फोंडा: फोंडा मतदारसंघातील अनेक रस्ते सध्या खड्डेमय झाले असून वाहनचालकांना खास करून दुचाकीस्वारांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. याला लांबलेला पावसाळा हे जरी एक कारण असले, तरी हे कारण एकमेव म्हणता येणार नाही. कंत्राटदारांची बपर्वाई हे यामागचे प्रमुख कारण म्हणता येईल. याबाबतीत कृषिमंत्री तथा फोंड्याचे आमदार रवी नाईक यांनी दै. ‘गोमन्तक’शी संवाद साधताना लवकरच फोंड्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे सुतोवाच केले.
आपण संबंधित अधिकाऱ्यांची याबाबत बैठक घेतली असून लवकरच काम सुरू करण्याचे त्यांना आदेश दिले असल्याचे ते म्हणाले. लांबलेल्या पावसामुळे रस्त्यांचे काम सुरू करायला वेळ लागला. फोंड्यातील नागरिकांना यामुळे जो त्रास सहन करावा लागला याची आपल्याला जाणीव असून भविष्यात याची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. संबंधित कंत्राटदारांच्या कारवाईबाबत बोलताना सध्या सार्वजनिक बांधकाम खाते हे मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत असून तेच यासंबंधी योग्य तो निर्णय घेऊ शकतील, असे त्यांनी सांगितले.
यावेळी पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे का होईना, पण जनतेला रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनंत अडचनींचा सामना करावा लागला. आता या रस्त्यांची लवकरच डागडुजी केली जाणार या कृषिमंत्र्यांच्या विधानाचे स्वागत करत असताना भविष्यात असे होणार नाही याची त्यांनी दक्षता घ्यावी, असे मत फोंडा विकास समितीचे अध्यक्ष राम कुंकळकर यांनी व्यक्त केले. रवी नाईक गृहमंत्री असताना फोंड्यातील रस्ते कसे चकाचक असायचे याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.
राज्यात तिसरा जिल्हा होणे हे कृषिमंत्री रवी नाईक यांचे स्वप्न असून या जिल्ह्याबाबत ते आशावादी असल्याचे दिसत आहे. गेली कित्येक वर्षे ते या प्रक्रियेचा पाठपुरावा करत असून आता मुख्यमंत्र्यांनी याबाबतीत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर जिल्ह्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक पावले उचलली असून तिसरा जिल्हा होण्याची आशा पल्लवीत व्हायला लागली आहेत, असे कृषिमंत्री म्हणाले. तिसरा जिल्हा झाल्यास फोंडा प्रगतीचा उंच टप्पा गाठू शकेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.