Govind Gaude, Prakash Velip  Dainik Gomantak
गोवा

UTAA: वाद चिघळणार! गोविंद गावडे, वेळीप यांच्‍याकडून नवीन ‘उटा’; गाकुवेध’सह इतर संघटना आक्रमक

UTAA Controversy: ‘उटा’मध्‍ये समावेश असलेल्‍या ‘गाकुवेध’सह इतर संघटनांच्‍या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी पणजीत पत्रकार परिषद घेऊन माजी मंत्री गोविंद गावडे, प्रकाश वेळीप यांच्‍या या कृत्‍याचा जाहीर निषेध केला.

Sameer Panditrao

पणजी: आदिवासी समाजातील आठ संघटनांनी एकत्र येऊन २००४ मध्‍ये स्‍थापन केलेल्‍या ‘उटा’ संघटनेत पुन्‍हा एकदा उभी फूट पडली असून, या संघटनेला समांतर अशी त्‍याच नावाच्‍या संस्‍थेची नवी संघटना माजी मंत्री गोविंद गावडे, प्रकाश वेळीप यांच्‍यासह १५ जणांनी स्‍थापन केली आहे. त्‍यामुळे ‘उटा’ संघटनेसंदर्भातील वाद आणखी भडकण्‍याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

‘उटा’मध्‍ये समावेश असलेल्‍या ‘गाकुवेध’सह इतर संघटनांच्‍या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी पणजीत पत्रकार परिषद घेऊन माजी मंत्री गोविंद गावडे, प्रकाश वेळीप यांच्‍या या कृत्‍याचा जाहीर निषेध केला. शिवाय याविरोधात कायदेशीर लढा देण्‍याचा इशाराही त्‍यांनी दिली. ‘गाकुवेध’चे अध्‍यक्ष गोविंद शिरोडकर, माजी अध्‍यक्ष ॲड. सुरेश पालकर, प्रेमानंद गावडे, रवींद्र वेळीप, तुकाराम कुंकळ्ळकर, नारायण कुंकळ्ळकर, मधू गावडे आदी यावेळी उपस्‍थित होते.

‘उटा’ संघटना कायद्यातील नियमांनुसार चालत नसल्‍याचा दावा संघटनेच्‍या इतर संस्‍थांकडून वारंवार होत होता. त्‍यामुळे आम्ही ‘गाकुवेध’चा अध्‍यक्ष असताना इतर संघटनांची बैठक घेऊन ‘उटा’चे अध्‍यक्ष प्रकाश वेळीप यांना २४ ऑक्‍टोबर २०२४ रोजी दोन पत्रे पाठवली होती.

त्‍याला वेळीप यांनी उत्तर दिले नाही. संघटनेतील वाद वाढू नये, यासाठी वेळीप यांच्‍याशी संपर्क साधून आम्ही त्‍यांच्‍याकडे आठही संस्‍थांची बैठक बोलावण्‍याची तसेच यावर्षी होणाऱ्या संघटनेच्‍या निवडणुकीपर्यंत विद्यमान समिती स्‍थगित ठेवण्‍याची मागणी केली होती.

यालाही वेळीप तयार न झाल्‍याने आम्‍ही जिल्‍हा निबंधकांच्या न्‍यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली. त्‍यावर जिल्‍हा निबंधकांनी ४ जुलै रोजी अंतिम आदेश देत, ‘उटा’च्‍या सर्व कार्यक्रमांवर बंदी घातली. या सर्व घडामोडी सुरू असतानाच माजी मंत्री गावडे, वेळीप, दुर्गादास गावडे, विश्‍वास गावडे अशा १५ जणांनी ३ जुलै २०२५ रोजीच ‘उटा’ला समांतर त्‍याच नावाच्‍या संघटनेची उत्तर गोवा जिल्‍हा निबंधक कार्यालयात नोंदणी करून घेतली. विद्यमान ‘उटा’ची नोंदणी दक्षिण गोव्‍यात मडगाव येथे झाली असल्‍याचे ॲड. पालकर म्‍हणाले.

विद्यमान ‘उटा’मध्‍ये सहभागी संघटनांच्‍या संस्‍थांचे राज्‍यभरात हजारो पदाधिकारी आहेत. पण, नव्‍या संघटनेत केवळ १५ जणांचाच समावेश करण्‍यात आला आहे. ‘उटा’च्‍या कायद्यानुसार हे बेकायदेशीर आहे. त्‍यामुळे या समांतर संघटनेविरोधात आम्‍ही सर्वच मार्गांनी लढणार असून, प्रसंगी कायदेशीर मार्गाचाही अवलंब केला जाणार असल्‍याचेही ॲड. पालकर यांनी नमूद केले.

