Ponda Budhwar Peth Market Sellers
फोंडा: बुधवारपेठ मार्केट समोरील रस्त्यावरील फुटपाथवर बसून व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांना त्वरित हटवा, अशी मागणी केल्यानंतर पालिकेची बैठक होऊन त्यात या विक्रेत्यांना रस्ताकडेला नियोजित जागी बसण्याची मुभा देण्यात आली.
बुधवारपेठ मार्केटमधील विक्रेत्यांनी सोमवारी सकाळी फोंडा पालिकेवर मोर्चा नेला होता. फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष आनंद नाईक यांनी संध्याकाळी होणाऱ्या पालिका बैठकीत हा विषय मांडून बैठकीतील निर्णयानुसार कार्यवाही करू असे आश्वासन दिले. त्यानुसार पालिका बैठकीत चर्चा झाली.
दरम्यान,बुधवारपेठ मार्केट विक्रेत्यांनी फुटपाथवर बसलेल्या विक्रेत्यांना हटवून त्यांची रवानगी मार्केट शेडमध्ये केली. बुधवारपेठ मार्केटमधील विक्रेत्यांची कैफियत त्यांचे प्रतिनिधी घारू सावंत, नरेंद्र परब व इतरांनी नगराध्यक्षांसमोर मांडली. पालिकेने फुटपाथवर विक्री करणाऱ्यांना त्वरित हटवावे अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी पालिकेला एक निवेदनही सादर करण्यात आले. फुटपाथवरील विक्रेते दोन दिवसांत बक्कळ कमावतात मात्र मार्केटमध्ये बसणारे ग्राहकांची वाट पाहत बसतात. त्यामुळे मार्केटमधील विक्रेत्यांच्या रोजीरोटीचा सवाल निर्माण होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. नगराध्यक्ष आनंद नाईक यांनी मार्केटमधील विक्रेत्यांना पालिका बैठकीनुसार कार्यवाही करू असे आश्वासन सकाळी दिले होते.
सणासुदीला येणाऱ्या तात्पुरत्या विक्रेत्यांची व्यवस्था बुधवारपेठ मार्केट संकुलाच्या शेडमध्ये करण्याचे पालिकेने ठरवले होते, पण येत्या बुधवारी साप्ताहिक बाजार असल्याने साप्ताहिक बाजाराला येणाऱ्या विक्रेत्यांची गैरसोय होणार असल्याने हा निर्णय रद्द केला, असे पालिकेतर्फे सांगण्यात आले. मात्र बुधवारपेठ मार्केट विक्रेत्यांनी बाहेरील विक्रेत्यांची रवानगी मार्केट शेडमध्ये केल्याने पुढे काय हा प्रश्न आहे.
या बैठकीला सर्व नगरसेवक तसेच फोंड्याचे आमदार रवी नाईक उपस्थित होते. चतुर्थी, दिवाळीसारख्या सणासुदीला रस्त्याच्या कडेला बसणारे विक्रेते हे तात्पुरते असल्याने त्यांना जागा निश्चित करून बसविण्याचा निर्णय झाला. वाहतूक कोंडी होणार नाही, याची खबरदारी घेण्यात येईल, असे नगराध्यक्ष म्हणाले. मार्केटमध्ये अरेरावी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही नगराध्यक्षांनी दिला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.