फोंडा: वाढलेल्या वाहतुकीमुळे सध्या फोंडा शहरातील पार्किंगची समस्या जटिल होत चालली आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होणे ही नित्याचीच बाब बनली आहे. खासकरून बाजारात अनेकवेळा बाचाबाची होण्याचे प्रकार घडत आहेत.
नगरपालिकेने फोंडा बाजारात तळघरात वाहतुकीकरता ऐसपैस जागा ठेवली असूनही बाजार रहाटीला येणारे लोक रस्त्यावर वाहने पार्क करून खरेदीला जाताना दिसत आहेत. मात्र, वाहनचालकांना हेल्मेट नाही, सीट बेल्ट लावला नाही म्हणून तालांव देणारे वाहतूक पोलिस या बेकायदेशीर पार्किंगकडे मात्र दुर्लक्ष करताना दिसत आहेत.
पूर्वी गोवा बागायतदाराकडे एखाददुसरा पोलीलिस तैनात असायचा. मात्र, आता वाहतूक पोलिसांनी बाजार या फोंड्यातील महत्त्वाच्या भागाकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे.
फोंडा नगरपालिकेने जरी पार्किंगकरता चांगली व्यवस्था केली असली तरी त्यात अनेक त्रुटी आढळतात. पाऊस पडला की या भागात पाणी साचायला लागते. इथे अंधार असल्यामुळे वाहनचालकांना वाहने पार्क करताना अडचणींना तोंड द्यावे लागते. मुख्य म्हणजे या भागाला योग्य व्यवस्थापन नसल्यामुळे एकप्रकारचा बकालपणा आला आहे. त्यामुळे पार्किंग व्यवस्थेतील त्रुटी दूर करणे आवश्यक आहे.
फोंडा नगरपालिकेने बाजार भागात एखादा वाहतूक पोलिस ठेवल्यास पार्किंग समस्या बऱ्याच प्रमाणात आटोक्यात येऊ शकते. शास्त्री सभागृह असलेली जागा पाडून त्याजागी पार्किंगची व्यवस्था केल्यामुळे बसस्थानकावरची पार्किंग समस्या थोडीफार नियंत्रणात आली आहे; पण तरीही मिळेल तिथे वाहने पार्क करण्याचे सत्र इथेही सुरू आहे.
बेकायदेशीरपणे पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई न केल्यास ही समस्या आटोक्यात येणे कठीण आहे, असे मत नागरिक व्यक्त करत आहेत.
फोंडा बाजारातील बेकायदेशीर पार्किंग म्हणजे वाहनचालकांकरता एक डोकेदुखीच बनली आहे. खासकरून प्रभू इमारत ते शांतीनगर चौक या भागातून वाहने चालवण्यासाठी कसरत करावी लागते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वाहतूक पोलिस या भागाकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे नगरपालिका व वाहतूक पोलिसांनी एकत्र येऊन या समस्येचे निराकारण केले तरच आम्हाला दिलासा मिळू शकेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.