एसटी समाजाचा घात

माजी मंत्री गोविंद गावडे, प्रकाश वेळीप यांनी ‘उटा’ला समांतर संघटना स्‍थापन करून राज्‍यातील एसटी समाजाचा घात केला आहे, असा आरोप गोविंद शिरोडकर यांनी केला. ‘उटा’च्‍या इतर संघटनांनी जिल्‍हा निबंधकांकडे धाव घेतल्‍यानंतर गावडे, वेळीप आणि त्‍यांचे इतर साथीदार चलबिचल झाले होते. तेथील निवाडा आपल्‍याविरोधात जाण्‍याचा अंदाज त्‍यांना होता. त्‍यामुळेच त्‍यांनी ‘उटा’ला समांतर संघटनेची स्‍थापना केल्‍याचा दावाही शिरोडकर यांनी केला.

नव्‍या संघटनेची ‘उटा-जीकेव्‍ही’ नावाने सरकारदफ्तरी नोंद

माजी मंत्री गोविंद गावडे, प्रकाश वेळीप अशा १५ जणांनी एकत्र येऊन स्‍थापन केलेल्‍या समांतर संघटनेला ‘युनायटेड ट्रायबल असोसिएशन अलायन्‍स ऑफ गावडा, कुणबी, वेळीप’ (उटा–जीकेव्‍ही) असे नाव देण्‍यात आले आहे. सोसायटी नोंदणी कायदा, १९८० अंतर्गत या संघटनेची नोंदणी उत्तर गोव्‍यात करण्‍यात आली आहे.

प्रकाश वेळीप म्‍हणतात...

१.‘उटा’ ही एक चळवळ आहे. आम्‍ही सर्वजण या चळवळीचे काम प्रामाणिकपणे करीत होतो. पण, काही जणांनी जिल्‍हा निबंधकांकडे याचिका दाखल करून ‘उटा’च्‍या कार्यक्रमांवर बंदी आणली. त्‍यामुळे आम्‍हाला काही निर्णय घ्‍यावे लागले.

२. प्रत्‍येकाला नवी संघटना स्‍थापन करण्‍याचा अधिकार आहे. त्‍यापासून त्‍यांना कुणीही रोखू शकत नाही. आम्‍ही काम करणारी माणसे आहोत. कोणताही स्‍वार्थ न साधता आम्‍ही आदिवासी जनतेसाठी काम करीत असल्‍याचे यापूर्वीची आंदोलने, मेळाव्‍यांतून दिसून आले आहे. त्‍यामुळे आमच्‍या नव्‍या संघटनेला आक्षेप घेण्‍याचा प्रश्‍नच नाही. ‘उटा’ वेगवेगळ्या संघटनांच्‍या माध्‍यमातून कार्यरत राहील.

३. गेल्‍या काही महिन्‍यांपासून जे आम्‍हाला विरोध करीत आहेत, त्‍यांनी अधिवेशन घेऊन आपली मते जनतेसमोर मांडावीत. त्‍यानंतर जनताच योग्‍य निर्णय घेईल.

४. बऱ्याच लोकांना ‘उटा’ या नावाची ‘ॲलर्जी’ आहे. त्‍यामुळेच त्‍यांच्‍याकडून आमच्‍याविरोधात कारवाया सुरू आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

हातात AK47 घेऊन फोटो! सक्तीने 'धर्मांतरण' करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; गोव्यातील महिलेसह 10 जणांना अटक

Virat Kohli 5 Morning Habits: तुम्हीही व्हा विराटसारखे 'सुपरफिट'! कोहलीच्या फिटनेसचे रहस्य उघड, त्याची सकाळची 'ही' खास सवय माहितीय का?

सांगेत 14 वर्षांपासून जीवघेण्या लाकडी पुलावर धोकादायक प्रवास; आदिवासी बांधवांची व्यथा दुर्लक्षित!

IND vs ENG: रेकॉर्डब्रेकर गिल! मँचेस्टरमध्ये शुभमन करणार मोठा धमाका; 19 वर्ष जुना रेकॉर्ड निशाण्यावर

Ishan Kishan Dance Video: 'सॉरी सॉरी' गाण्यावर इशान किशनचा भन्नाट डान्स; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, 'वाह क्या बात है...'

SCROLL FOR NEXT