गळ्यात कोंकणी भाषा मंडळाची माळ पडली. सेराफीन कॉता. सद्गृह्स्थ. शकुनी मामासारख्या वांयगण्या आदोगादांची पुलीतीक द्युतातील ही खेळी असेल असा विकल्प कोंकणीवादी व्यक्त करीत आहेत. असो. सेराफीनबाबांची टीम सक्षम असेल ही अपेक्षा. पानं तीच, फक्त पिसलेली. आपल्या कानशिलांजवळील ‘इकोसिस्टम’च्या अदृश्य चाणक्यांचे, सल्लागारांचे आवाज सेराफीनबाबांनी ऐकले तर गोंधळ होऊ शकतो, असेही अंदाज वर्तवले जात आहेत. निवडणूक जवळ येत आहे. मराठी कोंकणी रोमी प्रश्न ऐरणीवर आहे. या पार्श्वभूमीवर कॅथॉलीक अध्यक्ष ही हुकमी चाल. सर्वांना बरोबर घेऊन जायची कला सेराफीनबाबना उपजत अवगत आहे. कोणत्याही संघटनेची आर्थिक बाजू बळकट नसेल तितकी मंडळाच्या तिजोरीची ऊतू जाणारी समृध्दी आहे. नूतन प्रकल्प हाती घेतले तर आडकाठीविना दगडातून पाणी काढण्याची हिकमत सेराफीनबाब साध्य करू शकेल. ∙∙∙

पोलिस काय सांगणार?

म्हापसा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. काही जण म्हणतात, पोलिसांनी आपले काम केले, तर काही जणांचा आरोप आहे की, पोलिसांच्या वागणुकीमुळेच हा दुर्दैवी प्रकार घडला. आता खरे काय आणि खोटे काय, हे तर त्या युवकालाच माहिती होते; पण तोच आता काही सांगण्यासाठी उरलेला नाही. म्हणूनच सध्या सर्वात मोठा प्रश्न पोलिसांसमोर उभा राहिला आहे. कारण पोलिसांनी कुणाला आत्महत्या करायला सांगितल्याचे कुठे ऐकिवात नाही; पण मग लोकांच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे कोण देणार? ‘आमची चूक नाही’ एवढ्यावर हा विषय थांबणार का, की यामागील संपूर्ण घटनाक्रम उलगडून सांगितला जाणार? त्यामुळे आता पत्रकार परिषद होणार का, पोलिस स्वतःहून पुढे येऊन स्पष्टीकरण देणार का, की नेहमीप्रमाणे ‘तपास सुरू आहे’ या चार शब्दांमध्येच सगळे गुंडाळले जाणार? एक मात्र खरे... सध्या म्हापसात सर्वाधिक चर्चेत असलेला प्रश्न आत्महत्येचा नसून, ‘पोलिस नेमके काय सांगणार?’ हाच आहे! ∙∙∙

‘ते’ सरकारी अधिकारी आमदारकीसाठी इच्छुक?

सत्ताधाऱ्यांचे हुकूम ऐकण्यापेक्षा स्वतःच सत्ताधारी बनले तर? असाच विचार एसटी समाजातील दोन सरकारी अधिकारी करायला लागल्याची चर्चा कुशावती तालुक्यात सुरू आहे. शिक्षण व पंचायत संचालनालयाचे अधिकारी असलेल्या या दोघा अधिकाऱ्यांना म्हणे आता आमदारकीची स्वप्ने पडू लागली आहेत. शिक्षण अधिकारी सांगे मतदारसंघातून, तर पंचायत सचिव असलेले अधिकारी केपे मतदारसंघातून निवडणुकीला उतरण्याच्या तयारीत असल्याचे कळते. जर सांगे व केपे मतदारसंघ एसटीसाठी राखीव झाले, तर सरकारी नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारून हे दोघे अधिकारी आमदार बनण्याच्या तयारीत असले, तरी हे सर्व ‘जर-तर’च्या शक्यतांवर अवलंबून आहे. ∙∙∙

जोसेफ वाझ तयारीत

राशोल पंचायतीत सात वेळा सरपंचपद भूषवलेले ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि राशोलचे विद्यमान सरपंच जोसेफ वाझ हे सध्या भलतेच खुश आहेत. याचे कारण म्हणजे एसटींना मिळू शकणारे राजकीय आरक्षण. हे आरक्षण मिळाल्यास नुवे हा मतदारसंघ राखीव होऊ शकतो. नुवे हा काँग्रेसधार्जिणा मतदारसंघ असून या मतदारसंघात काँग्रेसकडे जोसेफ वाझ यांच्याशिवाय दुसरा कोणताही प्रभावी उमेदवार नाही. त्यामुळे हा मतदारसंघ राखीव ठरल्यास जोसेफ यांची आमदार होण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. भीती एकच; जर काँग्रेस पक्षाने आरजी पक्षाशी युती केली, तर मात्र हा मतदारसंघ आरजीला सोडला जाऊ शकतो. अशा वेळी जोसेफ काय भूमिका घेणार, हे पाहावे लागेल. ∙∙∙

महापौरांचा बैठकांचा सपाटा...

महापौर रोहित मोन्सेरात यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी १ जूनपासून कार्यालयात उपलब्ध असल्याचे जाहीर केले. त्यानुसार, रोहित हे दररोज विविध बैठका घेताना दिसत आहेत. नागरिकांचे, व्यावसायिकांचे गाऱ्हाणी ऐकून विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांना बोलावून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येत आहे. आज त्यांनी पोलिस खात्याच्या, वाहतूक खात्याच्या अधिकाऱ्यांना तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांना बोलावून आतापर्यंत नागरिकांनी मांडलेल्या समस्या सोडवण्यावर चर्चा केली. बैठका झाल्यानंतर शहरातील विविध प्रभागांतील समस्या जाणून घेण्यासाठी त्यांचे दौरे सुरूच आहेत. रोहित यांच्या कार्यपद्धतीचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे. ∙∙∙

8th Pay Commission: थकबाकीची 'जॅकपॉट' ऑफर! कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार १४ लाख रुपये? पाहा काय आहे संपूर्ण गणित

Goa Accident: रस्‍ता चुकला, घात झाला; अपघातात दाम्‍पत्‍याचा मृत्‍यू, कारची दुचाकीला धडक, बांबोळीतील घटना

सॅम्‍युअलला लावली 'थर्ड डिग्री'? पोलिसांची चौकशी सुरू, अनेक अधिकाऱ्यांचे दणाणले धाबे

Horoscope: भाग्य उजळणार! मंगळवारी 'या' 5 राशींवर लक्ष्मीची कृपा; बँक बॅलन्स वाढणार, प्रमोशनही मिळणार!

IND vs AFG: विजयाचा नवा सुवर्ण इतिहास! अफगाणिस्तानचा 300 धावांनी उडवला धुव्वा, टीम इंडियाने मोडले 5 मोठे रेकॉर्ड्स

SCROLL FOR NEXT